MIMचे नेते अकबरूद्दीन ओवेसींनी औरंगाबाद दौऱ्यात औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिली आणि संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला. ओवेसींनी ओरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकून मराठीजनांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलंय.
मुळात सभेसाठी आलेल्या अकबरूद्दीन ओवेसींना औरंगजेबाच्या कबरीवर जाण्याची गरजच काय होती? हे सर्व ठरवून करण्यात आलं का ? यातून ओवेसी आणि MIM जाणीवपूर्वक धार्मिक द्वेष निर्माण करतायेत का? असाही सवाल उपस्थित होतोय. त्यामुळेच छत्रपती संभाजीराजेंसह शिवसेनेनं MIMचा खरपूस समाचार घेतलाय.
मुघल सम्राट औरंगजेबाची राजवट ही देशाच्या इतिहासातली सर्वात जुलमी राजवट राहिलीय. त्यानं सत्तेचं सोपान गाठलं तेच मुळी क्रोर्याची परिसीमा गाठत..सत्तेसाठी त्यानं आपले सख्खे भाऊ दारा शिकोह आणि शाह शुजा यांना ठार केलं. जन्मदात्या पित्याला कैदेत टाकलं. ज्या मुराद बक्शची मदत घेतली पुढे त्याचाही खात्मा केला.
शेकडो हिंदू स्त्रियांवर अत्याचार केले. हिंदूंची मंदिरं तोडून तिथं मशिदी उभारल्या. जिझिया कर लादला. ज्यांनी धर्मांतर केलं नाही त्यांना हाल हाल करून मारलं. आणि यापलिकडंचं औरंगजेबाचं क्रौर्य म्हणजे छत्रपती संभाजीराजेंची हत्या…जी महाराष्ट्राच्या हृदयायातली भळभळती जखम आहे.
अकबरूद्दीन ओवेसींच्या या संतापजनक कृत्यावर विरोधकही तुटून पडलेत. 10 मिनिटांसाठी पोलिसांना हटवा ओवेसींना उत्तर देऊ असं थेट आव्हानच भाजप नेत्यांनी दिलंय.
शनिवारी छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी आहे. त्याआधीच अकबरूद्दीनं ओवेसीनं ओरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेऊन गरळ ओकल्यानं महाराष्ट्रात संतापाची लाट उसळलीय. औरंगजेबाचा रक्तरंजित इतिहास ठाऊक असल्यानं धर्मनिरपेक्षतेची झुल घेऊन फिरणारे नेतेही त्याच्या कबरीवर जाणं टाळतात. त्यामुळे MIMनं ही चूक का करावी? हाच सवाल आता उपस्थित होतोय.