महाराष्ट्राचे सुपूत्र न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांची सोमवारी भारताचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. केंद्रीय कायदे मंत्री किरेन रिजिजू यांनी ही माहिती दिली. विद्यमान सरन्यायाधीश उदय उमेश लळीत निवृत्त झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 नोव्हेंबर रोजी न्यायमूर्ती चंद्रचूड सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. न्यायमूर्ती लळीत यांचा 74 दिवसांचा कार्यकाळ होता, तर न्यायमूर्ती चंद्रचूड यांचा सरन्यायाधीश म्हणून दोन वर्षांचा कार्यकाळ असेल.
यासंदर्भात माहिती देताना रिजिजू यांनी ट्विट केले की, ‘घटनेने दिलेल्या अधिकारांचा वापर करून माननीय राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश डॉ. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांची देशाचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती 9 नोव्हेंबर 2022 पासून लागू होईल. न्यायमूर्ती चंद्रचूड 10 नोव्हेंबर 2024 रोजी निवृत्त होतील.
अलीकडेच न्यायमूर्ती यू यू लळीत यांची भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या वर्षी नोव्हेंबरमध्ये निवृत्त होण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यूयू लळीत यांनी न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांची उत्तराधिकारी म्हणून शिफारस केली होती.
न्यायमूर्ती यू यू लळीत यांनी 27 ऑगस्ट रोजी भारताचे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. मात्र, आता ते त्यांच्या 74 दिवसांच्या कार्यकाळानंतर 8 नोव्हेंबर 2022 रोजी निवृत्त होणार आहेत. 7 ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारने सीजेआय उदय उमेश लळीत यांना पत्र लिहून त्यांचा उत्तराधिकारी नियुक्त करण्यास सांगितले होते, त्यानंतर न्यायमूर्ती लळीत यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांची बैठक बोलावली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून डी.वाय. चंद्रचूड यांच्या नावाने एक पत्र केंद्र सरकारला पाठवण्यात आले.
डीवाय चंद्रचूड यांचे वडीलही सरन्यायाधीश
न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांचा मुख्य न्यायाधीश म्हणून दोन वर्षांचा कार्यकाळ असेल. ते 10 नोव्हेंबर 2024 रोजी निवृत्त होणार आहेत. न्यायमूर्ती चंद्रचूड यांचे वडील यशवंत विष्णू चंद्रचूड हे देशाचे 16 वे सरन्यायाधीश होते. त्यांचा कार्यकाळ 22 फेब्रुवारी 1978 ते 11 जुलै 1985 असा होता. म्हणजेच सुमारे 7 वर्षे ते देशाच्या CJI पदावर राहिले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या 65 व्या वर्षी आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या 62 व्या वर्षी निवृत्त होतात.