तेलंगणा सरकारचे शरद पवारांकडून कौतुक

भाजपविरोधात तिसऱ्या आघाडीच्या निर्मितीसाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्याच पार्श्वभूमीवर केसीआर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर केसीआर पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी दाखल झाले. त्यावेळी पवार आणि केसीआर यांच्यात जवळपास दीड तास बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, खासदार सुप्रिया सुळे, तेलंगणातील काही आमदार, खासदार आणि अभिनेते प्रकाश राजही उपस्थित होते. बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना पवार यांनी तेलंगना सरकारचं कौतुक केलं. तसंच बेरोजगारी आणि गरिबी यासह अनेक समय्यांवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती पवारांनी दिली.

शरद पवार म्हणाले की, आम्ही राष्ट्रीय पातळीवरील पक्षांचे नेते एकत्र येतो तेव्हा नेहमी राजकीय विषयांवर चर्चा होते. मात्र आजची बैठक वेगळी होती. आजची बैठक यासाठी वेगळी होती की आज देशासमोर ज्या समस्या आहेत, मग ती बेरोजगारी, गरिबी, भूकबळी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या अशा समस्यांवर सगळ्यांनी मिळून काय करायला हवं?

आज आपली सगळ्यात महत्वाची जबाबदारी ही आहे, या महत्वाच्या विषयावर आज चर्चा झाली. आज विकासाचा मुद्दा महत्वाचा असल्यानं जास्त राजकीय चर्चा केली नाही. खास करुन देशात कुठेही नाही असे पाऊल तेलंगणात शेतकऱ्यांसाठी उचलण्यात आले आहे, तो एक रस्ता तेलंगनाने देशाला दाखवला आहे, अशा शब्दात पवार यांनी तेलंगणा सरकारचं कौतुक केलं आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि त्यांचे सर्व खासदार, नेते आज आले होते. त्यांच्याशी केवळ विकासाच्या मुद्यावरच चर्चा झाली. आज गरिबी आणि बेरोजगारी या मोठ्या समस्येवर उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी बसून मार्ग शोधायला हवा. अशा विकासाच्या मुद्द्यावर एक वेगळं वातावरण तयार करण्यासाठी प्रयत्न करायला हवे. त्यासाठी आम्ही सर्व मिळून पुन्हा कुठे बसायचं, कधी बसायचं याबाबत ठरवू’, असंही शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.