आज दि.३१ मे च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना
EWS आरक्षणाचा लाभ देणार

मराठा समाजाची नाराजी दूर करण्यासाठी ठाकरे सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील मराठा विद्यार्थी आणि नोकरीसाठी पात्र उमेदवारांना १० टक्के EWS आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात १० टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. सरळ सेवा भरतीत ही मराठा उमेदवारांना आरक्षणाचा १० टक्के लाभ घेता येणार आहे. सरकारनं तसा शासन निर्णय जारी केला आहे.

लॉकडाउनचे निर्बंध
१५ जूनपर्यंत कायम राहणार

लॉकडाउनचे निर्बंध १५ जूनपर्यंत कायम राहणार असल्याची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत होणाऱी गर्दी पाहून आश्चर्य व्यक्त केलं आहे. इतकंच नाही तर मुंबईत अशीच गर्दी होत राहिली तर आणखी कडक निर्बंध करणार असल्याचा इशाराच उद्धव ठाकरेंनी दिला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या मल्टीप्लीस्टिज पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. रस्त्यावरचं ट्राफिक बघून मी आश्चर्यचकित झालो. मी काल नेमकं काय बोललो अशी एकदा चौकशीही केली. मुंबई किंवा महाराष्ट्रात आपण बंधनं उठवलेली नाहीत. मुंबईत अशीच गर्दी होत राहिली तर निर्बंध कठोर करावे लागतील,” असा इशारा ठाकरेंनी दिला आहे.

लशींसाठी आपण राज्यांमध्ये
स्पर्धा लावताय का?

केंद्र सरकारने राज्यांना लशींसाठी ग्लोबल टेंडर काढण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे अनेक राज्य तसेच महानगरपालिकेनं ग्लोबल टेंडर काढलं आहे. यावर सुप्रीम कोर्टानं परखड मत मांडत केंद्र सरकारला फटकारलं आहे. राज्य सरकार करोना लशींसाठी ग्लोबल टेंडर काढत आहेत. ही केंद्र सरकारची निती आहे का?, लशींसाठी आपण राज्यांमध्ये स्पर्धा लावताय का?”, असा प्रश्न करत सुप्रीम कोर्टाने फटकारलं.

अर्थमंत्रालयातील लोकांचा
आयक्यू कमी असतो

सतत बातम्यांमध्ये सोशल मीडियावर झळकणारे भाजपाचे खासदार म्हणजे डॉ. सुब्रमण्यम स्वामी. सुब्रमण्यम हे राज्यसभेमध्ये भाजपा खासदार असले तरी ते अनेकदा केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांवर टीका करताना दिसतात. अशाच पद्धतीची टीका पुन्हा एकदा स्वामी यांनी अर्थमंत्रालयासंदर्भात बोलताना केली आहे. अर्थमंत्रालयातील लोकांचा आयक्यू म्हणजेच बुद्धिगुणांक कमी असतो अशी टीका स्वामींनी केलीय.

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाविरोधातील
याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाविरोधात करण्यात आलेली याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली आहे. करोनाची दुसरी लाट आलेली असताना सुरु असलेलं सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचं सर्व प्रकारचं बांधकाम रोखण्याचे आदेश दिले जावेत अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. दिल्ली हायकोर्टाने याचिका फेटाळली असून याचिकाकर्त्यांना १ लाखांचा दंडही ठोठावला आहे. ही जनहित याचिका नसून प्रवृत्त होऊन करण्यात आलेली याचिका असल्याचं दिल्ली हायकोर्टाने म्हटलं आहे.

आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा
१७ सप्टेंबरपासून सुरू होणार

करोना व्हायरसमुळे पुढे ढकलण्यात आलेले आयपीएल २०२१चे १४वे सत्र आता यूईमध्ये पूर्ण होईल. बायो बबलमध्ये करोनाच्या प्रवेशानंतर २९ सामन्यांनंतरच लीग पुढे ढकलण्यात आली. नुकतीच बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत उर्वरित ३१ सामने यूएईमध्ये खेळण्याची घोषणा करण्यात आली. परंतु, तारखेसंदर्भात कोणताही निर्णय झाला नाही. पण माध्यमांच्या वृत्तानुसार, आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा १७ सप्टेंबरपासून सुरू होईल आणि अंतिम सामना १० ऑक्टोबरला खेळला जाईल.

नितीन गडकरी म्हणजे, चुकीच्या
पक्षातील चांगला माणूस

केंद्रातील भाजप सरकारची एकूणच कामगिरी उणेच असली तरी केंद्रीय मंत्रिमंडळातील रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणजे ‘ चुकीच्या पक्षातील चांगला आणि कार्यक्षम माणूस’ असे त्यांचे वर्णन करावे लागेल, असे मत काँग्रेसचे नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले. मोदी सरकारच्या सात वर्षांच्या कारभाराचे मूल्यमापन करण्याच्या उद्देशाने आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते.

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या
प्रवासाला खीळ

अंदमानातील जोरदार प्रवेशानंतर वेगाने कूच करणाऱ्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाला सध्या पोषक स्थिती नसल्याने खीळ बसली आहे. त्यामुळे त्यांचे केरळमधील आगमन लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हवामान विभागाने मोसमी वारे केरळमध्ये दाखल होण्याचा नवा मुहूर्त ३ जून असा जाहीर केला आहे. ते तेथे पोहोचल्यानंतरच त्यांची महाराष्ट्राकडे वाटचाल होण्याचा अंदाज आहे.

शरद पवारांना
भेटले फडणवीस

विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक इथे जाऊन फडणवीस शरद पवारांना भेटले. स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली.

केंद्र सरकार आणि ट्विटरचे
एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर आणि सरकार यांच्यातील संघर्ष वाढताना दिसत आहे. सोशल मीडियाच्या नव्या कायद्यांवरील सुनावणीदरम्यान ट्विटर आणि केंद्र सरकार आज समोरासमोर दिसले. आम्ही केंद्राचे कायदे पाळल्याचे ट्विटरने हायकोर्टात सांगितले. मात्र सरकारने ट्विटरने कायदे पाळले नसल्याचे सांगितले. सुनावणीदरम्यान कोर्टाने केंद्र आणि ट्विटरला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे आयटी नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी याचिकेवर आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले. यावर ट्विटरच्या उच्च अधिकाऱ्यांनी कोर्टाला सांगितले की त्यांनी आयटी नियम २०२१ लागू केले आहेत.

चीनमध्ये आता दाम्पत्य
तीन मुलांना जन्म देऊ शकतात

लोकसंख्येवर देशाची आर्थिक गणितं बांधली जात असतात. लोकसंख्येचा थेट प्रभाव अर्थकारणावर पडत असतो. चीनने काही वर्षांपासून लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी कडक नियम घातले होते.”टू चाइल्ड पॉलिसी’ अंतर्गत दोन मुलांना जन्म देण्याची परवानगी होती. या नियमामुळे देशातील लोकसंख्या नियंत्रणाला आली. मात्र देशातील अर्ध्याहून अधिक नागरिक वयोवृद्ध होत असल्याने चीनची चिंता वाढली आहे. त्यामुळे हा नियम शिथील करण्याचा निर्णय चीन सरकारने घेतला आहे. चीनमध्ये आता दाम्पत्य तीन मुलांना जन्म देऊ शकतात.

महान धावपटू मिल्खा सिंग
रुग्णालयातून घरी

मोहाली येथील स्थानिक रुग्णालयात करोनावर उपचार घेत असलेले भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांना विनंतीवरून रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर आहे, मात्र त्यांची पत्नी निर्मल कौर यांना करोनामुळे आयसीयूत हलविण्यात आले आहे. कौर या भारताच्या व्हॉलीबॉल संघाच्या कर्णधार होत्या.

मंगळ ग्रहावर
आढळले ढग

संपूर्ण जगाचं लक्ष सध्या मंगळावरील संशोधनावर लागलं आहे. अमेरिकेने आपली महत्त्वकांक्षी योजना राबवत मंगळावर जीवसृष्टीसाठी पुरक वातावरण आहे का याचा शोध सुरु केलाय. याचाच भाग म्हणून नासाच्या क्युरॉसिटी रोव्हरच्या माध्यमातून विविध प्रयोग केले जात आहेत. आता याच रोव्हरने मंगळ ग्रहावर घेतलेले काही फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटो म्हणजे मंगळ ग्रहावरील ढगांचे फोटो आहेत.

अभ्यास करून ओबीसी
आरक्षणावर मार्ग काढणार

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबीसी नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे राज्य सरकारने ओबीसींना आरक्षण मिळावं म्हणून हालचाली सुरू केल्या आहेत. कोर्टाच्या आदेशाचा अभ्यास करून ओबीसी आरक्षणावर मार्ग काढण्यात येईल. कोर्टाच्या आदेशाचा अभ्यास केल्यानंतर ज्या काही प्रक्रिया करणे गरजेच्या आहेत त्या पूर्ण करून पुढे जाऊ, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.

पेट्रोलने गाठली शंभरी

देशभरात इंधनात लक्षणीय दरवाढ पाहायला मिळत आहे. राज्यात मुंबई, पुण्यासह सर्वच शहरात पेट्रोलच्या दराने शतक गाठलं आहे. तर डिझेलचे दरही 90 रुपयांच्या पुढे गेले आहे. देशभरातील विविध शहरांमध्ये आज (31 मे) पेट्रोल दरात प्रतिलीटर 25 ते 31 पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलचा दरही 25-29 पैशांनी वाढला आहे. सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.