बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान याच्या ‘राधे’ चित्रपटावर ‘भाईजान’चे चाहते खुश आहेत, मात्र सर्वसामान्य प्रेक्षकांकडून चित्रपटाची चिरफाड केली जात आहे. ‘राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ (Radhe) चित्रपटाची सोशल मीडियातून खिल्ली उडवली जात आहे. त्यातच प्रख्यात अभिनेता प्रवीण तरडे यानेही आपला अनुभव व्यक्त केला आहे.
‘राधे’ चित्रपटात अभिनेता प्रवीण तरडेने दगडू दादा ही गुंडाची भूमिका साकारली आहे. मात्र लहानशी व्यक्तिरेखा साकारण्यावरुन तरडेचे चाहते नाराज झाले आहेत. ‘प्रवीण भाऊ, तू लहानशी भूमिका का केलीस?’ असा प्रश्न आपल्याला सोशल मीडियावर विचारला जात असल्याचे प्रवीण तरडे म्हणाला.
‘मी म्हणालो, की लहान सहान भूमिका साकारतच मी इथवर आलो आहे. भूमिकेच्या लांबी-रुंदीने मला फरक पडत नाही. मी कोणती व्यक्तिरेखा करत आहे, हे महत्त्वाचं. मला सलमान भाईसोबत रिलेशन्स निर्माण करायचे होते. त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव भन्नाट होता. मला तो माणूस म्हणून आवडतो.’ असं प्रवीण म्हणाला.
44 वर्षीय प्रवीण तरडेने लिहिलेला आणि दिग्दर्शन केलेला ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपट प्रचंड गाजला आहे. ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटासोबतच फँड्री, अजिंक्य, देऊळ बंद, लग्न मुबारक यासारख्या सिनेमांमध्येही प्रवीण तरडेने भूमिका केल्या आहेत. ‘आरारारा… खतरनाक’ या स्टाईलसाठी तो फेमस आहे.
सलमान खानचा चित्रपट ‘राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ रिलीज झाल्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्म ‘झी 5’चा सर्व्हर क्रॅश झाला. सलमानने यापूर्वी झी स्टुडिओला हा चित्रपट 230 कोटीला विकला होता. पण जेव्हा लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली, तेव्हा कंपनीने पुन्हा एकदा यावर चर्चा केली आणि सलमानला 190 कोटींमध्ये डील करण्यास सांगितले. स्वत: सलमान देखील या चित्रपटाचा निर्माता आहे. सलमानचे वडील आणि प्रख्यात लेखक सलीम खान यांनीही राधे हा फार काही ग्रेट सिनेमा नसल्याचं म्हटलं होतं.