भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. आज सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय सलामीवीरांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. सलामीवीर के. एल. राहुल आणि मयंक अग्रवाल या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 117 धावांची भागीदारी करत मोठ्या धावसंख्येच्या पाया रचला.
लुंगी एंगिडीने 41 व्या षटकात मयंक अग्रवालला पायचित करुन सलामीची जोडी फोडली. मयंकने 60 धावांची खेळी केली. त्यापाठोपाठ एंगिडीने चेतेश्वर पुजाराला आल्या पावली माघारी धाडलं. पुजारा भोपळादेखील फोडू शकला नाही. त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि राहुलने डाव सावरला. मात्र काही वेळातच भारताने विराट कोहलीच्या रुपात तिसरी विकेट गमावली. विराट कोहली पुन्हा एकदा अपयशी ठरला. चांगली सुरुवात होऊनही त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्याने 94 चेंडूत 35 धावांची खेळी केली. लुंगी एंगिडीने त्याला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. विराट बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या अजिंक्य रहाणे आणि राहुलने पुढे पडझड होऊ दिली नाही.
दरम्यान, राहुलने त्याचं शतक पूर्ण केलं. 78 व्या षटकात केशव महाराजच्या गोलंदाजीवर लोकेश राहुलने शानदार चौकार वसूल करत आपलं शतक पूर्ण केलं. राहुलने 218 चेंडूत शतक केलं. त्यात 14 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. राहुल-अजिंक्य जोडी दिवसअखेर नाबाद परतली. राहुल सध्या 122 धावांवर खेळत आहे, तर अजिंक्य रहाणे 40 धावांवर खेळतोय.
दरम्यान, भारताचे तीनही फलंदाज लुंगी एंगिडीने बाद केले. त्याच्याव्यतिरिक्त साऊथ आफ्रिकेच्या कोणत्याही गोलंदाजाला यश मिळालं नाही. एंगिडीने 17 षटकात 45 धावात देत 3 बळी घेतले.