नुकत्याच रिलीज झालेल्या ‘मधुबन’ गाण्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर, सारेगामा या संगीत लेबलने नुकतेच घोषित केले, की ते ‘मधुबन’ गाण्याचे बोल आणि नाव देखील बदलणार आहेत. या गाण्याबाबत मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी आरोप केला होता की, गाण्याच्या व्हिडीओमुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. यादरम्यान मंत्र्यांनी व्हिडीओमध्ये दिसणारी अभिनेत्री सनी लिओनीला (Sunny Leone) गाण्याबद्दल माफी मागावी आणि तिचे ‘मधुबन’ गाणे 3 दिवसांत मागे घ्यावे, अन्यथा तिच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला होता.
नरोत्तम मिश्रा यांच्याकडून मिळालेल्या या इशाऱ्यानंतर सारेगामाने सोशल मीडियावर अधिकृत निवेदन जारी केले आहे. म्युझिक लेबलने आपल्या निवेदनात लिहिले आहे की, आपल्या देशवासीयांच्या अलीकडील प्रतिक्रिया आणि भावनांचा आदर करून आम्ही मधुबन गाण्याचे नाव आणि बोल बदलू. येत्या 3 दिवसात सर्व प्लॅटफॉर्मवर जुन्या गाण्याऐवजी नवीन गाणे सादर केले जाईल.
विशेष म्हणजे हे गाणे 22 डिसेंबरला रिलीज झाले होते. ते समोर येताच वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. या गाण्याबाबत मध्य प्रदेश सरकारचे प्रवक्ते नरोत्तम मिश्रा म्हणाले होते की, हिंदू राधा मातेची पूजा करतात आणि या गाण्याने लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
यापूर्वी वृंदावनचे संत नवल गिरी महाराज यांनीही या गाण्यावर कारवाई करण्याची मागणी सरकारकडे केली होती. सरकारने अभिनेत्रीवर कोणतीही कारवाई केली नाही आणि व्हिडीओ अल्बमवर बंदी घातली नाही, तर आम्ही त्याविरोधात न्यायालयात जाऊ, असे ते म्हणाले होते. अभिनेत्रीने तिचे सीन काढून टाकले पाहिजेत, तसेच माफी मागितली नाही तर तिला देशात राहू दिले जाणार नाही, असेही महाराज म्हणाले.
‘मधुबन’ हे गाणे प्रसिद्ध गायिका कनिका कपूर आणि गायक अरिंदम चक्रवर्ती यांनी गायले आहे. त्याचबरोबर सुप्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. 1960 मध्ये आलेल्या कोहिनूर चित्रपटातील ‘मधुबन में राधिका नाचे रे’ या गाण्याचे सुरुवातीचे बोल जुळतात. हे गाणे दिवंगत गायक मोहम्मद रफी यांनी गायले होते आणि दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांच्यावर ते चित्रित झाले होते.