सर्व भारतीयांचा डीएनए एकच : मोहन भागवत

सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे, तो कोणत्याही धर्माचा असो. हिंदू-मुस्लीम एकता ही एक भ्रामक कल्पना आहे, कारण हिंदू-मुस्लीम वेगळे नाही तर एकच आहेत, असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं. ते आज मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या कार्यक्रमात बोलत होते.

एखादी व्यक्तीवर गर्दीद्वारे हल्ला चढवणे म्हणजेच मॉब लिंचिंग प्रकार हिंदू धर्मविरोधी आहे. धर्माच्या नावाखाली मॉब लिंचिंग करणाऱ्यांवर कडक कारवाई केली पाहिजे. एकतेशिवाय देशाची प्रगती शक्य नाही. ऐक्याचा आधार राष्ट्रवाद आणि पूर्वजांचा गौरव असावा. आपण लोकशाही देशात राहतो, यावर हिंदू किंवा मुस्लिम यांचे वर्चस्व असू शकत नाही. केवळ भारतीयच वर्चस्व गाजवू शकतात, असं मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

मोहन भागवत यांनी पुढे म्हटलं की, राजकारण लोकांना एकत्र करू शकत नाही. राजकारण लोकांना एकत्र करण्यासाठीचं शस्त्र बनू शकत नाही, परंतु ते ऐक्य बिघडवण्याचे हत्यार बनू शकतं. आम्ही मतांच्या राजकारणात भाग घेत नाही. आमच्या देशात काय घडले पाहिजे याबद्दल काही कल्पना आहेत. आम्ही राष्ट्रीय हिताच्या बाजूने आहोत. हिंदू आणि मुस्लीम गेल्या 40 हजार वर्षांपासून एकत्र राहत आहेत. त्यामुळे धर्म कुठलाही असला तरी आपण भारतीय आहोत. त्यामुळे हिंदूंनी स्वतःची ओळख भारतीय म्हणून करून द्यावी, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.