राज्यमंत्री बच्चू कडू यांना
२ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा
राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना २ महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत प्रतिज्ञापत्र सादर करताना बच्चू कडू यांनी मुंबईतील फ्लॅटची माहिती लपवल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला. चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने हा निर्णय दिला. भाजपाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी निवडणूक आयोगाला आपल्या संपत्तीची माहिती देणारं प्रतिज्ञापत्र सादर केलं. यात त्यांनी त्यांच्या मुंबईतील फ्लॅटची कोणतीही माहिती दिली नव्हती.
दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्याच
शाळात परीक्षा केंद्र मिळण्याची शक्यता
राज्यातील दहावी बारावीच्या परीक्षांसाठी यावर्षी विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळा आणि महाविद्यालयात परीक्षा केंद्र मिळण्याची शक्यता आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी तसे संकेत दिले आहेत. शिक्षकांसोबत आयोजित केलेल्या बैठकीत त्यांनी हे संकेत दिले. ऑफलाईन परीक्षांबाबत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही शंका असल्यास शिक्षकांनी निरसन करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा लेखन सराव व्हावा. तसेच त्यांना परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा अंदाज यावा, यासाठी विद्यार्थ्यांसाठी प्रश्नावली उपलब्ध करण्यात आली आहे.
एसटी विलीनीकरणाचा अहवाल
सादर करण्यासाठी 7 दिवसांची मुदत
मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आणखी 7 दिवसांची वाढीव मुदत दिली आहे. एसटी विलीनीकरणाचा त्रिसदस्यीय अहवाल सादर करण्यासाठी वाढीव वेळ देण्यात यावी, असा अर्ज राज्य सरकारने केला होता. या अर्जावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने ही मुदतवाढ दिली आहे.
एसटी महामंडळाची राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावं, या मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून कर्मचारी हे संपावर आहेत. महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनकरण करता येईल का, यासाठीच्या अहवालासाठी राज्य सरकारला 12 आठवड्यांचा कालावधी देण्यात आला होता. मात्र तो 12 आठवड्यांचा वेळही काही दिवसांपूर्वीच संपला.
जास्त महत्त्वाचं काय आहे? देश
की धर्म? : न्यायालयाचा प्रश्न
देशभरात हिजाब प्रकरणावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मद्रास उच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. हिंदूंच्या मंदिरांमध्ये हिंदूंशिवाय इतर सगळ्यांना प्रवेश बंदी करण्याची मागणी करणारी याचिका मद्रास उच्च न्यायालयासमोर सुनावणीसाठी आली असता न्यायालयाने याचिकाकर्त्यांनाच फटकारलं आहे. “जास्त महत्त्वाचं काय आहे? देश की धर्म?” असा सवाल न्यायालयानं याचिकाकर्त्यांना केला आहे. हिजाब प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मद्रास न्यायालयाची ही टिप्पणी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
वाइनविक्री निर्णयाविरोधात
न्यायालयामध्ये जनहित याचिका
सुपर मार्केट तसेच वॉक इन स्टोअरमधून वाइनविक्रीची परवानगी दिल्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे राजकीय वातावरण तापलेले असतानाच आता सरकारच्या या निर्णयाविरोधात न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आलीय. सरकारचा निर्णय व्यसनमुक्ती धोरणाविरोधात असल्याचा दावा याचिकाकर्त्याने केलाय. महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाने घेतलेल्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आलीय.
कळसूबाई शिखरावर जाण्यासाठी
रोपवे उभारले जाणार
राज्यातील सर्वात उंच शिखर असणाऱ्या कळसूबाई शिखरावर जाण्यासाठी रोपवे करण्यासंदर्भात चाचपणी करण्यात येत आहे. या रोपवेबाबत प्राथमिक सर्वेक्षण अहवाल तयार करण्याच्या सूचना राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या आहेत. नगर व नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असणारे सह्याद्री पर्वत रांगेतील १ हजार ६४६ मिटर उंचीचे हे शिखर राज्यातील सर्वोच्च शिखर होय.
अभिनेत्री रवीना टंडनच्या
वडिलांचे निधन
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनचे वडील आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रवी टंडन यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले आहे. आज पहाटे ३.३० वाजता त्यांच्या मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. रवीनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही दुःखद बातमी चाहत्यांना दिली आहे. रवीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत ही दुःखद बातमी चाहत्यांना दिली आहे.
लता मंगेशकर यांच्या
अस्थींचे रामकुंडात विसर्जन
गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या अस्थींचे नाशिमध्ये गोदातीरावरील रामकुंडात विसर्जन करण्यात आले. यावेळी मंगेशकर कुटुंबीय उपस्थित होते. आठ दशकांहून अधिक काळ संगीत विश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या गानकोकिळा लता मंगेशकर यांनी वयाच्या 93 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर जवळपास महिनाभर त्या हॉस्पिटलमध्ये होत्या. लतादीदी उपचाराला प्रतिसादही देत होत्या, मात्र त्यांची तब्येत शनिवारी अचानक बिघडली. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. रविवारी सकाळी 8.12 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
शाळेत हिजाब घालून येण्याला
हेमा मालिनी यांचा विरोध
भाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी शाळेत हिजाब घालून येण्याला विरोध केला आहे. त्या म्हणाल्या की, “शाळा आणि महाविद्यालयं ही शिक्षणासाठी असतात. त्यामुळे धर्मिक गोष्टी शाळेत घेऊन जाणं योग्य नाही. प्रत्येक शाळेचा एक गणवेश असतो आणि त्याचा सन्मान सर्वांनी करायला हवा. शाळेच्या बाहेर तुम्हाला जे काही घालायचं आहे ते घालण्याचा तुम्हाला स्वातंत्र्य आहे. पण शाळेत तुम्ही गणवेशच घालायला हवा”, असं हेमा मालिनी म्हणाल्या आहेत.
फोर्ब्सच्या यादीत अभिनेत्री जन्नत जुबेर
टीव्ही अभिनेत्री जन्नत जुबेर सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. यामुळे तिच्या लोकप्रियेत वाढ होत आहे. तिचे फॅन्स फॉलोअर्स वाढत आहे. अलीकडे तिचे इन्स्टाग्रामवर 4 कोटी फॉलोअर्स झाले आहेत. कमी वयात तिने फोर्ब्सच्या अंडर 30 आशिया यादीत आपले स्थान पटकावले आहे. तिने स्वतः ही माहिती दिली. 4 कोटी फॉलोअर्स झाल्यानंतर जन्नत हिच्या आनंदाला पारावार उरला नाही.
SD social media
9850 60 35 90