यंदाच्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा शिकण्याचा आनंद आता द्विगुणीत होणार आहे. पहिलीपासूनच विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाचे एकात्मिक द्विभाषिक पाठ्यपुस्तक आता इयत्ता पहिलीमधील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्यामुळे आता येणाऱ्या जूनमध्ये लाखो विद्यार्थ्यांच्या हातात ‘सृजन बालभारती’चे पुस्तक मिळणार आहे. या पुस्तकामुळे प्राथमिक शाळेतील आणि वय वर्षे आठपर्यंत असणाऱ्या विद्यार्थ्यांना आता एकाच वेळी अनेक भाषा शिकण्याची संधी मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने ‘सृजन बालभारती’ या एकात्मिक पाठ्यपुस्तकाची निर्मिती केली आहे. द्विभाषिक दृष्टिकोन, एकात्मिक कला आणि एकात्मिक क्रीडा दृष्टिकोन, तसेच नवीन शैक्षणिक धोरणावर आधारित या एकात्मिक पाठ्यपुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे.
हे पाठ्यपुस्तक 2020-21 मध्ये राज्यातील 66 तालुक्यातील शाळांना प्रायोगिक तत्त्वावर दिले जाणार आहे. त्यानंतर राज्य सरकारच्या 5 मार्च 2012 च्या निर्णयानुसार राज्यातील 488 आदर्श शाळांपैकी 380 ते 388 मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून पहिलीच्या वर्गासाठी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे एकात्मिक द्विभाषिक पुस्तकाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
तसेच सर्व मराठी आणि उर्दू शाळांमध्येही आंतरराष्ट्रीय दर्जाचे एकात्मिक द्विभाषिक पाठ्यपुस्तक दिले जाणार आहे. अन्य बोर्डाच्या अभ्यासक्रमाचा अभ्यास करून तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार या नव्या पाठ्यपुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे.
या पुस्तकासाठी शासन निर्णयाच्या प्रतीक्षेत असून अधिकृत निर्णय आल्यानंतरच पाठ्यपुस्तकाच्या छपाईचे प्रत्यक्ष काम सुरू केले जाणार आहे.