कोरोनाचा तिसरी लाट पूर्णपणे ओसरली असून कोरोनाचे निर्बंधही कमी करण्यात आले आहेत. त्यानंतर यंदाच्या दहावी , बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षाही ऑफलाईन घेण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता विद्यापीठाच्या तसेच महाविद्यालयातील विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षाही ऑफलाईन घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या यापुढच्या परीक्षा ऑफलाइन घेण्याचा निर्णय काही दिवसांत घेतला जाणार असल्याचे सूतोवाच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले आहे. त्यामुळे आता विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाइन होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे ऑनलाईन परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन परीक्षा द्यावी लागणार आहे.
कोरोना काळात सर्वच विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली . मात्र सद्यस्थितीला कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने विद्यार्थ्यांची ऑफलाईन परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी शिक्षण तज्ज्ञांनी केली होती. अनेक पालकांनीही या मागणीला दुजोरा दिला आहे. ऑफलाईन परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण , परीक्षा याबाबत वाढत चाललेला निष्काळजीपणाला आळा बसणार आहे.
उदय सामंत यांनी एका कार्यक्रमात ऑफलाइन परीक्षेसंदर्भात राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. सध्या करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे आता ऑफलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय येत्या काही दिवसांत घेतले जाणार असल्याचे कार्यक्रमात सांगितले. एवढेच नव्हे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ऑफलाइन परीक्षेसाठी सज्ज राहावे, असेही आवाहन केले आहे. त्यावरून आता ऑफलाइन परीक्षांचा निर्णय लवकरच उच्च शिक्षण विभागाकडून जाहीर होणार असल्याचे संकेत मिळत आहे. या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.