येत्या शनिवारपासून उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी तर रविवार आणि सोमवारी विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच याचाच परिणाम उत्तर कोकणावरही अपेक्षित आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईमध्ये ढगाळलेले आभाळ दिसू लागले आहे. तसेच पूर्वेकडून येणारे वारे आणि उत्तर-दक्षिण ढगांची द्रोणीय स्थिती यामुळे राज्यात काही भागांमध्ये ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबईतील परिस्थिती –
मुंबईच्या किमान तापमानाचा पारा गुरुवारी 21 ते 22 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवला गेला. सांताक्रूझ येथे 24 तासांमध्ये किमान तापमानात 2.1 अंशांची वाढ नोंदली गेली. सांताक्रूझ येथे किमान तापमान 21.6 तर कुलाबा येथे 22.7 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. सांताक्रूझ येथील किमान तापमान सरासरीपेक्षा 1.6 अंशांनी अधिक होते. तर कुलाबा येथील किमान तामपान 1 अंशाने सरासरीपेक्षा अधिक होते. ढगांच्या द्रोणीय स्थितीमुळे आणि उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे ही परिस्थिती होती.
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार शनिवार आणि रविवारी धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक हलक्या सरी, मेघगर्जना याचा अंदाज आहे. अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यांमध्ये रविवारी आणि सोमवारी हलक्या सरींची शक्यता आहे. सोमवारी ठाणे जिल्ह्यातही हलक्या स्वरुपातील पाऊस पडू शकतो. तर मुंबईमध्ये मात्र ढगाळ वातावरण असले तरी अद्याप पावसाचा अंदाज वर्तवलेला नाही. रविवार आणि सोमवार या दोन दिवसांमध्ये मराठवाड्यात औरंगाबाद आणि जालना येथेही हलक्या सरींची शक्यता आहे. याचा प्रभाव विदर्भात मात्र वाढू शकतो.
याठिकाणीही पाऊस पडणार –
राज्यात अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा येथे रविवार आणि सोमवारी मेघगर्जनेसह वीजा आणि हलक्या सरींची तुरळक ठिकाणी शक्यता आहे. तर भंडारा, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, यवतमाळ येथेही मेघगर्जनेसह विजा आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. रविवारी आणि सोमवारसाठी विदर्भात पिवळ्या रंगातील इशारा म्हणजे वातावरणाकडे लक्ष ठेवून राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
तर केवळ मुंबईच नाही तर कोकण विभागात तसेच मध्य महाराष्ट्रात काही केंद्रांवर किमान तापमानामध्ये 24 तासांमध्ये वाढ दिसून आली आहे. डहाणू येथे 2.3, हर्णे येथे 2.5 तर रत्नागिरी येथे 24 तासांमध्ये किमान तापमान 3.1 अंशाने वाढले. तर पूर्वेकडील वारे आणि ढगांच्या द्रोणीय प्रणालीमुळे किमान तापमानात वाढ नोंदवली गेली. मध्य महाराष्ट्रात गुरुवारी किमान तामपानाचा पारा 20 अंशांखाली बहुतांश ठिकाणी असला तरी जळगाव येथे 24 तासांमध्ये किमान तापमान 2.3 अंशांनी वाढले. सकाळच्या वेळी आर्द्रतेचे प्रमाण जळगाव येथे 80 टक्के नोंदवले गेले.