मुलाच्या वैमनस्यामुळे त्याच्या वडिलांचाच घात झाल्याची घटना शिरूर तालुक्यातील बाभुळसर येथे घडली. आरोपींनी मुलगा असल्याचे समजून अंधारामध्ये त्याच्या वडिलांचाच धारदार शस्त्राने वार करून खून केला. पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत या प्रकरणाचा छडा लावला. अटक आरोपीच्या जबाबातून चुकीच्या व्यक्तीच्या खुनाची ही बाब समोर आली.
जालिंदर सुदार ढेरे (वय ५०, रा. बाभुळसर खुर्द) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी निखिल थेऊरकर ( रा. कर्डे, ता. शिरूर) याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने १२ मे पर्यंत त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे. रांजणगावचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी याबाबतची माहिती दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाभुळसर खुर्द येथे ५ मे रोजी रात्री नऊच्या सुमारास जालिंदर ढेरे हे त्यांच्या घरासमोरील ओट्यावर अंथरूण टाकून झोपले होते. ते झोपेत असतानाच आरोपीने त्यांच्यावर धारदार हत्याराने वार केले. त्यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत अर्चना जालिंदर ढेरे यांनी फिर्याद दिली होती. घटनेबाबत ठोस पुरावा नव्हता. घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांनीही घटनास्थळाला भेट दिली होती. पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तपास सुरू केला.
रांजणगाव पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने समांतर तपास सुरू केला असता पोलिसांना या प्रकरणात गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला असता काही धागेदोरे जुळून आले. त्याआधारे निखिल थेऊरकर याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे, पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे, विनोद शिंदे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, विलास आंबेकर, विजय शिंदे, उमेश कुतवळ, वैभव मोरे, वैजनाथ नागरगोजे, विजय सरजिने, माऊली शिंदे यांनी या प्रकरणाचा छडा लावला.
खून झालेले जालिंदर ढेरे यांचा मुलगा उत्कर्ष ढेरे आणि आरोपी निखिल थेऊरकर यांची ओळख आहे. काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये एका व्यक्तीवर हल्ला करण्याबाबत फोनवर संभाषण झाले होते. ते संभाषण उत्कर्ष याने हल्ला करण्याचे नियोजन असलेल्या व्यक्तीसह इतरांना पाठविले होते. त्यामुळे उत्कर्ष आणि निखिल यांच्यात तीव्र वाद झाला होता. त्यातूनच निखिल याने उत्कर्षला मारण्याचा कट रचला. घटनेच्या दिवशी रात्री तो कोयता घेऊन उत्कर्षच्या घरी गेला. दारासमोरील ओट्यावर उत्कर्षचे वडील जालिंदर ढेरे झोपले होते. त्या वेळी बाहेर अंधार होता. झोपलेली व्यक्ती उत्कर्ष असल्याचे समजून निखिलने जालिंदर ढेरे यांच्यावरच कोयत्याने वार केले.