आज टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिला हॉकी संघ सेमीफायनल्सचा सामना अर्जेंटीनासोबत खेळणार आहे.
भारतीय पुरुष हॉकी संघाला सेमीफायनल्सच्या सामन्यात बेल्जियमकडून पराभव पत्करावा लागला होता. तेव्हापासून सर्वांच्या नजरा महिला हॉकी संघाकडे लागून राहिल्या आहे. देशातील प्रत्येक जण आज यांच्या विजयासाठी प्रार्थना करत आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघानं इतिहास रचला आहे. दिग्गज ऑस्ट्रेलियाला नमवून भारतीय संघानं पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. अशातच भारतीय महिला हॉकी संघ सुवर्णपदकापासून केवळ दोन पावलं दूर आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार आज दुपारी 3.30 वाजता सुरु होणार आहे.
ऑलिम्पिक सुवर्णपदकापासून संघ केवळ दोन पावलं दूर
भारतीय महिला हॉकी संघ ऑलिम्पिक सुवर्णपदकापासून केवळ दोन पावलं दूर आहे. दरम्यान, यापूर्वी त्यांना फायनल्स गाठण्यासाठी सेमीफायनल्समध्ये अर्जेंटीनावर मात करावी लागेल. सध्या भारतीय महिला संघानं इथपर्यंत पोहोचण्यासाठी तीन वेळचा चॅम्पियन संघ ऑस्ट्रेलियाला 1-0 अशा फरकानं पराभूत करत माघारी धाडलं आहे.