मंगळवारपासून (३ ऑगस्ट) बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी२० मालिकेला मिरपूर येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर सुरुवात झाली. मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान बांगलादेशने ऐतिहासिक कामगिरी करत पाहुण्या ऑस्ट्रेलियावर २३ धावांनी मात केली. चार बळी घेणाऱ्या नसूम अहमदला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला चारली धूळ
या मालिकेसाठी नेतृत्व करत असलेला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय मिचेल स्टार्क व जोस हेझलवूड या अनुभवी वेगवान गोलंदाजांनी सार्थ ठरवत बांगलादेशचा डाव ७ बाद १३१ पर्यंत मर्यादित ठेवला.
बांगलादेशसाठी अनुभवी अष्टपैलू शाकिब अल हसनने सर्वाधिक ३६ तर, सलामीवीर मोहम्मद नईमने ३० भावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियासाठी हेझलवूडने तीन व स्टार्कने दोन बळी आपल्या नावे केले.
प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियाचे सुरुवात अतिशय खराब झाली. जोशुआ फिलीप, मोईजेस हेन्रिकेज व ऍलेक्स केरी धावफलकावर ११ धावा असताना माघारी परतले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव रुळावर आलाच नाही. अष्टपैलू मिचेल मार्शने ४५ धावा काढून संघाच्या विजयासाठी प्रयत्न केले. नसूम अहमदने चार तसेच, शोरीफुल इस्लाम व मुस्तफिझुर रहमान यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाचा डाव अखेरच्या चेंडूवर १०८ धावांवर आटोपला.
बांगलादेशची ऐतिहासिक कामगिरी
मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवत बांगलादेश संघाने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. त्यांनी आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात प्रथमच ऑस्ट्रेलियाला हरवले. यापूर्वी दोन्ही संघांमध्ये चार सामने झाले होते व त्या सर्व सामन्यांत विजय संपादन केलेला. विशेष म्हणजे हे सर्व सामने टी२० विश्वचषकातील होते. उभय संघांमधील ही पहिलीच द्विपक्षीय टी२० मालिका आहे. मालिकेतील दुसरा सामना ४ ऑगस्ट रोजी होईल.