IPS रवि सिन्हा होणार ‘रॉ’ चे नवे प्रमुख, मोदी सरकारचा निर्णय
IPS अधिकारी रवि सिन्हा यांना आता रॉ चे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. रवि सिन्हा हे छत्तीसगढ कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. रवि सिन्हा आत्तापर्यंत कॅबिनेट सचिवालयात विशेष सचिव या पदावर कार्यरत होते. ते आता रॉ या भारतीय गुप्तचर संस्थेचे प्रमुख असतील. काही वेळापूर्वीच ही घोषणा करण्यात आली. सध्याच्या रॉ चीफ सामंत गोयल यांची जागा ते घेतील. सामंत गोयल हे ३० जून रोजी निवृत्त होत आहेत. त्यानंतर रवि सिन्हा या पदावर बसतील आणि पुढची दोन वर्षे रॉचे प्रमुख म्हणून काम करतील.चीन आणि भारत यांच्यात काहीसं तणावाचं वातावरण असताना अत्यंत महत्त्वाची जबाबदारी ही रवि सिन्हा यांना देण्यात आली आहे. गुप्त माहिती आधुनिक तंत्राच्या मदतीने काढण्यात त्यांचा हातखंडा आहे. रवि सिन्हा हे सध्या कॅबिनेट सचिवालयात विशेष पदावर कार्यरत आहेत. कॅबिनेटने त्यांच्यावर आता नवी जबाबदारी सोपवली आहे. १ जुलैपासून रवि सिन्हा पुढची दोन वर्षे रॉ या भारताच्या गुप्तचर संस्थेचे प्रमुख म्हणून कार्यरत असतील.
खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख हरदीप सिंगचा गोळ्या घालून खून
खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख आणि दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याचा गोळ्या झाडून खून करण्यात आला आहे. कॅनडातील गुरूद्वारा परिसरात दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हरदीप सिंग निज्जर याच्यावर गोळ्या झाडल्या. यानंतर निज्जरला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.४६ वर्षीय हरदीप सिंग निज्जर या मूळचा जालंधरमधील भरसिंगपुरा येथील रहिवाशी आहे. पण, अनेक वर्षापासून तो कॅनडात राहत होता. पंजाबमधील अनेक हिंदू नेत्यांच्या हत्येमागे हरदीप सिंग निज्जरचा हात होता. भारतविरोधी कारवायांसाठी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना हत्यारे आणि पैसे पुरवण्याचं काम निज्जर करत असे.
शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच… पक्षप्रवेशानंतर मुख्यमंत्र्यांची मनिषा कायंदेंना मोठी जबाबदारी!
शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या एक दिवस आधी उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसला आहे. विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर मनिषा कायंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला, सोबतच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंही कौतुक केलं. तसंच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे संघटनात्मक काम द्यावं अशी मागणी केली.पक्षबांधणीमध्ये मी योगदान देऊ इच्छिते, शिंदे साहेब मला जबाबदरी देतील, अशी अपेक्षा मनिषा कायंदे यांनी व्यक्त केली. मनिषा कायंदे यांची ही मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केली. मनिषा कायंदे यांची शिवसेना सचिव म्हणून नियुक्ती करण्याची घोषणाही एकनाथ शिंदे यांनी केली. ‘आपण आमदार, प्रवक्त्या आहातच पण सचिव म्हणूनही काम करा. शिवसेनेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच महिलेला सचिव म्हणून संधी दिली आहे. मनिषाताईंना मोकळेपणाने काम करण्याची संधी द्यायचा निर्णय घेतला आहे,’ असं मुख्यमंत्री म्हणाले.
ठाकरे गटातील घडामोडींमुळे मोठ्या नेत्याचं पद धोक्यात, अजितदादांनीही टाकली गुगली
विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे आता शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत दाखल झाल्यामुळे विधान परिषदेतील ठाकरेंच्या पक्षाचं संख्याबळ घटलंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या समान झाली आहे, त्यामुळे आता विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेतेपदावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून दावा सांगितला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.मनिषा कायंदे यांनी शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु झाल्याची चर्चा आहे. सध्या विधान परिषदेचं विरोधीपक्ष नेतेपद हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहे. अंबादास दानवे यांच्याकडे परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी आहे. मात्र आमदार मनिषा कायदेंनी उद्धव ठाकरेंच्या पक्षाला जय महाराष्ट्र केल्यामुळे विधान परिषदेतील ठाकरेंच्या शिवसेनेचं संख्या बळ एकने कमी झालं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची संख्या समान झाली आहे.
खेळता खेळता मुलं कारमध्ये बसली अन्.. एकाचवेळी तिघांचा मृत्यू
तुमच्या मुलाला बंद कारमध्ये बसून खेळण्याचा छंद असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. नागपुरात घडलेल्या एका अशाच घटनेने आई वडिलांनी आपल्या चिमुकल्यांना कायमच गमावलं आहे. सहा वर्षे वयोगटातील दोन मुले आणि एक मुलगी खेळताना घराच्या परिसरात ठेवलेल्या कारमध्ये बसले. कार नादुरुस्त असल्याने त्यांना कारच्या बाहेर पडता न आल्याने तीन मुलांचा गुदमरल्याने मृत्यू झाला.शनिवारी सायंकाळी ही तीनही मुले टेका नाकाजवळील फारुख मैदानावर खेळत होती. रात्र झाली तरीही मुले घरी न परतल्याने पालकांनी शोधाशोध केली. पालकांनी पोलिसांत तक्रार केली. शोध सुरू होता. मुलांचा शोध लागत नसल्याने पोलिसांनी पुन्हा फारुखनगरात शोधणे सुरू केले. काल रात्री आठ वाजता एका कारमध्ये तीनही मुले बेशुद्धावस्थेत मिळून आले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पुन्हा नवा सर्व्हे, मुख्यमंत्रिपदी फडणवीसांना पसंती, भाजपला इतक्या जागा मिळणार!
राज्यातील सर्व राजकीय पक्षांकडून आगामी निवडणूकांची जोरदार पूर्वतयारी केली जात आहे. लोकसभा आणि विधानसभेसाठी राजकीय पक्षांमध्ये हलचालींना वेग आलाय. यादरम्यान महाराष्ट्रात सद्यस्थितीत विधानसभा निवडणुका झाल्या तर कोणता पक्ष बाजी मारेल याबद्दलचा एक सर्व्हे समोर आलाय. ‘न्यूज एरिना इंडिया’ या संस्थेने केलेल्या सर्व्हेत महाराष्ट्रामध्ये भाजपला तब्बल सव्वाशे जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय, तर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना सर्वाधिक पसंती देण्यात आली आहे. सर्व्हेमध्ये भाजपला सर्वाधिक 123 ते 129 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर शिवसेना आणि भाजप युती बहुमताचा आकडा सहज पार करतील असंही हा सर्व्हे सांगतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात शिवसेनेला 25, राष्ट्रवादी काँग्रेसला 55 ते 56 आणि काँग्रेसला 50 ते 53 जागा मिळतील असा सर्वेचा अंदाज आहे, तर उद्धव ठाकरेंच्या गटाला अवघ्या 17 ते 19 जागा मिळतील असं सर्व्हे सांगतोय. अपक्ष आणि इतर पक्षांना 12 जागा मिळण्याचा अंदाज आहे. पण या अपक्षांचा कलही बहुतांश भाजपकडे असेल असं बोललं जातंय. मुख्य म्हणजे महाराष्ट्राच्या मनातला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना सर्वाधिक पसंती मिळाली आहे.
माऊलींच्या दर्शनासाठी लोटला मोठा महासागर
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजाचा पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरीच्या वारीला निघालेला पालखी सोहळा दोन दिवसाच्या मुक्कामासाठी लोणंदला विसावला आहे,माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातून मोठा महासागर लोटला आहे.आळंदीहून पांडुरंगाच्या भेटीसाठी आतुर होऊन निघालेला वैष्णवांचा या मेळा टाळ -मृदुंग व हरीनामाचा गजरात लोणंद नगरीत विसावला आहे.ज्ञानियाचा राजा असलेल्या माऊलीचा पालखी सोहळा लाखो वारकऱ्यासह आला असुन माऊलीच्या पालखी सोहळयामुळे अवघी लोणंदनगरी भक्तीरसात ओलीचिंब भिजली आहे. लोणंदनगरीत माऊलीच्या दर्शनासाठी भाविकांची जनसागर लोटला दर्शनाच्या रांगा १ कि मी पर्यत लागल्या आहेत, शहरात वारकऱ्याकडुन सुरु असलेला टाळमृदुंगाचा गजर,भाविक करत असलेला माऊली माऊलीचा जयघोष यामुळे अवघी लोणंदनगरीच पंढरी झाली आहे.लोणंद मुक्कामी राज्यभरातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली असुन लाखो भाविकांनी माऊलीच्या चरणी माथा टेकुन दर्शनाचा लाभ घेत आहेत. माऊलींच्या चरणावर माथा टेकवल्यावर माऊली भेटीचा आनंद भाविकांच्या चेहऱ्यावर दिसत आहे.
MPSC उत्तीर्ण केलेल्या दर्शना पवारचा राजगडाच्या पायथ्याशी आढळला मृतदेह
पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील राजगड किल्ल्याजवळ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण केलेल्या तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. तिने एमपीएससीतून राज्य वन सेवेची परीक्षा उत्तीर्ण केली होती. प्रशासकीय सेवेत रुजू होण्यापूर्वी तिचा करुण अंत झाला आहे. दर्शना दत्तू पवार (वय २६, रा. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव) असं मृत तरुणीचं नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत दर्शना पवार गेल्या काही वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. अभ्यासासाठी ती अनेकदा पुण्यात येत होती. तिने नुकतीच ‘रेंज फॉरेस्ट ऑफिसर’ (RFO) या पदासाठीची परीक्षा उत्तीर्ण केली. तिने मिळवलेल्या यशाबद्दल पुण्यातील खासगी अकादमीने ११ जून रोजी तिच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. यानिमित्त दर्शना ९ जून रोजी पुण्यात आली होती.
वर्ल्ड चॅम्पियनला हरवून भवानी देवीने रचला इतिहास, पदक जिंकणारी पहिली भारतीय
भारताची तलवारबाज भवानी देवीने इतिहास रचला आहे. आशियाई तलवारबाजी चॅम्पियनशिपमध्ये, भवानीने या खेळातील विद्यमान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनला पराभूत करून देशाला पहिले पदक मिळवून दिले आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्येही भवानीची कामगिरी दमदार होती, पण ती पदकापासून वंचित राहिली.भारतीय तलवारबाज भवानी देवीने सोमवारी इतिहास रचला. खरं तर, भवानी देवीने चीनमधील वूशी येथे झालेल्या आशियाई तलवारबाजी चॅम्पियनशिपच्या महिला सेबर स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. मात्र उपांत्य फेरीच्या सामन्यात भवानी देवीला पराभवाला सामोरे जावे लागले, मात्र असे असतानाही भवानी देवीने इतिहास रचला. या स्पर्धेतील भारताचे हे पहिलेच पदक आहे.
SD Social Media
9850 60 3590