माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत दाखल करण्यात आले आहे. डॉ. सिंग यांना ताप आला होता आणि अशक्तपणा जाणवत होता.
त्यामुळे त्यांना तातडीने एम्समध्ये हलवण्यात आले होते. त्यांना डेंगीची लागण झाली असून, त्यांची प्रकृती सुधारत आहे, अशी माहिती एम्सने दिली आहे.
डॉ.मनमोहनसिंग यांना डेंगीची लागण झाली आहे. त्यांची प्रकृती सुधारत आहे. त्यांचा प्लेटलेट काऊंटही वाढत आहे, अशी माहिती एम्सच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. डॉ.सिंग यांना ताप आणि अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे त्यांना 13 ऑक्टोबरला तातडीने एम्समध्ये हलवण्यात आले होते. रुग्णालयातील कार्डिओ-न्युरो सेंटरमधील वॉर्डमध्ये डॉ.सिंग यांच्यावर उपचार सुरू आहेत. हृदयरोगतज्ञ डॉ.नितीश नाईक यांच्या नेतृत्वाखालील पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.
डॉ. सिंग यांना याच वर्षी कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेत ते कोरोनाबाधित झाले होते. त्यांना 19 एप्रिलला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते कोरोनाशी यशस्वी झुंज देऊन 29 एप्रिलला रुग्णालयातून बाहेर पडले होते. मागील वर्षी मे महिन्यात डॉ. सिंग यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर कार्डिओ थोरॅसिक विभागात उपचार सुरू होते. डॉ. सिंग यांच्यावर 2009 मध्ये ‘एम्स’मध्येच बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती. डॉ.मनमोहनसिंग हे 89 वर्षांचे आहेत. ते राज्यसभा सदस्य आहेत. ते राजस्थानमधून राज्यसभेवर गेले आहेत.