२० जूनला तुकाराम महाराज तर २१ जूनला
ज्ञानेश्वर महाराजांची पालखी प्रस्थान करणार
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याच्या तारखा नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत. २० जून रोजी तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सुरू होणार आहे. तर २१ जून रोजी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. दोन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रचंड उत्साहाने वारकरी देहू नगरीत दाखल होतील, अस देहू संस्थानाकडून सांगण्यात आलं आहे.
काढलेले भोंगे लावण्याची हिंमत कुणी
करू नये : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
उत्तर प्रदेशमध्ये स्वतः मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात तब्बल एक लाख भोंगे उतरवले गेले असल्याचं सांगितलंय. राज्यात आतापर्यंत एक लाख भोंगे उतरवले गेले असून पुन्हा भोंगे लावण्याची हिंमत कुणी करू नये, असा इशारा योगींनी दिलाय. तसेच काढून टाकलेले लाऊडस्पीकर पुन्हा लावले जाऊ नयेत, याची काळजी घेण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर सोपवली आहे. काढलेले भोंगे पुन्हा लावल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असं योगी आदित्यनाथ म्हणाले
मध्यमवर्गीय कुटुंबांच्या भल्यासाठी काँग्रेस
पक्षच काम करतो : राहुल गांधी
घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरवाढीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या भल्यासाठी काँग्रेस पक्षच काम करतो, असे ते म्हणाले आहेत. राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये घरगुती सिलिंडरच्या किमतींची तुलना केली आहे. त्यांनी सांगितले की काँग्रेसच्या काळात २०१४ पर्यंत एलपीजी सिलिंडरची किंमत ८२७ रुपये अनुदानासह ४१० रुपये होती, तर २०२२ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये ती ९९९ रुपयांपेक्षा जास्त आहे, सबसिडी देखील शून्य आहे.
गव्हाचे पीठ महाग होऊ देणार नाही, प्रसंगी
कपडे विकण्याची तयारी : शाहबाज शरीफ
पाकिस्तानातील गव्हाचे उत्पादन यावर्षी सुमारे ३० लाख टनांनी कमी होण्याचा अंदाज आहे. अशा स्थितीत गव्हाच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. कोणत्याही परिस्थितीत गव्हाचे पीठ महाग होऊ देणार नाही. यासाठी मला माझे कपडे विकावे लागले तरी चालेल, असे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी म्हटले आहे. खैबर पख्तुनख्वाच्या शांगला जिल्ह्यातील बिशाम तहसीलमध्ये पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज (पीएमएल-एन) च्या जाहीर सभेला संबोधित करताना शरीफ यांनी प्रांतातील गव्हाच्या किमती कमी करण्याचे आश्वासन दिले.
मुंबई पालिकेतील शिवसेनेची
भ्रष्टाचाराची लंका नष्ट करू : नवनीत राणा
खासदार नवनीत राणा यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली. “मी पूर्ण ताकदीने मुंबई पालिका निवडणुकीत उतरेल आणि पालिकेतील शिवसेनेची भ्रष्टाचाराची लंका नष्ट करू,” असं मत नवनीत राणा यांनी व्यक्त केलं. त्या रविवारी (८ मे) मुंबईतील लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पत्रकारांशी बोलत होत्या.
राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या पाठीत
खंजीर खुपसला : रामदास आठवले
“राज ठाकरे हा कोणाचंही न ऐकणारा नेता असून त्यांच्या भूमिकेला भाजपाचा पाठिंबा नाही,” असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. रविवारी सांगली येथे पार पडलेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी हे विधान केलं. राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला, असंही ते यावेळी म्हणाले. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून बाळासाहेबांना धोका दिला आहे. त्यामुळे बाळासाहेबांचं नाव घेण्याचा त्यांना अधिकार नाही. अंगावर त्यांनी भगवे वस्त्र धारण केलं, ते चांगलं आहे. पण राज ठाकरेंनी शांततेची भूमिका घ्यावी.
गुणरत्न सदावर्ते एसटी मंडळाच्या
बँकेची निवडणूक लढविणार
वकील गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी महामंडळाच्या बँकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात रणशिंग फुंकण्याची घोषणा केली आहे. एसटी महामंडळाच्या बँकेवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित संघटनेची सत्ता आहे. या संघटनेच्या विरोधात सदावर्तेंनी घोषणा केलेली संघटना निवडणूक लढणार आहे. सदावर्तेंच्या राजकीय एन्ट्रीची ही पहिली पायरी तर नाही ना असा प्रश्न आता विचारला जातोय. गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “बँक ही सहकार क्षेत्र आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एक व्यक्ती, एक पद याप्रमाणे बँक, मत आणि उमेदवारीची प्रक्रिया निश्चित केलीय. बँक कोणाच्या बापाच्या घरची नाही. बँकेत कोणाला भ्रष्टाचार करण्यास मोकळीक दिलेली नाही.
दारू चढत नाही, थेट
गृहमंत्र्यांकडे केली तक्रार
लोकं नशेसाठी दारु पितात, पण दारुतच नशा नसेल तर … मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये एका मद्यपीसोबत असाच एक किस्सा घडला आहे. दारु चढली नाही म्हणून मद्यपीने थेट राज्याच्या गृहमंत्र्यांनाच तक्रार केली आहे. एवढच नाही तर, त्याने उत्पादन शुल्क कार्यालयात दारुच्या दोन बाटल्याही पुरावा म्हणून दिल्या आहेत. लोकेंद्र सेठिया असं मद्यपीचं नाव असून देसी दारुच्या दुकानातून दारु खरेदी केली. मात्र 2 बाटल्या पिऊनही दारु चढत नसल्याने मद्यपीने थेट उत्पादन शुल्क कार्यालय गाठलं. विक्रेत्याविरोधात कारवाई करावी अशी मद्यपीने मागणी केली .
SD social media
9850 60 35 90