मुंबईतील जुहू बीचवर गोल्डमॕन गँगकडून धिंगाणा घालण्यात आला. नाईट कर्फ्यू असतानाही रात्री बारा वाजताच्या सुमारास या टोळीतील सदस्यांनी धुडगूस घातला. दहा ते बारा गाड्यांमधून जवळपास 50 जणांनी जुहू चौपाटी परिसरात धिंगाणा घातला. गळ्यात सोन्याच्या जाडजूड चेन घातलेल्या या गोल्डमॅन गँगला पाहून सर्वच जण अवाक झाले होते.
10 ते 12 गाड्या, 50 जणांचा धुडगूस
मुंबईत रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू आहे. मात्र जुहू चौपाटीवर गुरुवारी रात्री 12 वाजताच्या सुमारास 10 ते 12 गाड्या दाखल झाल्या, त्यातून जवळपास 50 जण बाहेर पडले.
यात काही गोल्डमॅन देखील होते. गळ्यात सोन्याच्या जाडजूड चेन घातलेले काही जण आपल्या समर्थकांसोबत फिरताना दिसले.
सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्जा
नाईट कर्फ्यूमध्ये कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचं बघायला मिळालं. काही जणांनी मास्क घातला नव्हता, सोबतच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा देखील फज्जा उडवला आहे. दरम्यान, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मुंबई पोलीस यांच्यावर काय कारवाई करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबईत हुल्लडबाजांच्या टोळक्याकडून नासधूस
दुसरीकडे, वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या नावाखाली मुंबईतील घाटकोपर परिसरात 33 केक कापून हुल्लडबाजांच्या टोळक्याने नासधूस केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी तरुणांचं टोळकं मास्कशिवाय एकत्र जमलं होतं. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा तर वाजलेच. पण त्यानंतर हुल्लडबाजांच्या उन्मादाचं दर्शन घडलं. 15 ते 20 युवक या व्हिडीओमध्ये दिसत होते. एका टेबलवर ठेवलेले 33 केक आधी बर्थडे बॉयने कापले. त्यानंतर जमलेले तरुण अक्षरशः त्यावर तुटून पडले. कोणी केक एकमेकांना फेकून मारले, तर कोणी एकमेकांच्या चेहऱ्यावर फासले. त्यामुळे अन्नाची नासाडी झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबईतील घाटकोपर पश्चिम भागात असलेल्या लाल बहादूर शास्त्री मार्ग परिसरातील असल्याची माहिती आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उमटली आहे