रशियात धुमश्चक्री, वॅग्नर ग्रुपच्या बंडामुळे पुतिन संकटात
रशियानं युक्रेनविरोधात युद्ध पुकारल्यापासून सातत्याने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आक्रमक भूमिका घेताना दिसून आले. मात्र, युक्रेन युद्धानंतर पहिल्यांदाच पुतिन बॅकफूटवर गेल्याचं चित्र निर्माण झालं आहे. आपल्या विरोधकांचा सामना करण्यासाठी व्लादिमीर पुतिन यांनी तयार उभा केलेला वॅग्नर हा सशस्त्र सैनिकांचा ग्रुप आता त्यांच्याच विरोधात उभा ठाकला आहे. वॅग्नरनं रशियात बंड केलं असून रशियात नवीन राष्ट्राध्यक्षांची नियुक्ती करण्याची घोषणाच वॅग्नरचा प्रमुख झिबिग्नी प्रिगोझिव्ह यानं केली आहे. त्यामुळे एकीकडे पुतिन यांच्या अडचणी वाढत असताना त्यांनी अडचणीत टाकलेले युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी रशियातील परिस्थितीवर खोचक ट्वीट केलं आहे.
पाटण्यातील विरोधकांच्या बैठकीवर एमआयएमची नाराजी
केंद्रातील सत्ताधारी भाजपा सरकारविरोधात बिहारची राजधानी पाटणा येथे १५ विरोधी पक्षांची शुक्रवारी ( २३ जून) महाबैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार प्रफुल पटेल उपस्थित होते. तसेच ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही या बैठकीला उपस्थित होते. त्यांच्याबरोबर खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरेही त्या बैठकीला गेले होते. तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि विविध पक्षांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते. परंतु एआयएमआयएम पक्षाला या बैठकीचं निमंत्रण दिलं नव्हतं.
नोटांची बंडलं भरलेली खोकी शेजाऱ्यांच्या टेरेसवर फेकली; चित्रपटात शोभेल असा नाट्यमय छापा!
भ्रष्टाचारमुक्त भारत करण्यासंदर्भात सर्वच पक्षांची सरकारं त्यांच्या कार्यकाळात वेळोवेळी दावे करत आली आहेत. मात्र, अजूनही भ्रष्टाचाराला आळा घालण्यात कोणत्याही पक्षाच्या सरकारला पुरेसं यश आलेलं नाही. त्याचाच प्रत्यय नुकताच ओडिशामध्ये आला असून एका सरकारी अधिकाऱ्याकडे तपास अधिकाऱ्यांना कोट्यवधींचं घबाड सापडलं आहे. यावेळी एखाद्या चित्रपटात शोभतील अशा नाट्यमय घडामोडींनंतर या अधिकाऱ्याच्या तीन घरांमधून अधिकाऱ्यांनी रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि इतर संपत्ती जप्त केली आहे.ओडिशा प्रशासकीय सेवेतला वरीष्ठ अधिकारी प्रसांताकुमार रौतच्या नबरंगपूर जिल्ह्यातील घरी ओडिशा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे तपास पथकानं छापा टाकला. रौत सध्या नबरंगपूर जिल्ह्यात अतिरिक्त उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्त आहे. जिल्ह्यातील त्याच्या कानन विहारमधील घरी पोलिसांनी छापा टाकला. त्याचबरोबर त्याच्या भुबनेश्वरमधील घरी आणि इतर संबंधित ठिकाणीही पोलिसांनी छापा टाकून तब्बल ३ कोटींची रोकड जप्त केली.
शुक्रवारी ओडिशा पोलिसांच्या पथकानं ही छापेमारी केली. जेव्हा पोलीस रौतच्या घरी छापा टाकण्यासाठी गेले, तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी दरवाजाच उघडला नाही. त्याच्या भुबनेश्वरमधील घराला पोलिसांनी घेराव घातला. काही वेळाने त्याच्या टेरेसमधून शेजाऱ्यांच्या टेरेसवर काही खोके फेकण्यात आल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. पोलिसांनी तातडीने शेजाऱ्यांच्या घराच्या टेरेसवर धाव घेतली. फेकलेले खोके तपासले असता त्यातून ५०० रुपयांच्या नोटांची बंडलं सापडली. या ६ खोक्यांमधून पोलिसांना २ कोटी ३ लाखांची रोकड हाती लागली.
वॉशिंग्टन ते पटना; लोकसभेची रंगीत तालीम सुरू
आगामी लोकसभा निवडणुकीला अवघा एक वर्षाचा कालावधी उरला आहे. त्या पार्श्वभूमीवर २३ जून २०२३ रोजी घडलेल्या वॉशिंग्टन आणि पटना येथील दोन घटना महत्त्वाच्या ठरतात. पंतप्रधान नरेंद्र यांच्या स्वागतासाठी अमेरिकेत लाल गालिचा अंथरण्यात आला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यांनी मोदी यांचे स्वागत केले. फर्स्ट लेडी जिल बायडेन यांच्या देखरेखीखाली तयार करण्यात आलेले शाकाहारी जेवण आणि अमेरिका काँग्रेसमध्ये मोदी यांचे भाषण (काँग्रेसमध्ये दोनदा भाषण करणारे मोदी पहिले पंतप्रधान ठरले आहेत) झाले. तंत्रज्ञान, अंतराळ आणि संरक्षण करार, फायटर जेट्स इंजिन अशा अनेक विषयांवर भारत-अमेरिका दरम्यान करार झाले. हे सर्व त्या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली होत आहेत, ज्याला अमेरिकेने काही वर्षांपूर्वी व्हिजा नाकारला होता. मोदी यांचा अमेरिका दौरा हा काळजीपूर्वक रचलेला आणि प्रयत्नपूर्वक अमलात आणलेला दौरा आहे. हा दौरा २०२४ साठी भारतासाठी जितका महत्त्वाचा आहे, तितकाच तो द्विपक्षीय संबंधातील सुधारणांसाठीही महत्त्वाचा आहे.दुसरीकडे भारतात पटना येथे आणखी एक बैठक झाली, ज्याकडे देशाचे लक्ष लागले होते. बिहार, पटनामधून अनेक परिवर्तनवादी चळवळींनी जन्म घेतलेला आहे. जसे की, जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील बिहार चळवळीने १९७७ साली पंतप्रधान इंदिरा गांधी यांना सत्तेवरून खाली खेचले होते. २०१४ साली भाजपाला पराभूत करण्यासाठी देशातील १५ विरोधी पक्षांचे नेते पटना येथे एकवटले होते.
चेतेश्वर पुजारासाठी टीम इंडियाचे दरवाजे कायमचे बंद झाले?
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवारी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी कसोटी आणि एकदिवसीय संघांची घोषणा केली. या दोन्ही संघांमध्ये काही नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे चेतेश्वर पुजारा आणि उमेश यादव या सीनियर खेळाडूंना कसोटी संघातून वगळण्यात आले. त्यात पुजारा हे सर्वात मोठे नाव आहे. पुजाराचा फॉर्म गेल्या काही दिवसांपासून चांगला नाही. कौंटी क्रिकेटमध्ये तो धावा करत आहे, पण टीम इंडियासाठी त्याच्या बॅटमधून फारशा धावा निघालेल्या नाहीत. अशा स्थितीत निवड समितीने त्याला पुन्हा एकदा संघातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. अशा स्थितीत पुजारा पुन्हा संघाबाहेर असताना क्रिकेटच्या वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या की आता टीम इंडियाचे दरवाजे त्याच्यासाठी कायमचे बंद झाले आहेत का?
अखेर राज्यात मान्सून अवतरला! पुढचे पाच दिवस मनसोक्त कोसळणार
गेल्या जवळपास दोन आठवड्यांपासून जणूकाही रुसून बसलेला पाऊस अखेर अवतरला असून पुढचे पाच दिवस महाराष्ट्राच्या बहुतांश भागात तो सक्रीय राहणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यांची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. यासंदर्भात पुणे वेधशाळेचे प्रमुख के. एस होसाळीकर यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. या ट्वीटमध्ये होसाळीकर यांनी मुंबईतील कुलाबा वेधशाळेकडून जारी करण्यात आलेला तक्ताच शेअर केला आहे. त्यानुसार महाराष्ट्राच्या कोणत्या भागात कधी आणि किती प्रमाणात पाऊस पडेल, याविषयीचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत.
SD Social Media
9850 60 3590