रुग्णाला कोणत्याही परिस्थिती दाखल
करून घेण्यास नकार देता येणार नाही
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने करोना रुग्णांना दाखल करून घेण्याबद्दलच्या राष्ट्रीय धोरणात मोठे बदल केले आहेत. रुग्णांला दाखल करुन घेण्यासाठी पॉझिटिव्ह टेस्ट सक्तीची असणार नाही. त्याचबरोबर रुग्ण कोणत्याही शहरातील असला, तरी करोना संशयित रुग्णाला कोविड केअर सेंटर, पूर्णपणे कोविड समर्पित सेंटर वा पूर्णपणे कोविड रुग्णालयांनी संशयित रुग्णाच्या विभागात दाखल करुन घ्यावं. रुग्णाला कोणत्याही परिस्थिती दाखल करून घेण्यास नकार देता येणार नाही. ऑक्सिजन वा औषधी देण्यास सुद्धा नकार देता येणार नाही, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.
ऑनलाईन नोंदणी करणाऱ्यांना
ओटीपी बंधनकारक
केंद्र, राज्य सरकार प्रमाणेच खासगी क्षेत्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू झाल्यानंतर आता फसवणूक सुरू होत असून त्यामध्ये वेगवेगळे दर दिसत आहेत. तसेच याअंतर्गत, ऑनलाइन नोंदणीनंतर लसीकरण केंद्राकडे नागरिक न येताही ही लस त्यांना दिल्याचे दर्शविले जात आहे. ही फसवणूक रोखण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने ऑनलाईन नोंदणी करणाऱ्याची खात्री निश्चित करण्यासाठी ओटीपी बंधनकारक केले आहे. आता ऑनलाईन नोंदणी करणाऱ्यांना त्यांच्या मोबाइलवर चार अंकी ओटीपी देखील मिळेल.
अमेरिका भारतात पाठवणार
दहा लाख रॅपिड टेस्टिंग किट
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आता चाचण्यांनाही वेग येणार आहे. अमेरिकेच्या रॅपिड टेस्टिंग किट मोठ्या प्रमाणात भारतात पोहोचल्यावर कोविड चाचण्या वेगाने होण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिकेच्या दहा लाख रॅपिड टेस्टिंग किट भारतात पाठविण्यात आल्या आहेत. त्यापैकी साडेसहा लाख किट भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेला (आयसीएमआर) उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आयसीएमआरकडून इतर संस्थांना गरजेनुसार उपलब्ध करून दिले जाईल.
ऑगस्ट महिन्यापर्यंत ब्रिटन
करोनामुक्त असेल
येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत ब्रिटन करोनामुक्त झाला असेल”, असा दावा ब्रिटनच्या लसीकरण टास्क फोर्सचे मावळते अध्यक्ष क्लाइव्ह डिक्स यांनी केला आहे. इंडियन एक्स्प्रेसनं टेलिग्राफच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. “ऑगस्ट महिन्यापर्यंत युकेमध्ये करोनाचा प्रसार थांबलेला असेल”, असं देखील त्यांनी सांगितलं. ब्रिटनमध्ये फायझर आणि मॉडेर्नासोबतच काही प्रमाणात ऑक्स्फोर्डने विकसित केलेल्या कोविशिल्ड लसीचे डोस दिले जात आहेत. या पार्श्वभूमीवर ब्रिटनकडून करण्यात आलेला हा दावा समस्त जगासाठीच एक दिलासादायक बाब म्हणावी लागेल.
मुख्यमंत्री ठाकरे यांचे
पंतप्रधानांनी केले कौतुक
कोरोनाविरुद्ध लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दूरध्वनीद्वारे माहिती घेतली. तसेच दुसऱ्या लाटेशी मुकाबला करतांना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे असे सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी देखील विशेषत: महाराष्ट्राला ऑक्सिजनच्या बाबतीत अधिक बळ मिळावे अशी विनंती केली व विविध उपाययोजनांची माहिती दिली. तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी कसे नियोजन करीत आहोत त्याविषयीही मुख्यमंत्री बोलले.
भारताची मदत करण्यासाठी
निश्चयाने उभे आहोत : हॅरिस
अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामान करणाऱ्या भारताला अमेरिका शक्य ती सर्व मदत करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. हॅरिस यांनी “भारताने करोना साथीच्या सुरुवातीच्या काळामध्ये आमची मदत केली होती आणि आता आम्ही भारताची मदत करण्यासाठी दृढ निश्चयाने उभे आहोत”, असं म्हटलं आहे. भारतामध्ये मृत्यूंचं प्रमाण वाढणं हे हृदय पिळवटून टाकणारं असल्याचं देखील त्या म्हणाल्या आहेत. तुमच्यापैकी ज्यांनी आपल्या प्रिय व्यक्तींना गमावलं आहे त्यांच्यासोबत माझ्या सद्भावना आहेत, अशा शब्दांत उपराष्ट्राध्यक्षांनी धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.
विधानसभेच्या निवडणुका स्वबळावर
लढण्याचा कॉंग्रेसचा निर्धार
आगामी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्धार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. पक्षाची शक्तिस्थळांपैकी एक असलेल्या इंटकला मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे. पटोले यांच्या समवेत राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटक महाराष्ट्र शाखेच्या राज्यस्तरीय कार्यकारिणीची बैठक ऑनलाईन झाली.
दोन लाखांवरील बिलं
रोखीने घेण्यास परवानगी
करोना रुग्णांवर उपचार करणारी कोविड रुग्णालये आणि नर्सिंग होम्स यांना केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. दोन लाखांवरील व्यवहारांवर सरकारने बंदी घातलेली आहे. मात्र, कोविड रुग्णालये, नर्सिंग होम्स आणि कोविड सेंटर्ससह यांना ठराविक कालावधीसाठी दोन लाखांवरील बिलं रोखीने घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.
गाडी ऑटो लॉक झाल्याने
चार मुलांचा गुदमरुन मृत्यू
उत्तर प्रदेशमधील बागपत येथील चंदीनगर भागातील सिंगुलाई तागा गावामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी एका गाडीमध्ये खेळणाऱ्या पाच मुलांपैकी चार मुलांचा गाडीत गुदमरुन मृत्यू झालाय. गाडी ऑटो लॉक झाल्याने ही मुलं गाडीत अडकली आणि त्यातच त्यांचा दुर्देवी अंत झाला. अनिल त्यागी यांच्या चार चाकी गाडीमध्ये पाच मुलं खेळत होती. घरासमोरच उभ्या असणाऱ्या या गाडीमध्ये मुलं खेळत असतानाच अचानक गाडी लॉक झाली आणि मुलं गाडीत अडकली.
पुढील शनिवारपासून भारतीयांना
मिळणार ऑस्ट्रेलियामध्ये प्रवेश
करोनाग्रस्त भारतातून परत येणाऱ्या नागरिकांवर घातलेली प्रवेशबंदी ऑस्ट्रेलिया पुढील शनिवारपासून उठवणार आहे. त्याच दिवशी पहिले विमान डार्विन विमानतळावर उतरेल, असे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाच्या सरकारने देशाच्या इतिहासात प्रथमच काही देशांच्या नागरिकांवर प्रवेशबंदी लागू केली आहे.
शरद पवारांना बार मालकांबद्दल
कळकळ का : भातखळकर
अतुल भातखळकर यांनी शरद पवारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेलं ट्विट केलं असून, टोला लगावला आहे. “शरद पवार साहेबांनी बारमालकांना वीज बिलात सवलत द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याच कळकळीने आपण शेतकऱ्यांसाठीही एखादे पत्र पाठवाल अशी अपेक्षा आहे. १०० कोटींच्या बोजाने दबलेल्या बार मालकांबाबत आपली कळकळ पाहून माझा कंठ दाटून आला आहे, हे मी नमूद करू इच्छितो,” असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे.
अभिनेत्री कंगना रणौतला
देखील करोना संसर्ग
करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामान्य जनतेपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांवर परिणाम होत आहे. अनेक सेलिब्रिटींना करोनाची लागण झाली. आता अभिनेत्री कंगना रणौतला देखील करोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.
भारताकडून ऑस्ट्रेलियाला
मदतीसाठी धन्यवाद
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात कोविड-19 संकटावर फोनवर चर्चा झाली. याबाबत माहिती देताना मॉरिसन यांनी ट्विट केलंय. ते म्हणाले, “आपले मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी कोविड-19 संकटात भारतासोबत उभे राहिल्याबद्दल ऑस्ट्रेलियाचे आभार मानले. ऑस्ट्रेलिया व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन कंसंट्रेटर देऊन भारताला मदत करत आहे. आम्ही कोरोना लसीच्या निर्यातीमध्ये भारताने दाखवलेली उदारता कधीही विसरु शकणार नाही. जागतिक आव्हानांवर आमचं बारकाईने लक्ष आहे .
देवाने संपूर्ण ब्रम्हांडात ऑक्सिजन
भरुन ठेवलाय : रामदेव बाबा
पतंजलीचे प्रमुख रामदेव बाबा यांनी देशात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जाणवत असलेल्या ऑक्सिजन तुटवड्यावर चेष्टेने बोलत वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत. “धीर धरा तुम्ही कुठं मरुन चालला आहात. देवाने संपूर्ण ब्रम्हांडात ऑक्सिजन भरुन ठेवलाय. नाकाच्या रुपातील दोन सिलेंडरने ओढा. बेड कमी पडलेत, औषधं कमी पडत आहेत, अंत्यसंस्काराला स्मशानभूमी कमी पडल्यात, मरतो आहे बाबा असं म्हणून चहूबाजूंनी नकारात्मक वातावरण तयार केलंय,” असं मत व्यक्त केलं. अनेक लोक रामदेव बाबांचं हे वक्तव्य असंवेदनशीलपणा असल्याचं म्हणत टीका करत आहेत.
म्युकोरमायकोसिसचे अनेक
उत्तर महाराष्ट्रात रुग्ण
कोरोनाशी लढताना रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे घरी परतणाऱ्या अनेक रुग्णांना आता म्युकोरमायकोसिसची लागण होत असल्याची प्रकार समोर येत आहेत. हे प्रमाण आता झपाट्याने वाढत असून हा रोगही आता भविष्यात साथीच्या आजाराप्रमाणे झपाट्याने फैलावू शकतो, अशी भीती आता डॉक्टरांकडून व्यक्त केली जात आहे.
तामिळनाडूत 10 मेपासून
संपूर्ण लॉकडाऊन
कर्नाटकपाठोपाठ तामिळनाडूतही संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आला आहे. 10 मे पासून 24 मेपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर स्टॅलिन यांनी लॉकडाऊन करण्याचा पहिलाच निर्णय घेतला आहे. राज्यातील कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढल्याने स्टॅलिन यांनी हा निर्णय घेतला आहे.
राज्यात चाईल्ड कोव्हिड
सेंटर उभारले जाणार
राज्यासह देशभरात कोरोनाची दुसरी लाट प्रचंड थैमान घालत आहे. पहिल्या लाटेत वयस्कर नागरिकांना कोरोना संसर्गाचा जास्त धोका होता. या दुसऱ्या लाटेसह तिसऱ्या लाटेत लहान मुलं, गर्भवती महिला आणि तरुणांना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात बालरोग तज्ज्ञांची टास्क फोर्स तयार करण्यात येणार आहे. रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविणे, बालकांसाठीचे व्हेंटीलेटर्स, एनआयसीयुमधील बेडस् यांची तयारी करण्यात येत असून या सुविधा वाढविण्यावर भर देण्यात यावा, असेही निर्देश सरकारने दिले आहे.
भारत हा खूप
खास देश : जॉस बटलर
कोरोनाने क्रिकेटच्या मैदानातही एन्ट्री घेतल्याने आयपीएलचं 14 वं पर्व (IPL 2021) स्थगित करण्यात आलं. पर्व जरी स्थगित करण्यात आलेलं असलं तरी खेळाडू प्रेक्षकांना आयपीएलची वारंवार आठवण येत आहे. इंग्लंडचा धडाकेबाज खेळाडू जॉस बटलरने भारताविषयी, इथल्या लोकांविषयी एक खास पोस्ट लिहून त्यांचे आभार मानले आहेत. सद्यस्थितीतून भारत लवकर पूर्वपदावर यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
गोलंदाज प्रसिध कृष्णाला
करोनाची लागण
कोलकाता नाइट रायडर्स आणि भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाला करोनाची लागण झाली आहे. करोनाचा संसर्ग झालेला तो कोलकाता नाईट रायडर्सचा तो चौथा खेळाडू आहे.
हॉकी संघाचे माजी सदस्य रवींदर
पाल सिंग यांचे करोनामुळे निधन
मॉस्को ऑलिम्पिक १९८०च्या सुवर्णपदक विजेत्या भारतीय हॉकी संघाचे माजी सदस्य रवींदर पाल सिंग यांचे करोनामुळे निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. १९८४मध्ये लॉस एंजेलिस ऑलिम्पिक स्पर्धा खेळणाऱ्या रवींदर पाल यांना २४ एप्रिलला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
SD social media
9850 60 3590