अफगाणिस्तानची राजधानी काबुलच्या पश्चिम भागात शनिवारी एका शाळेजवळ झालेल्या बॉम्ब स्फोटात अनेक विद्यार्थ्यांसह किमान 25 जण ठार झाले. अफगाण सरकारच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली आहे.
रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार मंत्रालयाचे प्रवक्ता तारिक अरियन यांनी सांगितले की या स्फोटात किमान 52 लोक जखमी झाले, त्यातील बहुतेक विद्यार्थी आहेत. मात्र, स्फोट होण्यामागील कारणांबद्दल त्यांनी काहीही सांगितले नाही.
आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते गुलाम दस्तगीर नजारी म्हणाले की, आतापर्यंत 46 लोकांना रुग्णालयात भरती करण्याता आले आहे. अमेरिकेने 11 सप्टेंबरपर्यंत सैन्य परत मागे घेण्याची घोषणा केली तेव्हापासून काबूल हाय अलर्टवर होता.
अद्याप या अपघाताची जबाबदारी कोणत्याही संघटनेने घेतली नाही.
ज्या शाळेजवळ हा स्फोट झाला ती एक संयुक्त शाळा असून यामध्ये मुले व मुली दोघेही शिक्षण घेतात. यात विद्यार्थी तीन शिफ्टमध्ये अभ्यास करतात. यात मुली दुसर्या शिफ्टमध्ये शिकतात. शिक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्या नजीबा अरियन यांनी सांगितले की मृतांमध्ये अधिक मुलींचा समावेश आहे.