राज्यासह देशभरात कोरोनाची दुसरी लाट प्रचंड थैमान घालत आहे. पहिल्या लाटेत वयस्कर नागरिकांना कोरोना संसर्गाचा जास्त धोका होता. या दुसऱ्या लाटेसह तिसऱ्या लाटेत लहान मुलं, गर्भवती महिला आणि तरुणांना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात बालरोग तज्ज्ञांची टास्क फोर्स तयार करण्यात येणार आहे. रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविणे, बालकांसाठीचे व्हेंटीलेटर्स, एनआयसीयुमधील बेडस् यांची तयारी करण्यात येत असून या सुविधा वाढविण्यावर भर देण्यात यावा, असेही निर्देश सरकारने दिले आहे. या निर्देशानंतर अनेक ठिकाणी चाईल्ड कोव्हिड सेंटर उभारले जाणार आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता महापालिका अलर्ट मोडवर आहे. पुण्यात देशातील पहिलं चाईल्ड कोव्हीड केअर हॉस्पिटल उभारलं जाणार आहे. येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयात हे चाईल्ड केअर हॉस्पिटल उभारले जाईल. या ठिकाणी 200 ऑक्सिजन बेडची व्यवस्था केली जाणार आहे.
औरंगाबादेत लहान मुलांसाठी कोव्हिड रुग्णालय
पुण्याप्रमाणेच औरंगाबाद महापालिकेकडूनही लहान मुलांसाठी कोव्हिड रुग्णालयाची उभारणी केली जाणार आहे. औरंगाबादेतील एमजीएम परिसरात 100 खाटांचे कोविड बाल रुग्णालय उभं राहणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी औरंगाबाद महापालिकेची तयारी सुरू केली आहे.
कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे संकेत आहे. त्या पार्श्वभूमीवर पालिकेकडून ही तयारी केली जात आहे. लहान मुलांसोबतच गरोदर मातांसाठीही 50 खाटांचे रुग्णालय उभे केले जाणार आहे. येत्या 10 ते 15 दिवसात हे रुग्णालय उभे केले जाईल, असे बोलले जात आहे.
तसेच नागपुरात लहान मुलांमधील कोरोना रोखण्यासाठी नागपूर प्रशासन कामाला लागलं आहे. नागपुरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठी विभागीय टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच लहान मुलांसाठी एम्समध्ये 200 खाटांचे अद्ययावत कोविड सेंटर उभे केले जाणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने ही तयारी केली आहे. यानुसार लहान बालकांसाठी व्हेंटीलेटर, एनआयसीयू, उपचारासाठी खासगी डॉक्टरसह परिचारिकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
तसेच मुलांसाठी लवकरंच फिवर क्लिनिक सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली. या टास्क फोर्समध्ये डॉ. विनिता जैन, डॉ. उदय बोधनकर, डॉ. देवपुजारी, डॉ. कुश झुनझुनवाला, डॉ. दिप्ती जैन एम्सच्या डॉ. मिनाक्षी गिरीश यांचा समावेश आहे.
ठाणे पालिकेच्या हद्दीत रुग्णांची संख्याही कमी होत आहे. पण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा फटका लहान मुलांना बसण्याची शक्यता आहे. यासाठी पालिका प्रशासनाने पार्किंग प्लाझा मध्ये अलिप्त १०० बेड “चाईल्ड कोरोना” म्हणून आरक्षित करणार आहे, ठाणे पालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांनी याबाबतची माहिती दिली.