आज आफ्रिकेविरुद्ध तिसरा व निर्णायक एकदिवसीय सामना
गेल्या सामन्यात दिमाखदार पुनरागमन करणाऱ्या भारतीय संघाचे मंगळवारी तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर पुन्हा विजय मिळवत मालिकेत सरशी साधण्याचे ध्येय आहे. या सामन्यात भारतीय सलामीवीरांच्या कामगिरीवरही सर्वाच्या नजरा असतील.
भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी या मालिकेत चमक दाखवली आहे. श्रेयस अय्यरने पहिल्या दोन सामन्यांत एक अर्धशतक व एक शतक झळकावले. दुसऱ्या सामन्यात त्याला इशान किशनची उत्तम साथ लाभली. तसेच सॅमसनने पहिल्या सामन्यातील अर्धशतकी खेळीनंतर दुसऱ्या सामन्यात खेळपट्टीवर टिकाव धरला. गोलंदाजीत मोहम्मद सिराजने सातत्यपूर्ण कामगिरी करताना दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराच्या जागी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवण्यास आपली दावेदारी मजबूत केली आहे.
धवन, गिलकडून अपेक्षा
पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारताने दुसऱ्या लढतीत सात गडी राखून विजय मिळवत तीन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. कर्णधार शिखर धवन आणि युवा सलामीवीर शुभमन गिलच्या कामगिरीची संघ व्यवस्थापनाला चिंता असेल. धवनला मालिकेत आतापर्यंत १७ धावाच करता आल्या आहेत. गिललाही मिळालेल्या संधीचा फायदा घेता आलेला नाही. त्यामुळे अखेरच्या सामन्यात त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची संघाला अपेक्षा आहे.
आफ्रिकेकडून पुनरागमनाचे प्रयत्न
दक्षिण आफ्रिकेसाठी पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची आहे. कर्णधार टेम्बा बव्हुमाची लय संघासाठी चिंतेचा विषय आहे. आजारी असल्यामुळे त्याला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. तो तिसऱ्या सामन्यात खेळतो का, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. निर्णायक सामन्यात आफ्रिकेचा चांगल्या कामगिरीचा प्रयत्न असेल.
* वेळ : दुपारी १.३० वा.
* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी