मल्लखांब प्रकारातील तीन सुवर्णपदकांसह मिळविलेल्या सहा पदकांच्या जोरावर सोमवारी महाराष्ट्राने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पदकतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. महाराष्ट्राने आता ३४ सुवर्ण, ३७ रौप्य आणि ५७ कांस्यपदकांसह एकूण १२८ पदके मिळवून हरयाणाला मागे टाकले.
सेनादल संघ ५३ सुवर्ण, ३३ रौप्य आणि २९ कांस्यपदकांसह एकूण ११५ पदकांसह आपले आघाडीचे स्थान कायम राखले आहे. हरयाणाने एकूण पदकांचे शतक गाठले. मात्र, त्यांना ३२ सुवर्ण, ३०रौप्य आणि ३८ कांस्यपदकांसह तिसऱ्या स्थानावर घसरावे लागले.
मल्लखांब प्रकारात शुभंकर खवले, अक्षय तरळ व रूपाली गंगावणे यांची कामगिरी महाराष्ट्राच्या यशात निर्णायक ठरली. शुभंकर या पुण्याच्या खेळाडूने पुरलेल्या मल्लखांबावर लवचिकतेचे अप्रतिम प्रदर्शन केले. दोरीच्या मल्लखांबावर अक्षय सरस ठरला.
महिला विभागातील दोरीच्या मल्लखांब प्रकारात रूपाली गंगावणेने अपेक्षेप्रमाणे सुवर्णपदक पटकाविले. पुरलेल्या मल्लखांबावर मात्र तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. दोरीच्या मल्लखांबावर नेहा क्षीरसागर कांस्यपदकाची मानकरी ठरली. जान्हवी जाधवने रौप्यपदक जिंकले.