सुषमा स्वराज यांची मुलगी बांसुरी स्वराज यांनी उदयनिधी यांनी आपल्या आईच्या नावाचा वापर निवडणुकीसाठी करु नये असं म्हटलं आहे. “उदयनिधीजी कृपया माझ्या आईच्या आठवणींचा वापर तुमच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी करु नका. तुमचं वक्तव्य चुकीचं आहे. मोदींनी माझ्या आईला नेहमी आदर आणि सन्मान दिला. आमच्या कठीण काळात पंतप्रधान आणि पक्ष आमच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिले. तुमच्या वक्तव्याने आम्ही दुखावलो आहोत”, असं ट्विट बांसुरी स्वराज यांनी केलं आहे.
बांसुरी स्वराज यांनी प्रतिक्रिया देताना स्टॅलिन यांचं वक्तव्य अनादर करणार असल्याचं म्हटलं आहे. “राजकीय मुद्द्यांवर निवडणूक लढायची सोडून उदयनिधीजी माध्या आई आणि अरुण जेटलींच्या नावाचा वापर करत पंतप्रधानांवर हल्ला करत आहेत याचं आश्चर्य वाटतं,” असं त्या म्हणाल्या आहेत. अरुण जेटली यांची मुलगी सोनाली जेटली यांनीही ट्विटरच्या माध्यमातून उदयनिधी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “उदयनिधीजी तुमच्यावर निवडणुकीचा दबाव आहे हे मी समजू शकते. पण तुम्ही माझ्या वडिलांच्या आठवणींचा अनादर करणार असाल तर शांत बसणार नाही. नरेंद्र मोदी आणि अरुण जेटलींमध्ये राजकारणापलीकडचे संबंध होते.ही मैत्री तुम्हाला कळावी अशी प्रार्थना करते,” असं त्यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना उदयनिधी स्टॅलिन यांनी म्हटलं की, “सुषमा स्वराज नावाची एक व्यक्ती होती. मोदींनी टाकलेल्या दबावामुळेच त्यांचा मृत्यू झाला. अरुण जेटली नावाचीही एक व्यक्ती होती. मोदींनी केलेल्या छळामुळेच त्यांचा मृत्यू झाला”.