टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताने केलेल्या पराभवाच्या धक्क्यातून पाकिस्तान संघ सावरलेला नसताना त्यांना अजून एक धक्का बसला आहे. झिम्बाब्वेने अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला आहे. आतापर्यंत झालेल्या दोन्ही सामन्यात पराभव झाल्याने पाकिस्तानी संघाची आणि चाहत्यांची निराशा झाली आहे. पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमनेही संघाच्या कामगिरीवर नाराजी जाहीर केली आहे.
झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करत ८ गडी गमावत १३० धावा केल्या होत्या. छोटं आव्हान असतानाही झिम्बाम्बेने पहिल्या चेंडूपासून पाकिस्तानला कडवी झुंज दिली. शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानला विजयासाठी तीन धावांची गरज होती. मात्र पाकिस्तानला दोनच धावा मिळाल्या आणि झिम्बाम्बेने शेवटच्या चेंडूवर हा सामना जिंकला.
“आमच्या संघाने फारच निराशाजनक कामगिरी केली आहे. आम्ही फलंदाजी अपेक्षेप्रमाणे केली नाही. पहिल्या सहा षटकांमध्ये आम्ही फार वाईट खेळलो. शादाब आणि शान यांनी चांगली भागीदारी केली. पण दुर्दैवाने शादाब बाद झाला आणि त्यानंतर मागोमाग गडी बाद झाले. ज्यामुळे फलंदाजांवर दबाव निर्माण झाला,” असं बाबर आझमने सामना संपल्यानंतर बोलताना सांगितलं.
“पहिल्या सहा षटकांमध्ये आम्ही नव्या चेंडूचा योग्य वापर नाही करत आहोत. आम्ही एकत्र बसून झालेल्या चुकांवर चर्चा करु. पुढील सामन्यात आम्ही नक्की पुनरागन करु,” असा विश्वास बाबर आझमने व्यक्त केला आहे.
टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने पाकिस्तानसमोर १३१ धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाला आठ विकेट्सच्या मोबदल्यात केवळ १२९ धावा करता आल्या आणि एका धावेने सामना गमावावा लागला. यामुळे पाकिस्तानवर आता विश्वचषकातून बाहेर पडण्याचं संकट निर्माण झालं आहे.