राज्यभर रात्रीचा गारवा ; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमानात मोठी घट

निरभ्र आकाश आणि कोरड्या हवामानाच्या स्थितीमुळे संपूर्ण राज्यामध्ये रात्रीच्या किमान तापमानात घट होऊन गारवा निर्माण झाला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमानात सर्वाधिक घट झाली आहे. विदर्भ आणि कोकणातील रात्रही थंड आहे. राज्यातील गारव्याची ही स्थिती ऑक्टोबर अखेरपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.

संपूर्ण राज्यातून २३ ऑक्टोबरला मोसमी पाऊस माघारी फिरल्यानंतर लगेचच आकाशाची स्थिती निरभ्र झाली. त्याचप्रमाणे हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी होऊन कोरडे हवामान तयार झाले. रात्रीही आकाश निरभ्र राहत असल्याने किमान तापमानात झपाट्याने मोठी घट झाली. पावसाळी वातावरण असताना राज्यात सर्व ठिकाणी रात्रीचे किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस दरम्यान होते. त्यामुळे रात्री काहीसा उकडा जाणवत होता. मात्र, पाऊस माघारी फिरताच २३ सप्टेंबरपासूनच सर्वत्र किमान तापमानात मोठी घट होऊन ते सरासरी खाली आले. त्यामुळे राज्यात थंडी अवतरली आहे.

मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सध्या किमान तापमानात मोठी घट आहे. या दोन्ही विभागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन ते चार अंशांनी घट दिसून येत आहे. विदर्भ आणि कोकणात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत एक ते तीन अंशांनी घटले आहे. गुरुवारी (२७ ऑक्टोबर) औरंगाबाद येथे राज्यातील नीचांकी १३.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. त्या पाठोपाठ उस्मानाबाद येथे १३.८ अंश तापमान नोंदविले गेले. मध्य महाराष्ट्रातील पुणे नाशिक येथे १४ अंश सेल्सिअसच्या आसपास तापमानाची नोंद होत आहे. मुंबई आणि परिसरामध्येही किमान तापमान सरासरी खाली आहे. कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली आदी भागांत किमान तापमान सरासरीच्या तुलनेत दोन ते तीन अंशांनी घटले आहे. नागपूर, अमरावतीत किमान तापमानात दोन अंशांच्या आसपास घाट आहे. दिवसाही निरभ्र आकाशाची स्थिती राहत असल्याने काही भागात दिवसाच्या कमाल तापमानात हळूहळू वाढ होत आहे. मध्य महाराष्ट्र वगळता राज्यातील इतर सर्व भागांमध्ये किमान तापमान वाढ होत आहे.

दक्षिणेकडे ईशान्य मोसमी वारे सक्रिय नैऋत्य मोसमी वारे देशातून माघारी फिरल्यानंतर दक्षिणेकडे ईशान्य मोसमी वाऱ्यांच्या पावसाचा हंगाम सुरू झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार येत्या दोन ते तीन दिवसांत दक्षिणेकडील काही राज्यांमध्ये या मोसमी वाऱ्यांमुळे पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. डिसेंबरपर्यंत ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे होणाऱ्या पावसाचा हंगाम दक्षिणेकडे कायम असतो. त्याचा महाराष्ट्रावर परिणाम जाणवत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.