मागील तीन दिवसांत राज्यातील ९७२ नवीन रुग्णांना करोना संसर्गाचे निदान झाले आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील २०१ रुग्णांचा समावेश आहे. राज्याच्या साथरोग सर्वेक्षण विभागाकडून दिवाळीच्या तीन दिवसांनंतर गुरुवारी दैनंदिन अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यामध्ये याबाबत माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
गुरुवारी पुणे जिल्ह्यातील ४० नव्या रुग्णांना करोनाचा संसर्ग झाला. त्यांपैकी २६ रुग्ण पुणे महापालिकेत, १० रुग्ण पिंपरी चिंचवडमध्ये तर उर्वरित चार रुग्ण जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोना रुग्णांची एकूण संख्या १५ लाख ३६ हजार ३८ पर्यंत जाऊन पोहोचली आहे. नव्याने आढळत असलेल्या रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत, मात्र प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मुखपट्टीचा वापर, वर्धक मात्रेसह लसीकरण पूर्ण करणे या बाबी महत्त्वाच्या असल्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॅा. प्रदीप आवटे यांनी स्पष्ट केले आहे.