दोघांची प्रकृती चिंताजनक
उत्तर प्रदेशमधील मैनीपूरमध्ये एका विचित्र घटनेत दोन मुलांसहीत एकूण तीन जणांचा मृत्यू झाला आहे. विषारी चहा प्यायल्याने तिघे जण दगावले आहे. हा संपूर्ण प्रकार गुरुवारी उघडकीस आला. मरण पावलेल्या मुली सहा आणि पाच वर्षांची होती. या दोघांनाही उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता त्यांना मृत घोषित करण्यात आलं. अन्य एका व्यक्तीचाही यामध्ये मृत्यू झाला आहे.
फॉरेन्सिक टीमने केलेल्या प्राथमिक तपासामध्ये चहा करताना घरातील महिलेने गवती चहाऐवजी शेतात औषध म्हणून वापरल्या जाणाऱ्या वनस्पतीची पानं टाकली. या कुटुंबातील व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार घरातील सुनेकडून चहा करताना चुकून गवती चहाऐवजी ही विषारी पानं वापरली गेली. हा चहा प्यायल्याने तिघे दगावले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. प्रकृती चिंताजनक असलेल्या याच घरातील दोघांवर उपचार सुरु आहेत.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. ज्या भांड्यामध्ये हा विषारी चहा बनवण्यात आला ते भांडं पोलिसांनी अधिक चाचण्यांसाठी फॉरेन्सिक टीमला दिलं आहे. या भांड्यामध्ये नेमका कोणता पदार्थ वापरण्यात आला होता हे आता अभ्यासानंतरच स्पष्ट होईल.
मात्र अशाप्रकारे चहा प्यायल्याने तिघांचा मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.