आज 17 सप्टेंबर म्हणजेच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस. आज पंतप्रधान मोदी आपला 71 वा वाढदिवस साजरा करत आहेत. मोदी आज 71 वर्षांचे झाले. यानिमित्त भाजप राष्ट्रीय मुख्यालयात एक विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. जे पीएम मोदींच्या जीवनावर आधारित असेल. हे प्रदर्शन तुम्ही नमो अॕपवरही पाहू शकणार आहात. याशिवाय पक्षाच्या मुख्यालयात रक्तदानाचा कार्यक्रमही आयोजित केला जाईल.
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीनं आजपासून पुढील तीन आठवडे म्हणजे 7 ऑक्टोबरपर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केलं आहे. या कालावधीमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सरकार आणि पक्षासंदर्भात निर्माण झालेले नकारात्मक वातावरण बदलण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
मोदींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या 20 दिवसीय कार्यक्रमामध्ये 14 कोटी रेशनच्या पिशव्या, 5 कोटी थँक यू मोदीजी पोस्ट कार्ड, नदी स्वच्छता मोहिमेअंतर्गत 71 जागांवर केलं जाणार काम, सोशल मीडियावरील कॅम्पेनसोबतच कोरोना लसीकरण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आणि कार्याची माहिती देणाऱ्या सेमिनार्सचं आयोजन करण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनीही पंतप्रधान मोदींना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज वाढदिवस
2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दमदार जागतिक नेते म्हणून उदयास आले आहेत. अनेक मोठ्या प्रसंगी, त्यांनी देश आणि जगाला दाखवून दिले आहे की तो आपल्या निर्णय घेण्याच्या क्षमतेत किती दृढ आहे. ते स्वतःवर झालेल्या टीकाही सकारात्मक दृष्टिकोनातून घेत असतात. त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं होतं की, माझ्यावर झालेल्या टीका मला अधिक चांगलं होण्यासाठी प्रेरणा देते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जन्म 1950 साली झाला होता आणि यंदा त्यांनी 71 वर्षे पूर्ण केल्यानंतर ते आपल्या आयुष्याच्या 72 व्या वर्षात प्रवेश करत आहेत.
जंगी सोहळा
पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 20 दिवसांचा जंगी सोहळा रंगणार आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त उत्तर प्रदेशमधील वाराणसीतील भारतमाता मंदिरात 71 हजार दिवे लावले जाणार आहेत.
मोदींची प्रसिद्ध वक्तव्ये
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या भाषणांसाठी आणि लोकप्रिय वक्तव्यांसाठी ओळखले जातात. गणित ही काही केवळ समीकरणे सोडवण्याची पद्धत नसून ती विचार करण्याची पद्धत असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. तर कुठल्याही विद्यार्थ्यांची इतर विद्यार्थ्यांसोबत तुलना न करण्याचा सल्लाही त्यांनी दिला होता. त्यांनी अशी अनेक विधाने लोकप्रिय आहेत.