दिल्लीच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा, धवनच्या टीम इंडियानं केला मोठा पराक्रम
नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर शिखर धवनच्या टीम इंडियानं पराक्रम गाजवला. दिल्लीतल्या वन डेत टीम इंंडियान दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेट्सनी धुव्वा उडवला आणि तीन सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकानं खिशात घातली. महत्वाचं म्हणजे भारतीय संघानं या मालिकेत पहिला सामना गमावूनही मालिकाविजय साकार केला. लखनौची पहिली वन डे भारतानं 9 धावांनी गमावली होती. त्यानंतर रांची वन डेत टीम इंडियानं कमबॅक करताना श्रेयस अय्यर आणि ईशान किशानच्या खेळीनं भारताला 7 विकेट्सनी विजय मिळवून दिला. त्यानंतर आज दिल्ली वन डेतही वर्चस्व गाजवून भारतानं ही मालिकाही आपल्या नावावर केली. दरम्यान तर महत्वाचे खेळाडून टी20 वर्ल्ड कपमुळे संघाबाहेर असताना युवा शिलेदारांना घेऊन धवननं मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला हे विशेष.यंदाच्या वर्षात टीम इंडियानं सलग पाच वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला. फेब्रुवारीपासून भारतीय संघानं वेस्ट इंडिजविरुद्ध दोनदा तर दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि झिम्बाब्वे या संघांविरुद्ध एकदा मालिकाविजय साजरा केला.
पदवी आता गरजेची नाही, पण…,पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचा काय आहे नेमका अर्थ?
‘जितकं जास्त शिक्षण घेतलं तितकं जीवनात यशस्वी होता येतं असं सर्वसामान्यपणे म्हटलं जातं. परंतु, कमी शिकलेले पण अनुभव जास्त घेतलेले अनेक जण यशोशिखरावर पोहोचल्याची खूप उदाहरणं सध्या पाहायला मिळतात. हाच धागा पकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक विधान केलं असून, याकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे. एखाद्या विद्यार्थ्याकडे पदवी नसेल आणि चांगलं कौशल्य असेल तर तो उत्तम नोकरी मिळवू शकतो, असं पंतप्रधानांनी म्हटल्यानं शिक्षण व्यवस्थेतील बदलाबद्दल आता चर्चा होऊ लागली आहे.पंतप्रधान गुजरातच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. अहमदाबादमध्ये एका शैक्षणिक कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर त्यांनी कौशल्य विकासावरील अनेक बाबींवर त्यांचं मत मांडलं.
आता रंगणार सामना; धगधगती मशाल विरुद्ध ढाल-तलवार, अखेर शिंदे गटाला मिळालं नवं चिन्ह
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. काल निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरे गटाला नवं नाव आणि नवं चिन्ह दिल्यानंतर आता शिंदे गटालाही नवं चिन्ह मिळालं आहे. निवडणूक आयोगाकडून याबाबत घोषणा करण्यात आली आहे. शिंदे गटाच्या पक्षाचं नाव बाळासाहेबांची शिवसेना असून ढाल-तलवारीचं चिन्ह देण्यात आली आहे.
अन् ‘मातोश्री’वर पोहोचली ‘मशाल’, उद्धव ठाकरे चिन्हाबद्दल पहिल्यांदाच बोलले
शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे आधी आमदार फुटले नंतर पक्षाचे चिन्हही गेलं. शिवसेनेला मशाल हे चिन्ह मिळाले आहे. आज काही शिवसैनिक हे मशाल घेऊन मातोश्रीवर पोहोचले. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही गद्धारांना जाळणारी आहे. या मशालीचे महत्व, तेज त्याचा धोका सगळं लक्षात घ्या’ असं म्हणत शिंदे गटावर निशाणा साधला.
सत्तेत तुम्हालाच…,मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंचं मोठं विधान
‘मला पूर्ण विश्वास आहे आपण सत्तेत पोहोचू. तुमचे विचार सकारात्मक ठेवा. तुम्हाला सत्तेत घेऊन जाणार आहे. तुम्हाला म्हणजे तुम्हालाच सत्तेत नेणार मी स्वतः बसणार नाही’ असं म्हणत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना टोला लगावला. तसंच, राज ठाकरेंनी पुन्हा एकदा स्वबळावर लढण्याचं बोलून दाखवलं आहे.मुंबई पालिका निवडणुकीसाठी मनसेची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. मनसेची आज रंगशारदामध्ये महत्वाची बैठक पार पडली. यावेळी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने अध्यक्ष राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं.
“लॉकडाऊन आवडतो, म्हणून दोन वर्षे सणांना बंदी”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला
काही लोकांना लॉकडाऊन आवडतो. चीनमध्ये लॉकडाऊन झाला की लगेच लॉकडाऊन घोषित करायचे. त्यामुळे दोन वर्ष कुठलेही सण सोहळे साजरे झाले नाहीत. आता आम्ही सर्व सण कसे दणक्यात साजरे करतो, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला. मीरा रोड येथे लता मंगेशकर नाट्यगृहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
अंधेरी पोटनिवडणूक : सोनिया गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन
अंधेरी मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या हंगमी अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबद्दलची सविस्तर माहिती दिली.
…तर मुस्लीम व्यक्ती दुसरं लग्न करु शकत नाही, अलाहाबाद हायकोर्टाचा मोठा निर्णय
जर एखादी मुस्लीम व्यक्ती आपल्या पत्नी, मुलांचा सांभाळ करण्यास सक्षम नसेल, तर ‘कुराण’नुसार तो दुसरं लग्न करु शकत नाही अशी टिप्पणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने केली आहे. ‘कुराण’नुसार एखादी व्यक्ती अनाथांना न्याय देत नाही, तोपर्यंत दुसरं लग्न पवित्र होऊ शकत नाही असंही न्यायालयाने म्हटलं आहे. एका मुस्लीम व्यक्तीने दाखल केलेली याचिका फेटाळताना न्यायालायने हे निष्कर्ष नोंदवले.न्यायमूर्ती सूर्य प्रकाश केसरवानी आणि राजेंद्र कुमार-चतुर्थ यांनी सांगितलं की “कुराणमधील आदेश सर्व पुरुषांना अनिवार्य आहे, ज्यामध्ये मुस्लीम पुरुषांना अनाथांना योग्य वागणूक देण्यास सांगण्यात आलं आहे. पुरुष आपल्या आवडीच्या दोन, तीन किंवा चार महिलांशी लग्न करु शकतो. पण जर त्या पुरुषाला आपण त्यांना योग्य न्याय देऊ शकणार नाही याची भीती वाटत असेल किंवा आपल्या पहिल्या पत्नी, मुलांचा योग्य सांभाळ करण्यास सक्षम नसेल तर तो दुसरं लग्न करु शकत नाही”.
सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा मराठीचा डंका! सरन्यायाधीशपदासाठी धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस
देशाचे सरन्यायधीश उदय लळित यांनी मंगळवारी (११ ऑक्टोबर) पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केली आहे. त्यामुळे ललीत यांच्यानंतर सरन्यायाधीशपदावर आणखी एक मराठी व्यक्ती बसणार आहे. सकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांच्या उपस्थितीत ललीत यांनी चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस करणारं पत्र केंद्र सरकारला पाठवलं.लळित ८ नोव्हेंबरला सरन्यायाधीशपदावरून निवृत्त होत आहेत. केंद्रीय कायदा मंत्रालयाने परंपरेप्रमाणे विद्यमान सरन्यायाधीश लळित यांना पत्र पाठवून त्यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या नावाची शिफारस करण्यास सांगितलं होतं. यानंतर लळीत यांनी प्रक्रियेनुसार, सर्वोच्च न्यायालयात त्यांच्यानंतर सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्तींची सरन्यायाधीश म्हणून शिफारस केली.
बीसीसीआय तिजोरीच्या चाव्या आशिष शेलारांकडे?, खजिनदारपदी वर्णी लागण्याची शक्यता
भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये ( बीसीसीआय ) अध्यक्षबदलाच्या हालचालींना वेग आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज ( ११ ऑक्टोंबर ) बीसीसीआयची मुंबईत एक बैठक पार पडली. या बैठकीत भारताचे माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांच्या नावावर अध्यक्षपदासाठी शिक्कामोर्तब झाल्याचं समजत आहे. तर, सध्याचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर ( आयसीसी ) पाठवण्यात येणार आहे.मुंबईतील ट्रायडंट हॉटेल येथे बीसीसीआयची बैठक पार पडली. या बैठकीत अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यात आले. तसेच, १८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावेळी चर्चा करण्यात आली.
SD Social Media
9850 60 3590