जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणत्याही कामात अपयश येत नाही हे, धुळे जिल्ह्यातील फागणे गावाच्या हर्षदा छाजेड या जिद्दी मुलीने दाखवून दिले आहे. वडिलांचे छत्र हरवले असताना हर्षदा छाजेड हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षेत म्हणजेच आयएसएस परीक्षेत देशात चौथा क्रमांक पटकावला आहे. तर महाराष्ट्र राज्यात या मराठमोळ्या हर्षदा छाजेड हिनं पहिला क्रमांक पटकविला आहे. या घवघवीत यशाबद्दल फागणे गावाच्या ग्रामस्थांची मान अभिमानाने उंचावली आहे.
एकीकडे भ्रूणहत्या होत असताना मुलींना कमी लेखलं जातं! मात्र ,हर्षदा हिने घवघवीत यश मिळवून देशामध्ये एक इतिहास रचला आहे.त्यामुळे मुली देखील आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावुन पुढे जात असल्याचं तिने दाखवून दिलं आहे.
धुळे जिल्ह्यातून जयहिंद कॉलेजमधून पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतुन एम एस सी करत प्रथम क्रमांकाने गोल्ड मेडल प्राप्त केले होते. त्यानंतर यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यातील जितो प्रशासकीय ट्रेनिंग फाऊंडेशन सेंटरमध्ये प्रवेश घेत तयारी सुरु केली. 2019 मध्ये प्रथम परीक्षा दिल्यानंतर हर्षदा परीक्षा पास झाली. मात्र, इंटरव्यू मध्ये काही मार्क मुळे अपयश आले.
हर्षदा हिने हार न मानता कुटुंबाच्या सदस्यांचा पाठिंबा मुळे पुन्हा जोमाने जिद्दीने अभ्यास करून ऑक्टोंबर 2020मध्ये यूपीएससीची परीक्षा दिली. 2021 मध्ये मुलाखतीमध्ये जुनी उणीव भरुन काढत हर्षदा हिने घवघवीत यश मिळविले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या भारतीय सांख्यिकी आय एस एस परीक्षेत देशात चौथा क्रमांक तर महाराष्ट्रात पहिला क्रमांक या मुलीने फडकविला आहे. त्यामुळे सर्वत्र या तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
फागणे गावातील गटनेते विलास आन्ना चौधरी व ग्रामपंचायत सरपंच कैलास नाना पाटील यांच्यावतीने सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम घेण्यात आला. तर, यावेळी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मधून डॉ. विलास बडगुजर तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून निलेश शेळके यांनी पीएचडी पदवी घेतल्याबद्दल त्यांचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला आहे. यावेळी सत्कार सोहळा कार्यक्रमाला फागणे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (फोटो क्रेडिट गुगल)