राज्यातील विविध प्रकल्प रुळावर आणण्यासाठी त्यांना निधीचे बळ देण्यात आले आहे. एकूण १३ हजार ५३९ कोटी रुपयांची तरतूद २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात करण्यात आली असून यापैकी १० हजार ६०० कोटी रुपये मध्य रेल्वेच्या वाटय़ाला आले आहेत. तर उर्वरित निधी मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या मुंबईतील प्रकल्प आणि अन्य विभागांसाठी प्रस्तावित आहेत.
केंद्रीय अर्थसंकल्पात मध्य रेल्वेला पूर्णत: नव्या मार्गिकांच्या कामांसाठी एकूण १ हजार ६८५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली असून, सर्वाधिक ६०० कोटी रुपयांची तरतूद वर्धा-नांदेड व्हाया यवतमाळ पुसद या २७० किलोमीटर मार्गिकेसाठी आहे. तर अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ मार्गिकेसाठीही २५० कोटी, सोलापूर-उस्मानाबाद-तुळजापूर मार्गासाठी ११० कोटी आणि धुळे-नर्दाना मार्गिका, कल्याण-मुरबाड व्हाया उल्हासनगर आणि बारामती-लोणांद मार्गासाठी प्रत्येकी १०० कोटी रुपयांची, तर फलटण-पंढरपूर या १०५ किलोमीटर मार्गिकेच्या बांधकामासाठीही २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.
राज्यात विविध ठिकाणी होणाऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या अतिरिक्त मार्गिकांच्या कामांसाठी एकूण २ हजार ७०२ कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे. यापैकी कल्याण – कसारा तिसऱ्या मार्गिकेसाठी ९० कोटी, पुणे– मिरज – लोंडा दोन मार्गिकांसाठी ९०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर वर्धा– नागूपर तिसरा मार्ग, वर्धा – बल्लारशहा तिसरा मार्ग, इटारसी – नागपूर, दौंड – मनमाड दोन मार्गिका, वर्धा – नागपूर चौथी मार्गिका, मनमानड – जळगाव ,तिसरा आणि जळगाव – भुसावळ चौथ्या मार्गिकेच्या कामांसाठीही निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.