ज्या शहरांत किंवा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दर कमी आहे तिथे राज्य शासनाने निर्बंधामध्ये शिथिलता दिली आहे. त्यानुसार आता हॉटेल, स्पा, जीम, सलून सगळं काही नियम आणि अटींनुसार सुरु करण्याला परवानगी देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत सगळं खुल केलं मग मंदिर का बंद?, असा सवाल करत लसीकरण झालेल्या भाविकांसाठी मंदिरं खुली करा, अशी मागणी भाजप अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी राज्य शासनाकडे केली आहे.
मंदिर उघडण्याचा निर्णय घेताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा भरतो. मात्र आता सगळं काही सुरु झालेलं असताना, शासनाने नियमांमध्ये शिथीलता दिलेली असताना मंदिरं उघडण्याचा निर्णय देतीख सरकारने घ्यावा, अशी मागणी आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे.
लसीकरण झालेल्या भाविकांसाठी मंदिर खुली करा
शासनाने विविध ठिकाणी निर्बंधामध्ये शिथीलता दिली आहे. त्यानुसार सगळं काही आता नियम अटींनुसार सुरु झालंय. मग आता मंदिरंही बंद नकोत. ज्यांनी ज्यांनी लस घेतली आहे, त्या भाविकांसाठी मंदिरं सुरु करा, अशी मागणी आचार्य तुषार भोसले यांनी केली.
श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी मंदिर खुली करा
हिंदू धर्मातील पवित्र श्रावण महिना सुरु होतोय. श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी मंदिर खुली करा आणि भाविकांना दर्शन घेऊ द्या, असं तुषार भोसले म्हणाले आहेत. सगळं खुल केलं मग मंदिरही बंद नकोत, असंही ते म्हणाले.
मंदिरं उघडण्यासाठी तुषार भोसले सातत्याने आग्रही
कोरोना काळात नियम आणि अटींच्या अधिपत्याखाली राहून सगळं काही सुरु असतं. मग मंदिरं उघडी ठेवायलाच काय अडचण होते. हे सरकार हिंदूविरोधी आहे. यांना हिंदूंचं काहीही देणंघेणं नाहीय, अशी टीका करत मंदिरं उघडण्यासाठी तुषार भोसले सातत्याने आग्रही असतात. अनेक वेळा मंदिर उघडण्याच्या मागणीवरुन तुषार भोसले यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केलं.
25 जिल्ह्यांमध्ये शिथीलता, 11 जिल्ह्यांध्ये निर्बंध कायम
राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तर 11 जिल्ह्यांमध्ये लेव्हल 3 चे निर्बंध असणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत घोषणा केली होती. त्यानंतर आज संध्याकाळी राज्य सरकारकडून अधिकृतपणे आदेश काढण्यात आला आहे. नव्या आदेशानुसार 25 जिल्ह्यांमध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवता येतील. तर शनिवारी आणि रविवारी दुपारी चार वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवावी लागणार. उर्वरित 11 जिल्ह्यांमध्ये सोमवार ते शुक्रवार चार वाजेपर्यंत दुकाने सुरु राहणार तर शनिवार-रविवारी दुकाने बंद ठेवावे लागतील.
राज्यातील ‘या’ 11 जिल्ह्यांमध्ये लेव्हल 3 चे निर्बंध
महाराष्ट्रातील 11 जिल्हे असे आहेत या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. संक्रमणाचा दर जास्त आणि कोरोना रुग्ण अधिक आढळत असल्यानं त्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लागण्याची शक्यता पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. सक्रीय कोरोना रुग्ण अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, पालघर जिल्ह्यांचा समावेश आहे. या 11 जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारने लेव्हल 3 चे निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.