मंदिराच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर तोफ डागली आहे. देशभरात मंदिरे सुरू आहेत. महाराष्ट्रातच बंद आहे. त्यामुळे या सरकारला सुबुद्धी मिळावी म्हणून गणरायाला साकडे घातले आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. मंदिरं सुरू करण्याची आमची मागणी केवळ यासाठी आहे की, आम्ही हिंदू आहोत. आमचे 33 कोटी देव आहेत. सगळीकडे, जिथे आम्ही मानू तिथे देव आहे. पण त्यासोबत या मंदिरांवर अवलंबून असलेले लाखो लोक आहेत. कुणी फुलं, कुणी प्रसाद, कुणी उदबत्ती, कुणी हळद-कुंकु विकतंय. मंदिरांवर अवलंबून असलेले पुजारी, तिथले सेवक आहेत. या दोन वर्षाच्या काळात या सगळ्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. म्हणून आम्ही सातत्याने मागणी करत आहोत की मदिरालय सुरू होऊ शकतं तर मंदिर का नाही? सरकारनं हवं तर नियमावली लावावी आणि मंदिरं सुरू करावीत. आज देशभरातील मंदिरं सुरू आहेत. फक्त महाराष्ट्रातील मंदिरं बंद आहेत. त्यामुळे गणरायाने सरकारलाही सुबुद्धी द्यावी अशी, असं फडणवीस म्हणाले.
श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत. या विघ्नहर्त्याच्या स्थापनेच्या निमित्तानं आपण त्यांना साकडं घालूया की, जगासमोर, देशासमोर, महाराष्ट्रासमोर जे कोरोनाचं संकट आहे, ते संकट आता दूर झालं पाहिजे. आपलं जीवन पूर्वीसारखं सुचारू झालं पाहिजे. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रावर जी सारखी संकटं येतात, कधी पुराचं, कधी वादळाचं तर कधी अतिवृष्टीचं, यातूनही आमच्या शेतकऱ्यांना मुक्ती मिळावी. शेतकऱ्याला बळ मिळावं आणि गणरायाने त्यांना आशीर्वाद द्यावा, अशी गणराया चरणी प्रार्थना आहे. त्याचसोबत गणरायाने आपल्या सगळ्यांनाच सुबुद्धी द्यावी आणि चांगलं काम करण्याची प्रेरणा द्यावी अशीही प्रार्थना आहे, असंही ते म्हणाले.
यावेळे त्यांनी काँग्रेसलाही चिमटे काढले. काँग्रेसचं वर्णन हे शरद पवार यांनी केलेल्या वर्णनापेक्षा वेगळं असूच शकत नाही. कारण काँग्रेस आज जुन्या पुण्याईवर चालली आहे. आमच्या वऱ्हाडात असं म्हणतात की, मालगुजारी तर गेली आता उरलेल्या मालावर गुजराण सुरू आहे. तशा प्रकारचंच वर्णन पवारसाहेबांनी केलं आहे. काँग्रेसला ते चपखल लागू पडतं, असा टोलाही त्यांनी लगावला.