राजीव सातवांच्या पत्नीला विधानसभेची उमेदवारी?

राष्ट्रीय स्तरावरील काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या जागी त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना राज्यसभेवर पाठवायचे की नाही, याबाबत अद्याप पक्षाचा निर्णय होऊ शकलेला नाही. प्रज्ञा सातव यांना राज्यसभेवर पाठवावे की विधानसभेची उमेदवारी द्यावी, याविषयी वरिष्ठ नेत्यांमध्ये अद्याप चर्चा सुरु आहे. राज्यसभेच्या 6 रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. तेव्हापासून काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली जाण्याची चर्चा सुरु आहे. मात्र, त्याऐवजी प्रज्ञा यांना 2024च्या विधानसभा निवडणुकीत कळमनुरी मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, असा मतप्रवाह देखील पुढे आला आहे. त्यामुळे आता काँग्रेस पक्ष काय निर्णय घेणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

तर दुसरीकडे प्रज्ञा सातव यांना राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्यास ही संधी कोणत्या काँग्रेस नेत्याकडे जाणार, हेदेखील पाहावे लागेल. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकूल वासनिक आणि माजी खासदार अविनाश पांडे या उमेदवारीसाठी उत्सुक आहेत.

भारतीय निवडणूक आयोगाने गुरुवारी राज्यसभेच्या 6 रिक्त जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. महाराष्ट्र, तामिळना़डू, पश्चिम बंगाल, आसाम आणि मध्य प्रदेशातील रिक्त जागांवर ही निवडणूक होणार आहे. आयोगाकडून प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे. या निवडणुकीची अधिसूचना 15 सप्टेंबरला जारी होणार आहे. या जागांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. तर 4 ऑक्टोबरला मतदान होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर होईल. पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, आसाम, मध्यप्रदेशमधील एका जागेवर निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. तर, तामिळनाडूमधील दोन जागांवर निवडणूक पार पडेल.

काँग्रेसनं राजीव सातव यांना राज्यसभेवर पाठवलं होतं. राजीव सातव यांना कोरोनासंसर्ग झाल्यानं पुण्याच्या जहांगीर रुग्णालयात राजीव सातव यांच्यावर उपचार करण्यात येत होते. मात्र, 16 मे रोजी राजीव सातव यांचं कोरोनामुळं निधन झालं. त्यांच्या निधनामुळं राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. महाराष्ट्रातून राजीव सातव यांच्या जागी कुणाला संधी मिळणार हे पाहावं लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.