मुंबईमधील इमारतीला आग
१५ जखमी, सहा जणांचा मृत्यू
मुंबईमधील ताडदेव भागातील एका २० मजली इमारतीच्या १८ व्या मजल्यावर सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. १३ गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. इमारतीच्या अठराव्या मजल्यावर आग लागल्याची माहिती समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार एकूण १५ जण जखमी झाले असून, यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
लता मंगेशकर यांच्या
प्रकृतीत किंचित सुधारणा
लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांचं हेल्थ अपडेट शेअर केलं आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टर प्रतित समदानी यांनी सांगितलं की, लता मंगेशकर अजूनही आयसीयू वॉर्डमध्ये असून त्यांच्या प्रकृतीत आज थोडीशी सुधारणा झाल्याचं दिसून आलं. डॉ. समदानी पुढे म्हणाले, ‘त्यांच्यावर औषधांचा परिणाम होतानाही दिसतोय. त्याचप्रमाणे त्या बऱ्या होण्याचे चिन्हही दिसतायत.
जगातील सर्वात लांब स्कायवॉक
चिखलदरा तयार होणार
जगात स्वीत्झरलँड आणि चीन या ठिकाणी स्कायवॉक आहे. स्वीझरलँडचा स्काय वॉक ३९७ मीटर, तर चीनचा स्काय वॉक ३६० मीटरचा आहे. मात्र, अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे तयार होणारा प्रस्तावित स्कायवॉक ४०७ मीटरचा म्हणजेच जगातील सर्वात लांब स्कायवॉक असणार आहे. चिखलदरा स्कायवॉकच्या बांधकामात काही अडथळे आले. आता हे अडथळे दूर झाले आहेत. राज्याच्या पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारने या स्कायवॉकच्या बांधकामाला परवानगी दिलीय.
डिसले गुरुजींच्या संशोधन रजेचा
अर्ज मंजूर करण्याचे निर्देश
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत याविषयीची माहिती दिली असून डिसले गुरुजींच्या संशोधन रजेचा अर्ज मंजूर करण्याचे निर्देश सोलापूरच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. आपल्या ट्वीटमध्ये वर्षा गायकवाड म्हणतात, सोलापूरच्या परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजित डिसले यांनी उच्च शिक्षणासंदर्भात दिलेल्या अर्जाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दिलीप स्वामी यांच्याशी चर्चा करून हा अर्ज मंजूर करण्यास सांगितले आहे.
तमाशा सादर करण्याची परवानगी
न दिल्यास सामूहिक आत्मदहन
दोन फेब्रुवारी पर्यंत लोककलावंतांना तमाशा सादर करण्याची परवानगी न दिल्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंगल्यावर जाऊन सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा अखिल भारतीय मराठी तमाशा परिषद अध्यक्ष रघुवीर खेडकर यांनी दिलाय. ते नारायणगाव येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. देशभर सर्व काही सुरू आहे. मात्र, तमाशा बंद आहे अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे. या प्रशासनाने आम्हाला सावत्र वागणूक दिल्याच त्यांनी म्हटलं आहे.
नरसिंहानंद यांना चिथावणीखोर
भाषणं देणं महागात पडणार
यती नरसिंहानंद यांना चिथावणीखोर भाषणं देणं महागात पडणार असल्याचं दिसतंय. अटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी यती नरसिंहानंत यांचं एक वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारं असल्याचं मान्य केलंय. तसेच नरसिंहानंदांविरोधात न्यायालयाची अवमाननाप्रकरणी खटला दाखल करण्यास परवानगी दिलीय. त्यामुळे आधीच चिथावणीखोर भाषणांप्रकरणी आरोपी असलेल्या नरसिंहानंदांच्या अडचणीत चांगलीच वाढ झालीय. मुंबईत राहणाऱ्या शाची नेल्ली यांनी नरसिंहानंद यांचं एक वक्तव्य न्यायालयाचा अवमान करणारं असल्याचं सांगितलंय.
भारताविरोधात प्रसार केल्यामुळे
३५ यू ट्यूब वाहिन्यांवर बंदी
भारताविरोधात प्रसार केल्यामुळे भारत सरकारने पाकिस्तानातून चालविल्या जाणाऱ्या ३५ यू ट्यूब वाहिन्यांवर बंदी घातली आहे. या वाहिन्यांच्या वर्गणीदारांची संख्या सुमारे एक कोटी २० लाख इतकी, त्यावरील ध्वनिचित्रफिती पाहिलेल्यांची संख्या १३० कोटींहून अधिक आहे. या ३५ यू ट्यूब वाहिन्यांसह दोन इन्स्टाग्राम खाती, दोन ट्विटर खाती, दोन फेसबुक खाती आणि दोन संकेतस्थळांवरून भारताविरोधात खोटा प्रचार केला जात होता.
पॅसिफिक बेटांवरील
देशात करोनाचा शिरकाव
पॅसिफिक बेटांवर असलेले देश आत्तापर्यंत करोनाच्या प्रादुर्भावापासून लांब होते. मात्र परदेशांमधून येणाऱ्या पर्यटकांमुळे आता या देशांमध्येही करोनाचा प्रसार झाला आहे. दोन वर्षांपासून करोनाच्या तावडीतून सुटलेल्या या बेटांना आता मात्र करोनाचा फटका बसला आहे. किरीबाती आणि समोआ या देशांमध्ये आता लॉकडाउन लावण्यात आला आहे. किरीबातीमध्ये एकाही करोना रुग्णाची नोंद झाली नव्हती. समोआमध्ये आत्तापर्यंत करोनाचे केवळ दोन रुग्ण आढळले होते.
प्राण्यांना वाचवण्यासाठी
तयार केली कोरोनाची लस
कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी तज्ज्ञांनी माणसांसाठी लस तयार कली. त्यानंतर आता प्राण्यांना वाचवण्यासाठी लस आवश्यक असल्याचं समोर आलं आहे. हाच विचार करता आता प्राण्यांसाठी देखील कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्यात आली आहे. हरियाणाच्या हिसारमधील केंद्रीय अश्व संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी प्राण्यांसाठी कोरोनाची पहिली लस तयार केलीये. आता केंद्र सरकार सिंह आणि बिबट्यांवर या लसीची चाचणी घेण्याचा विचार करतंय.
मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला,
वडिलांनी कोर्टातच गोळ्या घातल्या
प्रत्येक बाप आपल्या परी मुलीला खूप जपतो. लागलं दुखलं खूपलं तिला त्रास झाला तर त्याला जराही सहन होत नाही. एका बापानं चक्क आपल्या मुलीला त्रास देणाऱ्याला आयुष्यभराची एकदाच अद्दल घडवली आहे. मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपी तरुणाला कोर्ट परिसरात गोळ्या घालून कायमचं संपवलं आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला वडिलांना कोर्ट परिसरात थेट गोळ्या घातल्या. मुख्य आरोपी दिलशाद हुसेन याचा यामध्ये जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी कोर्ट परिसरातील पोलिसांनी पीडित मुलीच्या वडिलांना ताब्यात घेतलं आहे.
मेसेज मधून ईश्वर निंदेचा आरोप,
महिलेला फाशीची शिक्षा
पाकिस्तानमध्ये न्यायालयाने एका महिलेला फाशीची शिक्षा सुनावली आहे. ईश्वरनिंदेच्या आरोपामुळे या महिलेला शिक्षा सुनावण्यात आली आहे. व्हॉट्सअॕपवर पाठवलेल्या मेसेजमध्ये प्रेषित मुहम्मद यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप महिलेवर आहे. हे प्रकरण थोडं जुनं आहे, पण महिलेला फाशीची शिक्षा झाल्यापासून ती चर्चेत आली आहे. हे प्रकरण रावळपिंडी कोर्टाशी संबंधित आहे.
जोखमीच्या देशातून आलेल्या
प्रवाशांची कोरोना चाचणी केली जाणार
कोरोना आणि ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असलेल्या जोखमीच्या देशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली आज मध्यरात्रीपासून लागू झालीय. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आतंरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा वाढता धोका लक्षात घेता केंद्र सरकारने प्रवाशांसाठी नवी नियमावली आहे. केंद्र सरकारने ज्या देशांना जोखीम असलेल्या श्रेणीत टाकलं आहे. भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी हे नियम लागू असतील.
दहावी, बारावीच्या प्रात्यक्षिक
परीक्षेचे वेळापत्रक जारी
इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षेचे वेळापत्रक काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आलं होतं. आता बोर्डाने दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जारी केलं आहे. इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा येत्या 14 फेब्रुवारीपासून सुरु होणार असून ती 3 मार्च पर्यंत चालणार आहे. दहावीची परीक्षा ही 25 फेब्रुवारी ते 14 मार्चदरम्यान होणार आहे. प्रात्यक्षिक परिक्षेचं वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना तयारी करण्यास पुरेसा कालावधी मिळणार आहे.
सुशांत सिंग मृत्यूप्रकरणी
आयोगासमोर तक्रार दाखल
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी अॅड. आशिष राय यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगासमोर तक्रार दाखल केली आहे. राय यांनी वैद्यकीय निष्काळजीपणाची तक्रार राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे नोंदवली आहे. सुशांत सिंग राजपूतच्या शवविच्छेदनाच्या वेळी कूपर रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या पॅनेलने आणि मुंबई पोलिसांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नाही असे तक्रारीत म्हटले आहे. मानवी हक्कांचे उल्लंघन झाले आहे. तसेच देशातील सर्वोच्च तपास यंत्रणांनाही तपासादरम्यान अनेक अडचणींचा सामना करावा लागला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
यंदा जॉब बदलण्याचे प्रमाण
वाढले, लिंक्डनचा अहवाल
यंदाच्या वर्षात जॉब मार्केटमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. आघाडीचे जॉब सर्च इंजिन ‘लिंक्डइन’ने नुकताच सर्वेक्षणाचा अहवाल जारी केला आहे. त्यानुसार 82 टक्के कर्मचारी नोकरी बदलण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये सर्वाधिक संख्या फ्रेशर्सची आहे. 92 टक्के फ्रेशर्सनी वर्ष 2022 मध्ये नोकरी बदलणार असल्याचे म्हटले आहे. लिंक्डनचा अहवाल 1111 कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रियेवर आधारित आहे.
SD social media
9850 60 35 90