आज दि.२२ अ़ॉक्टोबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

राज ठाकरे, शिंदे आणि फडणवीस भेटीवर अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…

मनसेच्यावतीने काल (दि.21) मोठ्या दिमाखात दिवाळी निमीत्त दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या दीपोत्सासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. दरम्यान राज ठाकरे यांची एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यासोबत वाढत चाललेली जवळीकता पाहती राज्यात नवी राजकीय समीकरणे जुळण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान काल झालेल्या कार्यक्रमावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सूचक वक्तव्य केले आहे. 

यावर अजित पवार म्हणाले की, त्यांनी एकत्र येऊ नये का? तुम्हाला वाईट का वाटतंय? दिवाळीच्या काळात सगळ्यांनी एकत्र यावं. शुभेच्छा द्याव्यात. त्यात आक्षेप घेण्याचं काय कारण आहे?” म्हणत त्यांनी बोलण्याचे टाळल.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला जाणे भोवले, जयदत्त क्षीरसागर यांची सेनेतून हकालपट्टी, बीडमध्ये खळबळ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक साधणे शिवसेनेचे आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना चांगले भोवले आहे. जयदत्त क्षीरसागर यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकलपट्टी केल्याची घोषणा बीड जिल्हा संपर्क प्रमुख धोंडीराम पाटील यांनी केली आहे. या घोषणेमुळे बीडच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.बीड शहरातील सिमेंट रस्ता व नालीच्या 70 कोटींच्या विकास कामाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ करण्यात आलं होतं. जयदत्त क्षीरसागर यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यामुळे आज जिल्हा संपर्कप्रमुख धोंडीराम पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन क्षीरसागर यांच्यावर कारवाईची घोषणा केली.

मध्य प्रदेशमध्ये बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 14 जणांचा मृत्यू

ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर मध्य प्रदेशमध्ये अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या रिवा इथं भीषण अपघात एकामागून एक तीन वाहनांची धडक झाली. बस आणि ट्रकच्या धडकेत 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातात 40 हून अधिक जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशमधील रिवा इथं हा अपघात घडला आहे. ही बस हैदराबादहून लखनऊकडे जात होती. या बसमध्ये 100 हून अधिक प्रवासी प्रवास करत होते.

माणूसकीला काळीमा; मृतदेह ताब्यात देण्यासाठी कंपनीनं मागितले 5 लाख रुपये

जगातली फुटबॉलची सर्वांत मोठी फिफा वर्ल्ड कप स्पर्धा नोव्हेंबर महिन्यात कतारमध्ये सुरू होत आहे. या स्पर्धेसाठी कतारमध्ये गेल्या काही वर्षांपासून जय्यत तयारी सुरू होती. आता ती अंतिम टप्प्यात आली आहे. भारतातले अनेक कामगार या स्पर्धेच्या कामासाठी कतारमध्ये गेले होते. त्यातच तेलंगण राज्यातला 40 वर्षांचा राजेंद्र प्रभूही होता. कर्ज फेडण्यासाठी पैसे मिळवण्यासाठी कतारला गेलेल्या राजेंद्रचा तिथे दुर्दैवी मृत्यू झाला. मृतदेह ताब्यात देण्यासाठी तब्बल 5 लाख रुपयांची मागणी कुटुंबीयांकडे करण्यात आली.

भारतात तब्बल 22 कोटी ‘बालिका वधू’; महाराष्ट्राचा आकडाही चिंता वाढवणारा!

भारतात बालविवाहाची प्रथा कायद्यानुसार बंद झाली असली, तरी प्रत्यक्षात बालविवाहाच्या अनेक घटना दररोज घडताहेत. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या आकडेवारीनुसार, 2012 ते 2021 दरम्यान बालविवाह विरोधी कायद्याअंतर्गत 4 हजारांहून जास्त गुन्ह्यांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे यापैकी 71 टक्के घटना गेल्या 5 वर्षांतल्या आहेत. भारतातल्या अर्ध्याहून अधिक बालवधू उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार आदी राज्यांत असून, पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातही सुमारे 2 कोटी बालवधू आहेत, असंही एका रिपोर्टमध्ये स्पष्ट झालंय. बालविवाह रोखण्यासाठी भारतात स्वातंत्र्याआधीपासून कायदे होते. त्यात वेळोवेळी बदलही करण्यात आले; मात्र स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरदेखील देशातलं बालविवाहाचं हे प्रमाण दुःखद आहे. ‘आज तक’ने याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे.

“जयंत पाटलांच्या घरावर भाजपाचा झेंडा लागणार”, गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याने राष्ट्रवादीत खळबळ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्षात उभी फूट पडली. एकनाथ शिंदेंनी-भाजपाबरोबर जात सत्ता स्थापन केली. त्यामुळे शिवसेनेत फूट पाडण्यास भाजपाच कारणीभूत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येतो. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यात भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.गोपीचंद पडळकर एका कार्यक्रमात बोलत होते. तेव्हा त्यांनी म्हटलं की, “भाजपाचा झेंडा आज राष्ट्रवादीच्या कार्यालयावर लागला आहे. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, हाच भाजपाचा झेंडा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या घरावर दिसेल. त्यानंतर मुंबईच्या राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात नेमका झेंडा कोणाचा लागणार, यामुळे त्यांच्यात वाद होईल. त्यात बहुमताने कार्यकर्ते म्हणतील आता भाजपात प्रवेश करूया,” असेही गोपीचंद पडळकर म्हणाले.

उत्तर प्रदेशमध्ये रेल्वेत नमाज पठण, भाजपाच्या माजी आमदाराने केला व्हिडीओ शेअर

उत्तर प्रदेशमधील भाजपाचे माजी आमदार दीपलाल भारती यांनी रेल्वेतील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मुस्लीम बांधव रेल्वेत नमाज पठण करत असल्याचे दिसत आहे. खड्डा रेल्वेस्थानकावर रेल्वे थांबल्यानंतर नमाज पठण करण्यात आले, असे दीपलाल भारती यांनी सांगितले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेशमधील गोरखपूर पोलिसांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे पोलीस अधिकारी अवधेश सिंह यांनी सांगितले आहे.

आता न्यूयॉर्कमध्ये धुमधडाक्यात साजरी होणार दिवाळी, शाळांना मिळणार सार्वजनिक सुट्टी

दिवाळी हा हिंदुंचा सर्वात मोठा सण आहे. या काळात लहान मुलांना उत्साहात सण साजरा करता यावा, यासाठी भारतातील शाळांना किमान दोन आठवडे सार्वजनिक सुट्टी दिली जाते. पण इतर देशात अशा सुट्ट्या दिल्या जात नाहीत. पण पुढील वर्षापासून न्यूयॉर्क शहरातील सरकारी शाळांना दिवाळीनिमित्त सार्वजनिक सुट्टी दिली जाणार आहे.न्यूयॉर्क शहराचे महापौर एरिक अॕडम्स यांनी गुरुवारी सकाळी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. यावेळी राज्य विधानसभा सदस्य जेनिफर राजकुमार आणि शिक्षण विभागाचे कुलपती डेव्हिड बँक्स हेही उपस्थित होते. दिवाळी हा हिंदुंचा प्रमुख सण आहे. परंतु काही बौद्ध, शीख आणि जैन धर्मातील लोकंही हा सण साजरा करतात. दिवाळीच्या तारखांमध्ये दरवर्षी बदल होत असतो, ही बाब लक्षात घेऊन सरकारी शाळांच्या वार्षिकीमध्ये त्याप्रमाणे बदल करण्यात येणार आहेत. यंदा पाच दिवसांची सुट्टी २४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

दोन हजार कोटींचा उल्लेख करत ओवेसी म्हणाले, “…तर उद्या होणारा पाकिस्तान विरुद्धचा सामना खेळू नका”

आजपासून सुरु होत असणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये उद्या म्हणजेच २३ ऑक्टोबर रोजी मेलबर्नच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तानचे संघ आमने-सामने येणार आहेत. असं असतानाच दुसरीकडे २०२३ च्या आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानला पाठवायचा की नाही यावर वाद सुरु आहेत. या साऱ्या गोंधळावर हैदराबादचे खासदार आणि ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहाद उल मुस्लिमीन म्हणजेच एमआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी या सामन्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. भारत पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये सामना खेळू शकतो तर पाकिस्तानमध्ये संघ पाठवण्यात काय अडचण आहे असा सवाल ओवेसींनी विचारला आहे.ओवेसींनी दोन हजार कोटींचा उल्लेख करत हे पैसे भारतापेक्षा जास्त महत्वाचे आहेत का असा प्रश्न विचारला आहे. “तुम्ही उद्या पाकिस्तानविरुद्ध सामना का खेळत आहात? नव्हता खेळायला पाहिजे ना. आम्ही पाकिस्तानमध्ये जाणार नाही पण ऑस्ट्रेलियामध्ये त्याच्याविरोधात खेळू. हे कोणत्या प्रकारचं प्रेम आहे? पाकिस्तानविरुद्ध खेळूच ना. तुम्ही पाकिस्ताविरोधात खेळला नाहीत तर काय होणार आहे? टीव्ही प्रक्षेपणाच्या हक्कांसाठी मिळणाऱ्या दोन हजार कोटींचा तोटा ना होईल ना? पण मग हे पैसे भारतापेक्षा अधिक महत्त्वाचं आहे का? सोडून द्या ना,” असं ओवेसी म्हणाले आहेत.

माजी विश्वविजेते पहिल्याच सामन्यात गारद, न्यूझीलंडने तब्बल ८९ धावांनी मिळवला विजय

टी२० विश्वचषकामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध न्यूझीलंड लढतीने सुपर १२ सामन्यांना सुरुवात झाली. गतविजेता ऑस्ट्रेलियाने २०२१ च्या टी२० विश्वचषकात न्यूझीलंडचा अंतिम सामन्यात पराभव करून पहिल्यांदाच विश्वचषकावर नाव कोरले होते त्याचा वचपा आजच्या सामन्यात तब्बल ८९ धावांनी पराभव करत न्यूझीलंडने काढला. या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ३ बाद २०० धावा केल्या होत्या. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया संघाला २०१ धावांचे लक्ष्य दिले होते. महत्त्वपूर्ण खेळी करणाऱ्या डेव्हॉन कॉन्वेला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.टी२० विश्वचषकाचे प्रमुख दावेदार आणि माजी विजेते म्हणून ज्यांच्याकडे पहिले जात होते त्यांना त्यांच्याच शेजारी असणाऱ्या देशाने म्हणजेच न्यूझीलंडने तब्बल ८९ धावांनी पराभव करत शानदार विजय मिळवला आहे. सलामीवीर फिन ऍलनने १६ चेंडूंवर ४२ धावांची खेळी केली.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.