भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार
यांच्या विरोधात मुंबईत गुन्हा
भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार आणि ३० पेक्षा जास्त पक्ष कार्यकर्त्यांविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राज्यभरातील मंदिरं उघडण्यास राज्य सरकारने परवानगी द्यावी, यासाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेतलेली आहे. या पार्श्वभूमीवरच सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास सुधीर मुनगंटीवार व भाजपा कार्यकर्ते दक्षिण मुंबईतील बाबुलनाथ मंदिराबाहेर मोठ्यासंख्येने जमले होते, म्हणून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
तालिबानचा पंजशीरवर हल्ला,
झाले मोठे नुकसान
अमेरिका अफगाणिस्तानातून बाहेर पडताच तालिबानने आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे. अमेरिका सोमवारी रात्री उशिरा काबूलहून आपले शेवटचे विमान उडवत असताना तालिबानी लढाऊंनी पंजशीरवर हल्ला केला. मात्र या हल्ल्यात तालिबानला मोठे नुकसान झाले. तालिबानला सडेतोड उत्तर मिळाले. यामध्ये ८ तालिबानी ठार झाले आहेत.
पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांकडून
श्रीकृष्ण मूर्तीची विटंबना
पाकिस्तानमध्ये तेथील अल्पसंख्यांक समाजाच्या प्रार्थनास्थळांवर वारंवार हल्ले करण्याच्या घटना घडतात. काल ३० ऑगस्ट रोजी येथील श्रीकृष्ण मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. परंतु त्याच वेळी काही दहशतवादी लोकांनी या मंदिरावर हल्ला करून श्रीकृष्णाच्या मूर्तीची विटंबना केली या घटनेचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे. विशेष म्हणजे महिनाभरापूर्वी देखील पाकिस्तानमध्ये अशीच घटना घडली होती.
गानकोकिळा लता मंगेशकर यांचे
पंतप्रधानांनी मानले आभार
भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या होत्या, या शुभेच्छांबद्दल पंतप्रधानांनी लतादीदींचे आभार मानले आहेत. लतादीदींनी पंतप्रधानांना शुभेच्छा देणारे ट्विट करत त्यासोबत एक गुजराती भजन जोडले होते. आशीर्वादासाठी आपले खूप खूप आभार लतादीदी ! आपल्यालाही जन्माष्टमीच्या अनेक शुभेच्छा ! आपल्या सूरांनी सजलेलं हे भजन मंत्रमुग्ध करणारं आहे. असं ट्विट पंतप्रधानांनी उत्तरादाखल केले आहे.
चाळीसगाव तालुक्यात ढगफुटी
नदीकाठची गावे पुराच्या वेढ्यात
चाळीसगाव तालुक्यात ढगफुटी झाली. यामुळे गिरणा धरणाखालील गिरणा नदी, उपनद्यांना व नाल्यांना मोठा पूर आला आहे. चाळीसगाव तालुक्यातील गिरणा नदीकाठच्या चार गावांना पुराचा वेढा पडला आहे. त्यात दोघे अडकले असून, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ‘एसडीआरएफ’चे पथक बचावकार्यासाठी रवाना झाले आहे. मुंदखेडा, वाकडी येथील जनावरे वाहून गेली आहेत. दरम्यान, कन्नड घाटात दरड कोसळल्याने घाटरस्ता बंद करण्यात आला आहे.
वेगवान गोलंदाज
डेल स्टेनने निवृत्त
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने क्रिकेटच्या सर्व स्वरुपातून निवृत्ती घेतली आहे. त्याने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत आपल्या निवृत्तीची घोषणा केली. स्टेनने आयपीएलपूर्वी आपल्या १७ वर्षाच्या कारकिर्दीचा शेवट केला. त्याने याआधी कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले होते.
नेमबाजीत भारताच्या
सिंहराजला कांस्यपदक
पॅरॉलिम्पिकमध्ये भारताच्या सिंहराजने पुरुषांच्या नेमबाजीत दहा मीटर एअर पिस्तुलच्या प्रकारात अंतिम सामन्यात कांस्यपदक पटकावले आहे. नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या एअर पिस्तुल प्रकारात एसएच-१ च्या अंतिम सामन्यात भारताच्या सिंहराज अडानाने २१६.८ अंकांनी सुवर्णपदाकाला गवसणी घातली. पदकाचे दावेदार मनीष नरवाल अंतिम सामन्यात विशेष काही करू शकला नाही. दुसऱ्या फेरीत तो बाहेर पडला.
रुफटॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा
बसविण्यासाठी ४० टक्क्यांपर्यंत अनुदान
वीज कर्मचाऱ्यांना छतावरील (रुफटॉप) सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून ४० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार आहे. सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणेमुळे मासिक घरगुती वीजबिलात मोठी बचत होणार आहे त नेटमिटरिंगद्वारे महावितरणकडून वर्षाअखेर शिल्लक वीज देखील विकत घेतली जाणार आहे. या योजनेसंदर्भात महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी काल आढावा घेतला आणि घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना या योजनेचा लाभ देण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांनी तत्पर कार्यवाही करावी असे निर्देश
भारतीय बनावटीची खाट
न्यूझीलंडमध्ये 41 हजारांना
न्यूझीलंडमधील एका फर्निचर ब्रॅण्डने व्हिंजेट प्रोडक्टच्या नावाखाली भारतामध्ये चारपाई नावाने ओळखली जाणारी खाट विक्रीसाठी काढली आहे. ‘व्हिंटेज इंडियन डेबेड’ या नावाने ही खाट विकायला काढली आहे. ही खाट ८०० न्यूझीलंड डॉलर्सला म्हणजेच ४१ हजार २११ रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करुन दिलीय.
टी-२० लीग आयपीएलसाठी
खेळणार दहा संघ
स्थानिक टी-२० लीग आयपीएलसाठी बीसीसीआय मोठी तयारी करत आहे. पुढील हंगामापासून, आयपीएल २०२२मध्ये ८ ऐवजी १० संघ असणार आहेत. बोर्डाने एका संघाची मूळ किंमत सुमारे २ हजार कोटी रुपये ठेवली आहे. अशा स्थितीत बीसीसीआयला या २ संघांकडून सुमारे ५ हजार कोटी मिळू शकतात. पुढील हंगामापासून ६० ऐवजी ७४ सामने खेळले जातील. चालू हंगामातील उर्वरित ३१ सामने १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये होणार आहेत.
KBC मध्ये सहभाग घेतला,
या कर्मचाऱ्याला रेल्वेने दिली नोटीस
KBC चा 13 वा सीझन सुरू आहे. ज्या मंचावर करोडपती होण्याचं स्वप्न पाहिली जातात त्याच मंचावर एका व्यक्तीला खूप मोठं नुकसान झालं आहे. कौन बनेगा करोडपतीच्या मंचावर कोटा रेल्वे विभागाच्या स्थानिक खरेदी विभागाचे कार्यालय अधीक्षक देशबंधु पांडे यांनी सहभाग घेतला होता. देशबंधु हॉटसीटवर बसल्यानंतर रेल्वेनं त्यांच्या हातात चार्टशीट दिली. त्यांना 3 वर्ष कोणतीही पगारवाढ मिळणार नाही अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र, मराठवाड्यात
मोठ्या पावसाची शक्यता
राज्यात पुन्हा जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुढील दोन दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने दिली आहे. दरम्यान, राज्यातील 16 जिल्ह्यांसह मुंबई-पुण्यात पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे पाणीप्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. आज-उद्या पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत 16 टक्क्यांनी पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे पाणीसाठ्याबाबत चिंता कायम आहे.
तामिळनाडू राज्यातील लॉकडाऊन
15 सप्टेंबरपर्यंत वाढवला
तामिळनाडू सरकारने राज्यातील लॉकडाऊन 15 सप्टेंबरपर्यंत वाढवला आहे. दरम्यान राज्यातील लोकांना काही नियमांमधून शिथिलता देण्यात आली आहे. सरकारने लोकांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नवीन नियमांनुसार सरकारने रविवारी समुद्र तटांवर प्रतिबंध लावले आहेत. रविवारी सार्वजनिक समारंभांना बंदी घालण्यात आली आहे.
SD social media
9850 60 3590