राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी काल पुन्हा एकदा लवकरच सीडी लावणार असल्याचं विधान केलं आहे. या विधानावरून भाजप नेते गिरीश महाजन यांनी खडसेंना डिवचलं आहे. आमची ईडी लागली, तुमची सीडी लावा, असं आव्हानच गिरीश महाजन यांनी खडसेंना दिलं आहे. मात्र, महाजन यांच्या या विधानावर आश्चर्यही व्यक्त केलं जात आहे. भाजपनेच खडसेंच्या मागे ईडी लावल्याचं महाजन यांनी कबूल केल्याचीही जोरदार चर्चा रंगली असून अनेक तर्कवितर्कही लढवले जात आहेत.
सीडीचा विषय आता जुना झाला असून आमची ईडी लागली आता तुमची सीडी लावा, असा टोमणा माजी मंत्री गिरीश महाजन यांनी लगावला आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक अडचणीत असताना त्यांचा वीज पुरवठा खंडित करणे चुकीचे आहे. महावितरणच्या कारभाराविरुद्ध एखादे आंदोलन उभारावे लागेल. तिसरी लाट येऊ नये यासाठी आपण प्रार्थना करूया. सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. एकीकडे सर्व उघडे ठेवणे आणि दुसरीकडे मंदिरे बंद ठेवणे हे योग्य नाही, असेही महाजन म्हणाले.
एकनाथ खडसे यांनी काल मीडियाशी बोलताना सीडी लावण्याचा इशारा दिला होता. ईडी लावली तर सीडी लावेन असं मी म्हणालो होतो. हे खरं आहे. गेल्या पाच सहा महिन्यांपासून ती सीडी पोलिसांकडे दिली आहे. पोलीस त्याची चौकशी करत आहेत. चौकशी अहवाल आल्यानंतर लवकरच मी हा अहवाल जाहीर करणार आहे, असं खडसे म्हणाले होते.
गेल्या 40 वर्षात माझ्यावर एकही आक्षेप आलेला नाही. राजकारणात कधीही कुणी माझ्याविरोधात काही बोललेलं नाही. पण जमिनीबाबत माझ्यावर हेतूपुरस्सर आरोप करण्यात आला. कोर्टानेही आरोपात तथ्य नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे कर नाही तर डर कशाला? त्यामुळे ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहे, असं ते म्हणाले होते.
जे भ्रष्टाचार करतात, गैरव्यवहार करतात त्या लोकांवर आम्ही कारवाई करतो, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यामुळे मला अपेक्षा आहे की दादांनी त्यांच्या शेजारी बसणाऱ्या लोकांची चौकशी करावी. त्यांनी माझी ईडीची चौकशी लावली हे चंद्रकांतदादांनी मान्य केलं. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. विधानसभेत मी वारंवार विचारलं माझा दोष काय आहे ते सांगा. आता ईडीने चौकशी लावली. ती कोर्टात काय व्हायचं ते होईल, असंही ते म्हणाले होते.