नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था सुरू करण्यासाठी एकूण 7 विषयांना शासनस्तरावर मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार 2022-23 या शैक्षणिक वर्षात अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकांची निवड करून या अभ्यासक्रमांना सुरुवात केली जाणार आहे. तब्बल 670 कोटी रुपयांचा हा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे, अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
आरोग्य विज्ञान विद्यापीठातील नव्या अभ्यासक्रमातंर्गत औषध वैद्यक शास्त्र 12, बालरोग चिकित्सा शास्त्र 06, शल्य चिकित्सा शास्त्र 12, अस्थिरोग शास्त्र 06, भूलशास्त्र 14, स्त्रीरोग चिकित्सा व प्रस्तुती शास्त्र 06, आपत्कालीन औषध वैद्यकशास्त्र 03 अशा एकूण 59 विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असलेला पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमासाठी एकूण 49 अनुभवी अधिष्ठाता व विशेष तज्ज्ञांची नेमणूक करण्यासाठी जाहिरात देण्यात आली असून, 27 ते 31 जानेवारी 2022 या दरम्यान मुलाखत घेवून निवड करण्यात येणार आहे. सदरचा प्रकल्प हा 670 कोटी रुपयांचा असून, विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय इमारतीच्या कामकाजाबाबत आवश्यक सर्व प्रमाणपत्र, सामंजस्य करार व इतर महत्वपूर्ण बाबींची पूर्तता करून प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत इमारत बांधकाम संदर्भात प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावास शासनस्तरावर मान्यता मिळण्यासाठी मी स्वत: लक्ष घालणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या इमारतीचे बांधकाम करतांना अनुभवी तज्ज्ञ वास्तू विशारदाची नेमणूक करून त्यांच्यामार्फत महाविद्यालय व रुग्णालयाच्या सोयीसुविधांच्या दृष्टीने उत्कृष्ट प्रतिचे बांधकाम करावे. तसेच नव्याने तयार होणारे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम व इतर आवश्यक बाबी पूर्ण करण्यासाठी निधीची कमतरता भासल्यास शासनस्तरावर आवश्यक ती सर्व मदत व वाढीव निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी दिली आहे.