कोरोनाने (Corona) पुन्हा एकदा डोकं वर काढल्याने मनोरंजन विश्व पुन्हा एकदा ठप्प पडण्याच्या मार्गावर आहे. बॅक टू बॅक प्रद्रषित होणारे सिनेमे आता पुढे ढकलले जात आहेत. कोरोनामुळे पुन्हा एकदा सिनेमा हॉल बंद होत आहेत. मनोरंजनावर फुलस्टॉप लावला जातोय, असेच म्हणावे लागेल. नवीन वर्षाच्या आगमनाने चाहत्यांमध्ये मोठ्या चित्रपटांच्या प्रदर्शनाची प्रचंड उत्सुकता होती. पण निर्माते आणि चाहत्यांच्या या आनंदावर कोरोनामुळे पुन्हा एकदा विरजण पडेल, हे कोणाला माहीत होते.
गेल्या आठवड्यात एकामागून एक चित्रपट पुढे ढकलण्यात आले आहेत. 31 डिसेंबरला पहिल्यांदा शाहिद कपूरच्या रिलीज होऊ घातलेल्या ‘जर्सी’ला व्हायरसचा फटका बसला. त्यानंतर काय जणू चित्रपट पुढे ढकलण्याची प्रक्रिया सुरूच झाली. आतापर्यंत बड्या स्टार्स आणि बॅनरचे 5 सिनेमे पुढे ढकलण्यात आले आहेत. यापैकी बहुतांश जानेवारीत रिलीज होणार होते. आता या चित्रपटांसाठी चाहत्यांना बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे. पुढे ढकलण्यात आलेल्या या 5 चित्रपटांबद्दल जाणून घेऊया.
शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर यांचा ‘जर्सी’ हा चित्रपट 31 डिसेंबर रोजी रिलीज करून, निर्माते प्रेक्षकांना नववर्षाचं गिफ्ट देणार होते. पण, या चित्रपटाच्या रिलीजवर व्हायरसने हल्ला केला. कोरोनाची वाढती प्रकरणे पाहून निर्मात्यांनी चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलणे चांगले समजले.
या जानेवारीमध्ये सर्वात मोठा चित्रपट म्हणजेच राजामौलींचा RRR हा चित्रपट होण्याची अपेक्षा होती. आधीच कोरोनामुळे या चित्रपटाला उशीर झाला होता. चित्रपट वेळेवर प्रदर्शित करण्यासाठी निर्मात्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. परंतु, देशातील अनेक राज्यांमध्ये चित्रपटगृहे बंद होती, काही राज्यांमध्ये 50 टक्के लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. अशा परिस्थितीत निर्मात्यांना चित्रपटाच्या कमाईचा विअचार करून तो पुढे ढकलावा लागला.
‘बाहुबली’ अभिनेता प्रभासचा ‘राधे श्याम’ हा चित्रपट 14 जानेवारीला प्रदर्शित होणार होता. रोमँटिक थ्रिलर चित्रपटात पूजा हेगडे प्रभाससोबत दिसणार आहे. बाहुबलीचे चाहते प्रभासला रोमँटिक अवतारात पाहण्यासाठी उत्सुक होते, पण काय करणार… कोरोनाचा कहर पाहून त्याचेही प्रदर्शन पुढे ढकलावे लागले.
21 जानेवारी रोजी थिएटरमध्ये ‘हिट टू हिट’ करण्यासाठी तयार असलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजेच अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लरच्या ‘पृथ्वीराज’ या चित्रपटालाही कोरोनाने लगाम लावला. निर्मात्यांनी या पीरियड ड्रामाचे प्रदर्शन पुढे ढकलला आहे. अक्षय कुमारला पृथ्वीराजच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते.
या सर्व सिनेमांशिवाय साऊथ स्टार अजित कुमारचा ‘वलीमाई’ हा सिनेमाही पुढे ढकलावा लागला आहे. 13 जानेवारीला प्रदर्शित होणारा हा चित्रपटही आता पुढे ढकलण्यात आला आहे. थाला अजित कुमारच्या या चित्रपटात हुमा कुरेशी महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.
आता हे सिनेमे सिनेमागृहात कधी पाहायला मिळणार याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. आशा आहे की, ते दिवस लवकरच येतील आणि मनोरंजन जगाला पुन्हा वैभव प्राप्त होईल.