जे अमंगल आहे ते
नष्ट होवो : मुख्यमंत्री
वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. “जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो”, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी गणरायाच्या चरणी केली आहे. राज्यातील जनतेला शुभेच्छा देताना मुख्यमंत्र्यांनी असं आवाहन केलं आहे की, “करोनाविरुद्ध जनतेला जागरूक करण्यासाठी आणि या संकटातून आपली मुक्तता व्हावी म्हणून आपण सर्वांनी जबाबदार नागरिक म्हणून प्रयत्न करायला हवेत.
राज्यातील ३१ आयपीएस
अधिकाऱ्यांच्या बदल्या
राज्यातील अति वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अनेक दिवसांपासून बदल्या रखडलेल्या होत्या. आज अखेर त्याला मुहूर्त मिळाला. राज्यातील ३१ आयपीएस अधिकाऱ्यांसह ५४ पोलीस उपायुक्त /अपर अधीक्षक यांच्या सह ९२ साहाय्यक पोलिस आयुक्त उपाध्यक्ष यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ६ सहाय्यक पोलीस अधीक्षक यांना उपायुक्त पदावर पदोन्नती मिळाली आहे. तर औरंगाबाद नागपूर, वाशिम, अमरावती धुळे, नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांची बदली झाली आहे.
महिला मंत्री होऊ शकत नाहीत, त्यांनी
मुलांना जन्म द्यावा : तालिबानचा फतावा
तालिबान अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर अनेक फतवे काढत आहे. तालिबानने अफगाण महिलांना क्रिकेट सहित अन्य खेळांमध्ये भाग घेण्यावर बंदी घातली आहे. तालिबान प्रवक्त्याने सांगितले की, महिला मंत्री होऊ शकत नाहीत, त्यांनी फक्त मुलांना जन्म द्यावा. तालिबानचे प्रवक्ते सय्यद जकारुल्लाह हाशिमी यांनी नवीन अफगाणिस्तान सरकारमध्ये महिलांचा समावेश न करण्याबाबत टोलो न्यूजवर वक्तव्य केले आहे.
करोना संसर्गाचा धोका
पाचवा कसोटी सामना रद्द
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) भारत आणि इंग्लंडदरम्यान मँचेस्टर येथे होणारा पाचवा कसोटी सामना रद्द केला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिलीय. भारतीय संघातील भारतीय क्रिकेट संघाचे साहाय्यक फिजिओ योगेश परमार यांची करोना चाचणी सकारात्मक आल्यामुळे खेळाडूंनाही करोना संसर्गाचा धोका असल्याने कसोटी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
परतीच्या पावसाला
यंदा होणार विलंब
सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. त्यामुळे यंदा परतीच्या पावसाला विलंब होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान विभागाने पुढच्या पाच दिवसात काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 11 सप्टेंबर रोजी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. तर 12 सप्टेंबर रोजी ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, नंदुरबार, धुळे, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
लोकायुक्त कायद्यावरून
आण्णा हजारे यांचे पुन्हा आंदोलन
ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी सरकारला लोकायुक्त कायद्यावरून पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. ‘लोकपाल/लोकायुक्तासाठी कायदा ही भूमिका आम्ही 2011 मध्येच ठरवलेली आहे. त्यामुळे आता पुन्हा आंदोलन करू’ असे आण्णा हजारे यांनी म्हटले आहे. ‘लोकायुक्त साठी मी 3 आंदोलन केली आता या कायद्यासाठी चौथ आंदोलन करू’ असे म्हणत हजारे यांनी पुन्हा सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे.
जमीन राखणाऱ्यांनीच जमीन
चोरली : नाना पटोले
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेसबद्दल “आजच्या काँग्रेसची अवस्था ही उत्तर प्रदेशातल्या एखाद्या जमीनदारासारखी झालीय. रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार हे सगळं हिरवंगार शिवार माझं होतं, असं सांगतो. काहीशी तशीच अवस्था आजच्या काँग्रेसची झालीय.” असं म्हणाले आहेत. त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शरद पवारांच्या या विधानावर प्रतिक्रिया देत, “काँग्रेसने अनेकांना जमीन राखायला दिलेली होती, जमीन राखणाऱ्यांनीच जमीन चोरली.” असं नाना पटोलेंनी बोलून दाखवलं आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी
प्रियंका गांधी देखील मैदानात
उत्तर प्रदेशमध्ये आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा, काँग्रेस, बसपासह सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. जास्तीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी सर्व पक्ष विविध प्रकारे प्रयत्न करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी देखील मैदानात उतरल्या असून, त्या उत्तर प्रदेशमधील गावं आणि शहरांमधून तब्बल १२ हजार किलोमीटरची यात्रा करणार आहेत.
कोणत्याही माफियाला पक्षाचं
तिकीट मिळणार नाही : मायावती
आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्याही माफियाला पक्षाचं तिकीट मिळणार नाही, यासाठी आमचा प्रयत्न आहे. यासाठी उत्तर प्रदेशातील आझमगड विधानसभा मतदारसंघातून मुख्तार अन्सारी ऐवजी बसपा प्रदेशाध्यक्ष भीम राजभर यांना तिकीट देण्याचं निश्चित केलं आहे”, असं ट्वीट बसपा अध्यक्ष मायावती यांनी केलं आहे.
माजी मुख्यमंत्र्याची मेहुणी
फिरते रस्त्यावर भिकाऱ्यासारखी
पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांची मेहुणी इरा बासू बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बाराबाजार भागात डनलॉपच्या रस्त्यावर फिरत आहे. ती विक्रेत्यांकडून खायला काहितरी घेते आणि तिथेच फुटपाथवर झोपते. ही महिला पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांची मेहुणी इरा बासू असल्याची माहिती समोर आली आहे. भट्टाचार्य १० वर्षांहून अधिक बंगालचे मुख्यमंत्री होते. इरा बासू या बुद्धदेव यांच्या पत्नी मीराच्या बहीण आहेत.
SD social media
9850 60 3590