आज दि.१५ जुलै च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

मुख्यमंत्र्यांची नाव डगमगली

गेल्या आठवड्याभरापासून दिल्ली, पंजाबमध्ये पावसाने हाहाकार उडाला आहे. दिल्लीत यमुना नदीला महापूर आला आहे. तर पंजाबमध्येही जालंधर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या भागाचा दौरा करण्यासाठी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान गेले होते. त्यांच्यासोबत राज्यसभा खासदार संत बलवीर सिंह सिचेवाल हेसुद्धा होते. नावेतून जात असताना मुख्यमंत्री मान थोडक्यात बचावले.पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जाताना क्षमतेपेक्षा जास्त लोक नावेत बसल्यानं वाहत्या पाण्यात नाव पोहोचताच ती डगमगली. त्यावेळी खासदार सिचेवाल यांनी नावेवर नियंत्रण मिळवलं. दरम्यान, अचानक घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ गोंधळ उडाला होता. आता या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी अनंतात विलीन, कुटुंबियांनी पुण्यात दिला अखेरचा निरोप

मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. आज पावणे सहा वाजण्याच्या सुमारास विद्युती दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. रवींद्र महाजनी यांच्या मागे पत्नी माधवी महाजनी, मुलगा अभिनेता गश्मीर, मुलगी आणि नातवंड असा परिवार आहे.

ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचं ७४ व्या वर्षी निधन झालं. तळेगाव दाभाडेजवळील आंबी गावात ते भाड्याने राहत होते, तिथेच फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. तीन दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला असावा, असं पोलिसांनी म्हटलं आहे. रवींद्र महाजनी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात नेण्यात आला आहे.वडिलांच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर त्याचा मुलगा गश्मीर मुंबईहून तळेगाव दाभाडेला आला.

“राष्ट्रवादीने व्यवस्थित दबाव टाकला आणि…”, खातेवाटपावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया

मागील अनेक दिवसांपासून लांबवणीवर असलेलं राज्यमंत्रीमंडळाचं खातेवाटप झालं आहे. यामध्ये अनेक महत्त्वाची खाती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना मिळाली आहेत. अजित पवारांकडे अर्थखातं देऊ नये, यासाठी शिंदे गटातील आमदार विरोध करत होते. असं असूनही अजित पवारांकडे अर्थखातं देण्यात आलं आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे गटातील काही आमदार नाराज झाल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार बच्चू कडू यांनी राज्यमंत्रिमंडळाच्या खातेवाटपावर प्रतिक्रिया दिली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसने व्यवस्थित दबाव टाकला आणि यशस्वी झाले, अशी प्रतिक्रिया आमदार कडू यांनी दिली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते. खातेवाटपावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले, “मंत्रिमंडळाच्या खातेवाटपात उशिरा आलेल्या राष्ट्रवादीला झुकतं माप दिलं आहे, असं एकंदरीत दिसतंय. आता जे काही राहिलेले लोक आहेत, त्यांच्या नशिबी काय येईल? हे मला माहीत नाही. आता जे खातेवाटप झालंय, ते अजित पवार यांच्या सोयीनुसार झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने व्यवस्थित दबाब टाकला आणि ते यशस्वी झाले, असं एकंदरीत दिसतंय.”

पावसाचा जोर वाढणार! १९ ते २२ जुलैदरम्यान ‘कोसळधार’…

महाराष्ट्रातील काही भागात गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाने वेग पकडला आहे, पण अजूनही पेरणीयोग्य म्हणावा तसा पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. मात्र, आता मोसमी वाऱ्याचा जोर वाढला असून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामुळे १९ ते २२ जुलै या काळात राज्यात सर्वदूर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.मोसमी वाऱ्याचा जोर वाढल्यामुळे बाष्पांनी भरलेले ढग पश्चिम घाट ओलांडून पुढे जातील. तर याच काळात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामुळे १९ ते २२ जुलै या काळात राज्यात चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. किनारपट्टीवर मुसळधार, तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.

सिंगापूरमध्ये भ्रष्टाचारप्रकरणात उद्योगपतीबरोबर थेट केंद्रीय मंत्र्याला अटक

सिंगापूरमध्ये भ्रष्टाचारप्रकरणात केंद्रीय वाहतूक मंत्र्याला अटक करण्यात आली. या मंत्र्यासह एका कोट्याधीश हॉटेल उद्योजकावरही कारवाई करण्यात आली. सिंगापूरच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने चौकशीनंतर ही कारवाई केली. एस. इस्वरन असं या मंत्र्याचं नाव आहे. अटकेनंतर आरोपी मंत्र्याला लगेचच जामिनावर सोडून देण्यात आलं.सिंगापूरमध्ये भ्रष्टाचारविरोधी तपास पथकाने (सीपीआयबी) शुक्रवारी (१४ जुलै) एक निवेदन जारी करत याप्रकरणाची माहिती दिली. तसेच या प्रकरणात ही पहिली अटक असल्याचंही नमूद केलं. यानुसार, केंद्रीय मंत्री इस्वरन यांना आणि हॉटेल क्षेत्रातील उद्योजक आणि सिंगापूरच्या सर्वाधिक श्रीमंतांपैकी एक ओंग बेंग सेंग यांना एकाच दिवशी अटक करण्यात आलं. तसेच नंतर जामिनावर सोडून देण्यात आलं.

विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसमध्ये मोर्चेबांधणी ; नाना पटोले यांची दिल्लीवारी

विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे येण्याची शक्यता असून, त्यासाठी पक्षातील काही नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्लीत जाऊन पक्षाध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे यांची भेट घेतली. या भेटीत विरोधी पक्षनेतेबदाबाबत काही नावांची चर्चा झाल्याचे समजते.विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते. अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे संख्याबळ घटले आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद दुसऱ्या क्रमांकाचे आमदार असलेल्या काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे जाईल, असे सूचित केले होते.

“मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास झपाट्याने होतोय”, अजित पवारांकडून स्तुतीसुमने

अर्थमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अजित पवार नाशिक दौऱ्यावर गेले आहेत. नाशिक येथे केलेल्या भाषणातून अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा झपाट्याने विकास होतो. जगभरात भारताची पत आणि प्रतिष्ठा वाढत आहे. भविष्यात एक महासत्ता म्हणून भारताची आगेकूच सुरू आहे, असंही अजित पवारांनी म्हटलं.अजित पवार भाषणात म्हणाले, “मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या साक्षीने नाशिककरांना आणि माझ्या महाराष्ट्रातील जनतेला सांगू इच्छितो की, कसल्याही प्रकारचं नैसर्गिक संकट आलं, तर महाराष्ट्र सरकार तुमच्या पाठिशी उभं राहील. तुम्ही अजिबात एकटं वाटून घेऊ नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपात देशाला अतिशय कणखर नेतृत्व मिळालं आहे. उद्या काही मदत लागली तर आम्ही लोक पंतप्रधान मोदींना भेटून तशी मदत निश्चितपणे मिळवू शकतो.”

फ्रान्सच्या सर्वोच्च किताबाने पंतप्रधान नरेंद्र मोदी सन्मानित

फ्रान्सचा सर्वोच्च नागरी आणि लष्करी सन्मान ‘ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर’ने पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुक्रवारी सन्मानित करण्यात आले. हा मान मिळणारे पंतप्रधान मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी त्यांना हा सन्मान प्रदान केला. अध्यक्षीय प्रासाद ‘एलिसी पॅलेस’मध्ये गुरुवारी मोदींना हा सन्मान व किताब प्रदान करण्यात आला. दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला, ब्रिटिश राजे चार्ल्स (तत्कालीन प्रिन्स ऑफ वेल्स), जर्मनीच्या माजी चान्सलर अँजेला मार्केल, संयुक्त राष्ट्रांचे माजी सरचिटणीस बुत्रोस बुत्रोस घाली आदी मान्यवरांना याआधी ही सन्मान प्रदान करण्यात आला आहे. मोदी दोन दिवसांच्या फ्रान्स भेटीसाठी गुरुवारी पॅरिसमध्ये दाखल झाले, तिथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. शुक्रवारी फ्रान्सच्या राष्ट्रीय दिन ‘बॅस्टिल डे’च्या समारंभात ते अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासोबत विशेष अतिथी म्हणून सहभागी झाले. त्यात हवाई दलाच्या विमानांसह भारताच्या तिन्ही सशस्त्र दलांची पथके सहभागी झाली होती. फ्रान्सचा राष्ट्रीय दिवस किंवा ‘बॅस्टिल डे परेड’ हे मुख्य आकर्षण होते.

लक्ष्य सेनने शंकरला हरवून गाठली उपांत्य फेरी, तर पीव्ही सिंधू उपांत्यपूर्व फेरीतून बाहेर

कॅनडा ओपन चॅम्पियन लक्ष्य सेनने शुक्रवारी यूएस ओपनमध्ये उपांत्य फेरी गाठून आपली घोडदौड सुरू ठेवली आहे. त्याचबरोबर दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाली असून ती बाहेर पडली आहे. सुपर ३०० स्पर्धेत सिंधूला चीनच्या गाओ फॅंग ​​जीने २०-२२, १३-२१ अशा फरकाने सरळ गेममध्ये पराभूत केले.लक्ष्य सेनने अखिल भारतीय अंतिम आठच्या लढतीत एस शंकर मुथुसामी सुब्रमण्यनविरुद्ध २१-१०, २१-१७ असा विजय मिळवला. आता उपांत्य फेरीत सेनचा सामना चीनच्या ली शी फेंगशी होणार आहे. ऑलिम्पिक पदकविजेत्या सिंधूने जागतिक क्रमवारीत ३६व्या क्रमांकावर असलेल्या चिनी प्रतिस्पर्ध्याशी कडवी झुंज दिली, परंतु सुरुवातीच्या सामन्यात भारताला लांब रॅली जिंकता न आल्याने ते निर्णायक ठरले.

२३ ऑगस्टला यान चंद्रावर उतरविण्याचे नियोजन- इस्रो प्रमुख

२३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजून ४७ मिनिटांनी ‘चंद्रयान-३’ चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरविण्याच प्रयत्न केला जाईल, असे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी शुक्रवारी सांगितले.सॉफ्ट लँडिंग यान अलगद उतरविणे हे तांत्रिकदृष्टय़ा आव्हानात्मक मानले जाते. चंद्रयान-३ हे १ ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल, अशी माहिती सोमनाथ यांनी यानाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर पत्रकारांना दिली.  २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५.४७ मिनिटांनी चंद्रयान-३ अलगद उतरविण्याची योजना आहे. मागील मोहिमेमध्ये काय चूक झाली याचा अभ्यास करण्यासाठी एक वर्ष लागले. दुसरे म्हणजे आम्ही त्यात सुधारणा करण्यासाठी कोणती पावले उचलली पाहिजेत आणि काय चूक होऊ शकते याचा अभ्यास केला. त्या आधारावर पुनरावलोकन केले, असे ते म्हणाले.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.