पुणे विद्यापीठाच्या 2020-21 दुसऱ्या सत्राच्या परीक्षा 12 जुलैपासून

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 2020-21 या शैक्षणिक वर्षातील दुसऱ्या सत्राच्या परीक्षांना 12 जुलैपासून सुरुवात होत आहे. ही परीक्षा बहुपर्यायी असून ऑनलाईन पद्धतीने होईल. या परीक्षेसाठी आतापर्यंत साधारण 6 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाकडून पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, प्रमाणपत्र व इतर अशा एकूण 284 अभ्यासक्रमांसाठी 4 हजार 195 विषयांसाठी ऑनलाईन परीक्षा होत आहे. या परीक्षेआधी विद्यार्थ्यांची सराव परीक्षा (मॉक टेस्ट) होणार आहे. 8 ते 10 जुलैदरम्यान ही परीक्षा होईल

12 जुलै पासून सुरू होणाऱ्या विद्यापीठाच्या मुख्य परीक्षेचं वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलंय. या परीक्षा प्रॉक्टर्ड पध्दतीने घेण्यात येणार आहेत. याप्रमाणे 60 प्रश्नांची ऑनलाईन परीक्षा असणार आहे. यातील 50 प्रश्नांची उत्तरे ग्राह्य धरण्यात येणार आहेत. विज्ञान व अभियांत्रिकी विद्याशाखेतील गणित व संख्याशास्त्र या विषयांसाठी एकूण 30 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यातील 25 प्रश्नांची अचूक उत्तरे ग्राह्य धरण्यात येतील.

याबाबत परीक्षा व मुल्यमापन मंडलाचे संचालक डॉ. महेश काकडे म्हणाले, “ऑनलाईन परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांनी गैरवर्तन करू नये यासाठी या सत्र परीक्षेत प्रायोगिक तत्वावर नमुना दाखल काही विद्यार्थ्यांचा आवाज रेकॉर्ड करण्यात येईल. यामुळे परीक्षा अधिक पारदर्शक होण्यास मदत होईल.” या परीक्षेत विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारण्यात येणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या विद्यार्थ्यांना अजूनही परीक्षा अर्ज भरता आले नाहीत अशा विद्यार्थ्यांना 12, 13 आणि 14 जुलै रोजी परीक्षा अर्ज भरता येणार आहेत. त्यांची परीक्षा स्वतंत्ररित्या घेण्यात येईल, अशी माहिती परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी दिलीय.

परीक्षेत लॉग इन न होणे, लॉग आउट होणे, इंग्रजी/ मराठी माध्यम प्रश्नपत्रिका उपलब्ध न होणे, आकृत्या न दिसणे, पेपर सबमिट न होणे, परीक्षार्थींना परीक्षेच्या वेळी कोविड विषाणू बाधा झालेली असणे, विद्यापीठ आयोजित परीक्षा किंवा अन्य सीए, सीईटी अशा परीक्षा एकाच दिवशी येणे अशी कारणे असणाऱ्या विद्यार्थ्यांना तक्रार करता येणार आहे. मात्र प्रत्येक तक्रारीची छाननी करण्यात येईल. अन्य परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या परीक्षेचे हॉल तिकीट किंवा इतर पुरावा देणे गरजेचे असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.