कल्याणमधल्या एका सिक्युरिटी गार्डला इनकम टॅक्स विभागाची एक कोटी रुपयांची नोटीस आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही नोटीस मिळालेले 56 वर्षांचे चंद्रकांत वरक धक्क्यात आहेत. आपल्याला जेवढा टॅक्स भरायला सांगण्यात आला आहे, तेवढे पैसे आपण फक्त टीव्हीमध्येच बघितले असल्याचं चंद्रकांत वरक म्हणाले आहेत.
चंद्रकांत वरक कल्याणच्या ठाणकरपाडा भागात जैन चाळीमध्ये बहिणीसोबत राहतात. ते सिक्युरिटी गार्ड तसंच हाऊस कीपिंग आणि कुरियर बॉयची काम करतात. या सगळ्यातून त्यांची महिन्याला 10 हजार रुपयांची कमाई होते, ज्यावर ते आयुष्य जगतात. वरक यांना 1 फेब्रुवारीला आयकर विभागाकडून 1 कोटी 14 लाख रुपयांची नोटीस आल्यानंतर ते घाबरले, कारण त्यांची वर्षाची कमाई 1 लाख 20 हजार रुपये आहे.
आयकर विभागाची नोटीस मिळाल्यानंतर चंद्रकांत वरक घाबरले, त्यांनी अनेकवेळा नोटीसवरचे आकडे बघितले. यानंतर ते तक्रार करण्यासाठी आयकर विभागाच्या ऑफिसमध्ये गेले आणि याबाबत चौकशी केली, पण तिकडे त्यांना आणखी एक धक्का बसला. वरक यांच्या पॅनकार्ड नंबरचा वापर करून परदेशामध्ये शॉपिंग करण्यात आल्याचं त्यांना इनकम टॅक्स ऑफिसमधून सांगण्यात आलं.
याप्रकरणाची सखोल चौकशी करा आणि माझी यातून सुटका करा, अशी मागणी चंद्रकांत वरक यांनी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. तर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी वरक यांना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्याचा सल्ला दिला आहे.