हिंदुत्व आणि अयोध्या दौऱ्यावरुन सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे 5 जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. यासाठी मनसेकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. कार्यकर्त्याना अयोध्येत जाण्यासाठी मनसेकडून ट्रेन बुक करण्यात येणार आहे. 10 ते 12 ट्रेन बुक करण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
दुसरीकडे शिवसेनाही आता अयोध्या दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. या दौऱ्याच्या तयारीसाठी शिवसेना भवनात खासदार संजय राऊत आणि युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्यात चर्चा झाली. या दौऱ्याच्या निमित्तानं अयोध्येत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याचं नियोजन आहे.
त्याच्या नियोजनाला वेळ मिळावा यासाठी मे महिन्याच्या मध्यावर हा दौरा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिलीये. यावेळी मोठ्या संख्येनं शिवसैनिक जाणार असून त्यासाठी रेल्वे बुक केल्या जाणार आहेत.
अयोध्या दौऱ्याबाबत माहिती देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अयोध्या शिवसेनेसाठी नवीन नाही, ती आमची पायवाट आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. गेली तीस वर्ष शिवसेना आणि अयोध्या हे नातं आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नव्हते त्यावेळीही आणि मुख्यमंत्री झाल्यानंतरही अयोध्येला जाऊन आले. आता आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचा कार्यक्रम आधीच ठरला आहे, चार ते पाच दिवसात तारीख ठरवू असं संजय राऊत यांनी जाहीर केलं आहे.
अयोध्याच्या आंदोलनात शिवसैनिकांनी बिलदान दिलं आहे, कुणी त्यावर बोलत असेल तर ते अयोध्या आंदोलनाचा आणि बलिदानाचा अपमान असेल असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. वादळं परतवून लावण्याची आणि नवीन वादळं निर्माण करण्याची क्षमता फक्त शिवसेनेत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.