अहमदाबादमध्ये बॉम्बस्फोट प्रकरणी
३८ जणांना फाशीची शिक्षा
२००८ मध्ये गुजरातमधील अहमदाबादमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषींना शिक्षा सुनावण्यात आली आहे. सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए आर पटेल यांनी ४९ दोषींपैकी ३८ जणांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. इतर ११ जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दोषींच्या शिक्षेवरील युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर विशेष कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. सरकारी वकिलांनी सर्व दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली असताना दुसरीकडे आरोपींच्या वकिलांकडून कमीत कमी शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती.
पीक विमा योजनेतून महाराष्ट्र
बाहेर पडण्याची शक्यता
पीक विमा योजनेसंदर्भात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेतून महाराष्ट्र बाहेर पडण्याची शक्यता आहे. कंपन्या मालामाल तर शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना असल्याने राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. पीक विम्याचा शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही, असा शेतकऱ्यांनीच आरोप केला आहे. त्यामुळे पीक विमा योजनेतून महाराष्ट्र बाहेर पडण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने निश्चित करून दिलेल्या कंपन्याच विमा योजनेत मालामाल होत असल्याने योजनेतून बाहेर पडण्याचा महाराष्ट्राचा विचार सुरू आहे. बीड पॅटर्नसारखा यशस्वी प्रयोग राबवूनही केंद्राने त्याची परवानगी राज्याला दिली नाही.
केंद्र सरकारने केले राष्ट्रीय धरण
सुरक्षा प्राधिकरण स्थापन
देशात विविध राज्यांमध्ये पाणी वाटपाच्या मुद्द्यावरुन संघर्ष उभे राहिलेले आहेत. विशेषतः दोन राज्यात वेगवेगळ्या पक्षांची सरकारे असली की हा संघर्ष आणखी तीव्र झालेला बघायला मिळत आहे. यामुळेच केंद्र सरकारने राष्ट्रीय धरण सुरक्षा प्राधिकरण स्थापन केलं आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात याबाबतचा कायदा संसदेच्या अधिवेशनात संमत करण्यात आला होता. राज्यांमधील पाणी वाटपाचा तंटा सोडवण्याचे मुख्य आव्हान या प्राधिकरणापुढे असणार आहे. नदी जोड प्रकल्पांमध्ये निर्माण होणारे वाद क्षमवण्याचे कामही या प्राधिकरणाला करावे लागणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या
स्वीकृत संचालकपदी नितेश राणे
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्वीकृत संचालकपदी भाजपा आमदार नितेश राणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निर्देशानुसार ही निवड करण्यात आली आहे. आज जिल्हा बँकेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष मनिष दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ही निवड करण्यात आली. दुसरे स्वीकृत संचालक कुडळाचे प्रकाश मोर्ये यांची निवड झाली.
शहापूर फार्ममधील ३०० कोंबडय़ा
बर्ड फ्लूमुळे पडल्या मृत्युमुखी
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामधील वेहळोली गावातील मुक्तजीवन सोसायटीच्या फार्ममधील ३०० हून अधिक देशी कोंबडय़ा आणि बदके गेल्या काही दिवसांत मृत पावली आहेत. या कोंबडय़ा आणि बदकांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याची बाब तपासणी अहवालात निष्पन्न झाली आहे. यामुळे प्रशासन सतर्क झालं असून क्षेत्राच्या एक किलोमीटर परिघातील २३ हजार कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत. तसंच बाधित क्षेत्राच्या १० किलोमीटर परिघातील कोंबड्यांचे नमुने तपासण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे.
केरळमध्ये स्वयंसेवक संघाच्या
युवा कार्यकर्त्याची हत्या
केरळमधील अलाप्पुझा जिल्ह्यातील हरिपाद भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या युवा कार्यकर्त्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. हा कार्यकर्ता एका मंदिरात नाचायला गेला होता, तिथे त्याचा काही लोकांशी वाद झाला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. सरथ चंद्रन नावाचा हा युवक गेल्या बुधवारी रात्री आपल्या मित्रांसोबत पुतेनकारीयल मंदिरात गेला होता.
महिला दारु पिण्यात
पुरुषांपेक्षा आघाडीवर
राष्ट्रीय कौटुंबिक स्वास्थ सर्वेक्षणातून एक महत्त्वपूर्ण बाब समोर आली आहे. पुरुषांपेक्षा दारु पिण्यात महिला आघाडीवर असल्याचं एका आकडेवारीतून स्पष्ट झालंय. गेल्या पाच वर्षात दारु पिणाऱ्या पुरुषांची संख्या घटली आहे. तर महिलांची संख्या वाढली आहे. NFHS म्हणजेच राष्ट्रीय कौटुंबिक स्वास्थ्य सर्वेक्षणानं ओडिशाला घेऊन याबाबत अहवालच जारी केला आहे.
बीड जिल्ह्यात मुलींच्या
जन्माचा दर पुन्हा घसरला
स्त्री भ्रूण हत्या प्रकरणात बीड जिल्ह्याचे नाव देशात गाजले होते. आता पुन्हा एकदा याच जिल्ह्यात मुलींच्या जन्माचा दर अत्यंत कमी आल्याचा धक्कादायक आकडा समोर आला आहे. कोव्हिड काळात मुलींच्या जन्मदरात मोठी घट झाल्याचे समोर आल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात हजार मुलांमागे केवळ 764 मुलींचा जन्म झाला आहे. कोव्हिड काळात पालकांनी मुलाच्या जन्माचा अट्टाहास केल्याने ही भयानक स्थिती उद्भवली असल्याचे PCPNDT च्या अशासकीय सदस्या डॉ आशा मिरगे यांनी सांगितले आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात
19 आणि 20 फेब्रुवारीला पाऊस
शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट घोंघावत आहे. राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. वांरवार होणाऱ्या अवकाळीने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागतं. आता पुन्हा अवकाळीच्या अंदाजामुळे शेतकरी राजा पुन्हा एकदा हवालदिल झाला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात 19 आणि 20 फेब्रुवारीला अवकाळी पाऊस होईल, अशी शक्यता वर्तवली आहे.
एडस् आजारावर
औषध सापडलं
एचआय़व्ही, या नावानेच घाबरायला होतं, पण आता या जीवघेण्या एडस् आजारावर औषध सापडलं आहे. वैद्यकीय क्षेत्राचं हे मोठं यश मानलं जातं आहे. पहिल्यांदाच एक महिला एडस् मधून ठणठणीत बरी झालीय. अमेरिकेतल्या डॉक्टरांनी आणि संशोधकांनी एड्सवरचं औषध शोधलं आहे. स्टेमसेल ट्रान्सप्लांटच्या माध्यमातून एड्सबाधित महिलेवर उपचार करण्यात आले. ज्या व्यक्तीमध्ये HIV विरोधात नैसर्गिक प्रतिकारशक्ती होती, अशा व्यक्तीनं या स्टेमसेल्स दान केल्या. या ट्रान्सप्लांटमध्ये अंबिलिकल कॉर्डमधल्या रक्ताचा वापर करण्यात आला.
SD social media
9850 60 35 90