आज दि.४ फेब्रुवारी च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

‘म्हणून मला टार्गेट केलं जातंय..’ धावपटू पीटी उषा भावूक, म्हणाल्या मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न

भारताच्या महान खेळाडूंपैकी एक असलेल्या आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पी. टी. उषा यांनी केवळ खेळाडूंच्या अनेक पिढ्यांना प्रेरणाच दिली नाही, तर अनेक तरुण खेळाडूंची कारकीर्द घडवण्यात महत्त्वाचा वाटाही उचलला आहे. पण आता पी. टी. उषा यांच्या संस्थेच्या जागेवर गुंडांनी बेकायदेशीर बांधकाम केलं आहे. याबाबत त्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.पी. टी. उषा यांनी शनिवारी (4 फेब्रुवारी 2023) दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन केरळमधील कोझिकोड येथील ‘उषा स्कूल ऑफ अॕथलेटिक्स’च्या जमिनीवर काही गुंडांनी बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप केलाय. या वेळी बोलताना त्या भावूक झाल्या.पी. टी. उषा म्हणाल्या, ‘हा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. कोणी विनापरवानगी विद्यार्थिनींच्या कॅम्पसमध्ये कसा प्रवेश करू शकतं? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. त्या पुढे म्हणाल्या, ‘बेकायदा बांधकाम होत असल्याचं पानागड पंचायतीला माहिती आहे. तेथे प्रशिक्षण घेणाऱ्या मुलींसह इतर खेळाडूंच्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा. मी राज्यसभा खासदार झाल्यापासून ‘उषा स्कूल ऑफ अॕथलेटिक्स’ला लक्ष्य केलं जात आहे. माझ्यावर वैयक्तिक टीका केली जातेय. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.’

‘देवेंद्र फडणवीस मोठ्या भावासारखे’, सत्यजीत तांबेंनी सांगितली भविष्यातील रणनीती

नाशिक पदवीधर मतदारसंघामधून निवडणूक जिंकल्यानंतर सत्यजीत तांबे यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. सत्यजीत तांबे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत, तसंच आपल्याला आणि आपल्या परिवाराला भाजपकडे ढकलण्याचे प्रयत्न केले गेल्याची टीकाही सत्यजीत तांबे यांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस हे आपल्याला मोठ्या भावासारखे असल्याचं सूचक विधान सत्यजीत तांबे यांनी केलं आहे.’माझ्या पुस्तक प्रकाशनाला मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह अजितदादांनाही आमंत्रित केलं होतं. तेव्हा देवेंद्रजी सत्यजीतला संधी द्या, नाहीतर आमचा डोळा त्यांच्यावर जाईल, असं बोलले. त्यावरून चर्चा झाली. सभागृहातदेखील दाद मिळाली. आमची भावना त्यांनी बोलून दाखवली. ते मला मोठ्या भावासारखे आहेत’, असं सूचक विधान सत्यजीत तांबे यांनी केलं.

भाजपनंतर राष्ट्रवादीत नाराजांचा होणार स्फोट? इच्छुकांनी वाढवलं अजितदादांचं टेन्शन

आज भाजपने पुण्यातील कसबा आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. कसबा मतदारसंघात भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर चिंचवड मतदारसंघात अश्विनी जगताप यांच्या नावाची घोषणा झाली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून देखील उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. मात्र अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाहीये. कसबा मतदारसंघात काँग्रेसकडून  रवींद्र धंगेकर हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत तर चिंचवडची जागा राष्ट्रवादीच्या वाटयाला आली आहे.

अलका कुबल यांची एक लेक पायलट तर दुसरीचीही कौतुकास्पद कामगिरी

अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये आजही घराघरात लोकप्रिय आहेत. कौटुंबिक भूमिका, दैवी भूमिका यात त्यांचा हातखंडा आहे.अलका कुबल यांना दोन मुली आहेत. दोघीही अभिनय सोडून वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत.कस्तुरी व ईशानी अशी त्यांच्या मुलींची नावं आहेत.त्यांची एक मुलगी पायलट आहे तर आता दुसरीने देखील कौतुकास्पद कामगिरी केली आहे.अलका यांची धाकटी मुलगी कस्तुरी परदेशात एमबीबीएस करतेय तिला डर्मिटोलॉजिस्ट बनायचं आहे.अलका कुबल यांनी लिहिलंय कि, ‘कस्तुरी ने पहिल्याच प्रयत्नात FMGE परवाना परीक्षा यशस्वीपणे पास केली आज पासून Dr. Kasturee Athalye’

पद्मभूषण पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध गायिका वाणी जयराम काळाच्या पडद्याआड

मनोरंजन सृष्टीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्गज पार्श्वगायिका वाणी जयराम यांचे निधन झाले आहे. चेन्नईतील नुंगमबक्कम येथील हॅडोस रोडवरील त्यांच्या राहत्या घरी त्या मृतावस्थेत आढळून आल्या.  वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या मृत्यूचं खरं कारण असून समोर आलं नसून त्यांच्या  कपाळावर जखम झाल्याचे आढळून आले आहे. त्यांच्या निधनाने चाहत्यांना धक्का बसला असून मनोरंजन सृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

दिग्गज पार्श्वगायिका वाणी जयराम  या  ७८ वर्षांच्या होत्या. त्यांना पद्मभूषण – भारतातील तिसरा-सर्वोच्च नागरी पुरस्कार नुकताच जाहीर झाला होता.

पंतप्रधान मोदींचा डंका! जगभरातील नेत्यांमध्ये टॉपला; बायडेन, सुनक यांचा टाकले मागे

जगातील लोकप्रिय नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा अव्वल ठरले आहेत. अमेरिकेतील डेटा इंटेलिजन्स फर्म द मॉर्निंग कन्सल्ट सर्व्हेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अप्रूव्हल रेटिंगमध्ये पहिल्या नंबरवर आहेत.सर्व्हेनुसार २२ नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ७८ टक्क्यांसह यादीत सर्वात वरच्या स्थानी आहेत. मोदींनंतर दुसऱ्या क्रमांकावर मेक्सिकन राष्ट्रपती अँड्रेस मॅन्युअल लोपेज ओब्रेडोर यांना ६८ टक्के मिळाले तर तिसऱ्या स्थानी असलेल्या स्वित्झर्लंडचे एलेन बेर्सेट यांना ६२ टक्के पसंती मिळाली.दरम्यान सर्व्हेत असंही सांगण्यात आलं आहे की, भारतात जवळपास १८ टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते असल्याचं नाकारलं आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि कॅनडाचे जस्टिन ट्रुडो यांना ४० टक्के रेटिंग मिळालं आहे. ते लोकप्रिय नेत्यांच्या यादीत अनुक्रमे ७ व्या आणि ९ व्या क्रमांकावर आहेत.

3 महिन्यांच्या चिमुकलीला लोखंडी सळईचे चटके; अंधश्रद्धेमुळे गेला जीव

वैद्यकीय क्षेत्रात खूप प्रगती झाली असली तरी आरोग्याशी संबंधित अडचणींबद्दल देशाच्या काही भागांमध्ये अजूनही अंधश्रद्धा पाळली जाते. अनेक ठिकाणी उपचारांसाठी डॉक्टरांऐवजी भोंदू बाबा किंवा मांत्रिक यांची मदत घेतली जाते. परिणामी, वेळीच उपचार न मिळाल्याने अनेकांना जीव गमवावा लागतो. अशीच एक घटना मध्य प्रदेश राज्यातील शहडोलमध्ये घडली आहे. या ठिकाणी कुटुंबीयांच्या अंधश्रद्धेमुळे एका तीन महिन्यांच्या मुलीला जीव गमवावा लागला आहे.कुटुंबीयांची अंधश्रद्धा आणि भोंदू बाबाच्या कृत्याने एका तीन महिन्यांच्या चिमुरडीचा जीव घेतला आहे. न्यूमोनियाने पीडित मुलीवर उपचार करण्याच्या नावाखाली एका भोंदू वैद्याने तिच्या पोटावर गरम सळईचे तब्बल 51 चटके दिले. यामुळे मुलीची प्रकृती बरी होण्याऐवजी बिघडली. यानंतर नातेवाईकांनी तिला रुग्णालयात दाखल केलं, मात्र त्या चिमुरडीचा जीव वाचू शकला नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

व्होडाफोन आयडिया कात टाकणार; भारत सरकार बनणार ३३ टक्के भागीदार

भारत सरकारने व्होडाफोन आयडियाच्या १६ हजार कोटी रुपयांच्या व्याज देय रकमेचे शेअर्समध्ये रूपांतर करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे भारत सरकार आता व्होडाफोन-आयडियामध्ये ३३ टक्के भागीदार होणार आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात माहिती दिली.टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, मागील काही वर्षांपासून व्होडाफोन-आयडिया कंपनीवर कर्जाचा डोंगर आहे. त्यामुळे या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडून व्होडाफोन-आयडियाला स्पेक्ट्रमच्या थकीत व्याजाचे शेअर्समध्ये रूपांतर करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. हा प्रस्ताव व्होडाफोन-आयडियाकडून मान्य करण्यात आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारला व्होडाफोन-आयडिया कंपनीत ३३ टक्के भागीदारी मिळाली आहे. महत्त्वाचे म्हणजे कंपनीच्या या निर्णयानंतर व्होडाफोन-आयडियाची भागीदारी ५० टक्क्यांनी कमी होणार आहे.

भाजपाने त्रिपुरा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं, जेपी नड्डा, स्मृती इराणींसह स्टार प्रचारकांच्या ३६ सभा होणार

भारतीय जनता पार्टीने शुक्रवारपासून (३ फेब्रुवारी) त्रिपुरामध्ये निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी प्रचाराला सुरुवात केली. निवडणुकीपर्यंत नड्डा यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या राज्यभरात ३५ प्रचारसभा होणार आहेत. यावेळी नड्डा यांनी विकास आणि राज्यातील हिंसाचाराचा अंत अशा दोन मुख्य मुद्द्यांना हात घातला.नड्डा यांची पहिली सभा गोमती जिल्ह्यातील अमरपूर येथे झाली. येथे आयोजित ‘विजय संकल्प यात्रे’दरम्यान त्यांनी काँग्रेस-आघाडीवर जोरदार टीका केली. नड्डा म्हणाले की, “डावे आणि काँग्रेस सरकारच्या काळात राज्यात बंडखोरी, राजकीय हत्या, हिंसाचार वाढला. तसेच लूटमार होत होती.”

“टीम इंडियासाठी दोन फिरकीपटू खूप झाले…”, ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सचा फाजील आत्मविश्वास!

ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने शनिवारी सांगितले की, त्यांचा संघ फिरकी संयोजनाबाबत फारसा विचार करत नाही कारण गुरुवारपासून नागपुरात सुरू होणाऱ्या भारताविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑफस्पिनर नॅथन लियॉनकडे अनुभवी ऑफस्पिनर नॅथन लियॉन आहे. मदतीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. भारत दौऱ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने लियॉनला पाठिंबा देण्यासाठी मिचेल स्वेपसनसह फिंगर-स्पिनर अ‍ॅश्टन अ‍ॅगरचा समावेश केला आहे.इतिहास साक्षी आहे की भारताच्या कोणत्याही कसोटी मालिकेतील विजयाचा पाया फक्त फिरकीपटूच देतात. मात्र, भारतातील वेगवान गोलंदाजांना हलक्यात घेता येणार नाही, असे मत ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सचे आहे. बंगळुरूमध्ये सराव करत असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार कमिन्स म्हणाला की, “त्यांच्याकडे जागतिक दर्जाचे वेगवान गोलंदाज आहेत. फिरकीपटूंबद्दल खूप चर्चा होते पण ते आपल्या वेगवान गोलंदाजांना विसरू शकत नाहीत.” तो पुढे म्हणाला, “मला वाटतं कधी कधी तुम्ही फिरकीपटूंबद्दल बोलता तेव्हा तुम्ही विसरता की आमच्याकडे सर्व प्रकारच्या परिस्थितींसाठी पुरेसे वेगवान गोलंदाज आहेत.”

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.